मास्क नाही, तर माफी नाही; दंड भरावाच लागणार!

रोशन खैरनार
Friday, 18 September 2020

शहरात दिवसेंदिवस कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असून, गर्दीच्या ठिकाणी नागरिक काळजी घेत नसल्याचे निदर्शनास येत आहे. त्यामुळे शहरात आता मास्क वापरणे सक्तीचे करण्यात आले आहे.

नाशिक / सटाणा : शहरात दिवसेंदिवस कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असून, गर्दीच्या ठिकाणी नागरिक काळजी घेत नसल्याचे निदर्शनास येत आहे. त्यामुळे शहरात आता मास्क वापरणे सक्तीचे करण्यात आले आहे.

विनामास्क फिरणाऱ्यांवर कारवाई 

दुकानदारांनीही शारीरिक अंतर ठेवून हँडग्लोज, सॅनिटायझर व मास्क बंधनकारक केले आहे. जे नागरिक व दुकानदार नियमांचे पालन करणार नाही, त्यांच्यावर दंडात्मक कारवाईसह गुन्हे दाखल केले जातील, अशी माहिती मुख्याधिकारी हेमलता डगळे यांनी गुरुवारी (ता.१७) दिली. 
त्या म्हणाल्या, की बागलाण तालुका कोरोनाचा हॉटस्पॉट बनला असून, सटाणा शहरातही दिवसेंदिवस कोरोनाबाधितांची वाढत असलेली संख्या चिंताजनक आहे. या पार्श्वभूमीवर पालिका प्रशासनाने कठोर पावले उचलली आहेत.

मास्क नाही, तर माफी नाही; दंड भरावाच लागणार 

शहरात शासनाच्या निर्देशानुसार ‘माझे कुटुंब-माझी जबाबदारी’ ही मोहीम हाती घेण्यात आली असून, मोहिमेच्या यशस्वितेसाठी नागरिकांचा सहभाग आवश्यक आहे. कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता शहरात मास्क वापरणे सक्तीचे करण्यात आले असून, मास्क न वापरणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई केली जाणार आहे. दुकानात किंवा दुकानाबाहेर अनावश्यक गर्दी आढळून आल्यास दुकानदाराविरुद्ध गुन्हे दाखल केले जातील. 

हेही वाचा > धक्कादायक! जिल्हा रुग्णालयात गळफास घेऊन युवकाची आत्महत्या; कुटुंबियांचा आक्रोश 

‘माझे कुटुंब-माझी जबाबदारी’
‘माझे कुटुंब-माझी जबाबदारी’ मोहिमेंतर्गत घरोघरी सर्वेक्षणास येणाऱ्या सर्वेक्षकास आवश्यक माहिती देण्यास टाळाटाळ करणाऱ्या व्यक्तीविरुद्ध कायदेशीर कारवाई केली जाईल. ज्या व्यक्तींना कोरोनासदृश लक्षणे आढळून येत असतील, अशा नागरिकांनी तत्काळ ग्रामीण रुग्णालयाशी संपर्क साधावा अथवा सर्वेक्षकास माहिती द्यावी. त्यामुळे संबंधित व्यक्ती व त्यांच्या कुटुंबीयांची योग्य काळजी घेऊन त्यांच्यावर वेळीच उपचार केले जातील. नागरिकांनी या मोहिमेस सहकार्य करण्याचे आवाहनही श्रीमती डगळे यांनी केले. 

हेही वाचा > जिवलग मित्रांची 'ती' सहल शेवटचीच! कोरोना काळात पर्यटनस्थळ बंदी नावालाच; प्रशासनाची भूमिका संशयास्पद 

मास्क वापरल्याने कोरोनाला आपण स्वत:पासून दूर ठेवू शकतो. मात्र शहर व तालुक्यात विनामास्क फिरणाऱ्यांची संख्या वाढली असून, दुकानांमध्ये शारीरिक अंतर ठेवले जात नसल्याचे निदर्शनास आले आहे. यापुढे विनामास्क फिरणारे आणि सामाजिक अंतर न पाळणाऱ्या दुकानदारांवर गुन्हे दाखल केले जातील. - नंदकुमार गायकवाड, पोलिस निरीक्षक, सटाणा  


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: No mask no apology have to pay the fine nashik marathi news