मनमाडला कोविड रुग्णालयाच्या मागणीला केराची टोपली; प्रशासनाच्या नाकर्तेपणामुळे रुग्णांची हेळसांड

अमोल खरे
Thursday, 15 October 2020

सव्वालाख लोकसंख्येचे मनमाड हे जिल्ह्यातील तिसऱ्या क्रमांकाचे शहर असून, येथे कोरोनाबाधित रुग्णांची वाढती संख्या पाहता डेडिकेटेड कोविड रुग्णालय सुरू करणे अत्यंत गरजेचे असताना केवळ प्रशासनातील अधिकाऱ्यांच्या नाकर्तेपणामुळे हे सेंटर रेंगाळत पडले आहे.

नाशिक/मनमाड : जिल्ह्यातील तिसऱ्या क्रमांकाचे मोठे शहर असलेल्या मनमाड येथे कोरोनाबाधितांची संख्या वाढत असतानाही डेडिकेटेड कोविड रुग्णालय सुरू होण्याचा प्रश्‍न अद्यापही रेंगाळला आहे. प्रशासनाच्या नाकर्तेपणामुळे रुग्णांची हेळसांड होत असून, राजकारण्यांच्या मागण्यांना जिल्हा प्रशासनातर्फे केराची टोपली दाखवली जात आहे. 

सव्वालाख लोकसंख्येचे मनमाड हे जिल्ह्यातील तिसऱ्या क्रमांकाचे शहर असून, येथे कोरोनाबाधित रुग्णांची वाढती संख्या पाहता डेडिकेटेड कोविड रुग्णालय सुरू करणे अत्यंत गरजेचे असताना केवळ प्रशासनातील अधिकाऱ्यांच्या नाकर्तेपणामुळे हे सेंटर रेंगाळत पडले आहे. शहरातील कोरोनाबाधितांची संख्या ७९८ पर्यंत पोचली आहे. यातच अनेक जण केवळ भीतीपोटी स्वॅब देत नसून घरीच उपचार घेत आहेत. अनेक रुग्ण कोरोनाचे रुग्णालय नसल्याने खासगी रुग्णालयात उपचार घेत असल्याने त्यांना लाखो रुपये खर्च येत आहे. तर काहींची सरकारी केंद्रात खाटा उपलब्ध होत नसल्याने हेळसांड होत आहे. 

हेही वाचा > एकुलती एक चिमुरडी झाली पोरकी! बाप अपराधी तर आई देवाघरी; सातपूरमधील दुर्दैवी घटना

प्रशासानकडून वेळकाढूपणा

शहरात तत्काळ कोविड रुग्णालय सुरू करण्याची मागणी सर्वपक्षांनी करत वेळोवेळी आंदोलन करत निवेदने दिले, मोर्चे काढले, पण आश्‍वासनाशिवाय मनमाडकरांना काहीच मिळाले नाही. यातच शहरात रुग्णालयासाठी जागा नाही. रेल्वे प्रशासन रेल्वे हॉस्पिटल देत नाही यांसह विविध कारणे पुढे करत वेळकाढूपणा प्रशासानकडून केला जात आहे. उपजिल्हा रुग्णालयाची मोठी इमारत असताना जागेचा प्रश्न पुढे करत केवळ सेंटरच्या कामाचा ताण नको, यासाठी अधिकारी कागडी घोडे नाचवत असल्याची चर्चा शहरभर आहे. 
पालकमंत्री छगन भुजबळ यांनी मनमाड येथे कोरोना रुग्णालय उभारा, अशी अधिकाऱ्यांना सूचना केली असता अद्यापही अधिकाऱ्यांकडून त्याची अंमलबजावणी झालेली नाही. शहरात अनेक रुग्णांना ऑक्सिजनची गरज भासू लागली आहे. मात्र त्यांना वेळेवर खाटा मिळत नाही. त्यांच्या जिवावर बेतण्याची वेळ आली आहे. त्यामुळे मनमाड शहरात ऑक्सिजन बेड कोविड सेंटर सुरू करणे अत्यंत गरजेचे आहे. 

हेही वाचा > धक्कादायक! आजोबांचे हातपाय बांधून नातूने फेकले नाल्यात; अंगावर काटा आणणारी करतूत 

मनमाडसाठी अद्यापही डीसीएससी सेंटर मंजूर नाही. प्रक्रिया सुरू आहे. मात्र जागेअभावी केंद्र रेंगाळले गेले. उपजिल्हा रुग्णालयाची इमारत उपलब्ध असली तरी रोज तीनशे ते चारशे रुग्णांची ओपीडी, रोज होणारी बाळंतपणं याची व्यवस्था करावी लागणार आहे. ही व्यवस्था झाल्यावरच इमारत उपलब्ध होईल. 
- डॉ. जी. एस. नरवणे, वैद्यकीय अधीक्षक, उपजिल्हा रुग्णालय 
 

ऑक्सिजन बेड कोविड सेंटर शहरात व्हावे, यासाठी आंदोलन केले, निवेदने दिली. मात्र आश्वासनांच्या पलीकडे काहीच मिळाले नाही. सुविधांअभावी रुग्ण दगावण्याचे प्रमाण वाढू शकते, याला जबाबदार कोण. 
- राजेंद्र पगारे, माजी नगराध्यक्ष, वंचित नेते 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: no Dedicated Covid Hospital in manmad nashik marathi news