आता गावागावांत गुरुजी मागणार मास्क, साबण अन्‌ सॅनिटायझर? गुरुजी दुहेरी कात्रीत

सकाळ वृत्तसेवा
Wednesday, 10 June 2020

ग्रामीण भागात दुर्बल व वंचित घटकांतील पालक मोलमजुरी करून आपला उदरनिर्वाह करतात. शिवाय त्यांच्याकडे अँड्रॉइड मोबाईल नाही. घरामध्ये दूरचित्रवाणी संच नाही. रेडिओ नाही. काही पालकांच्या घरात वीज नाही. अशा पालकांच्या पाल्यांना ऑनलाइन शिक्षण कशा पद्धतीने द्यावे, अशा नानाविध प्रश्‍नांनी गुरुजी दुहेरी कात्रीत सापडले आहेत. 

नाशिक / नांदगाव : निवडणुकीसंदर्भातील सर्व कामे, जनगणना, गावातील शौचालयांच्या सर्वेक्षणासह रेशनिंग दुकान, चेकपोस्टवर चौकीदारी अशा गैरकामांमध्ये लोकसहभागातून शाळेचे रूपडे पालटणाऱ्या गुरुजनांना आता आपल्या शाळेतील विद्यार्थ्यांच्या सुरक्षितेसाठी घरोघरी जाऊन मास्क, साबण, सॅनिटायझर अन्‌ सॅनिटायझर स्टॅन्ड मागावे लागणार आहेत. त्याला निमित्तही तसे आहे, कारण कोरोनाचा मुकाबला करण्यासाठी शिक्षण विभागाने लोकसहभागातून हे कामकाज करण्याचे कृती आराखड्यात निर्देश दिले आहेत. 

कोरोनाचा मुकाबला करण्याचे शिक्षण विभागाचे निर्देश 
कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर आगामी शैक्षणिक वर्षात मुकाबला करण्याचे निर्देश शिक्षण विभागाने कृती आराखड्यातून दिले आहेत. शाळा सुरू झाल्यानंतर शाळेमध्ये विद्यार्थ्यांसाठी साबण, सॅनिटायझर, मास्क, फेसशील्ड, सॅनिटायझर स्टॅन्ड इत्यादी वस्तू स्वयंसेवी संस्था व लोकसहभागामधून मिळवाव्यात, असे सांगितले आहे; परंतु सद्यःस्थितीत ग्रामीण भागातील लोकांची आर्थिक परिस्थिती बघता वरील वस्तू लोकसहभागामधून मिळाल्या नाहीत तर या वस्तूंची खरेदी कशी करावी, असा प्रश्‍न गुरुजनांना पडला आहे.

गुरुजी दुहेरी कात्रीत

लोकसहभागातून खरेदी करण्याचे जिल्हा परिषदेच्या कृती आराखड्यात सांगण्यात आले आहे. त्यातल्या बहुतांश वस्तू उपभोग्य किंवा खर्ची पडणाऱ्या या सदरात समाविष्ट होत असल्याने स्वयंसेवी संस्था, लोकवर्गणी, ग्रामपंचायत यांच्याकडून ही मदत मिळविण्याची जबाबदारी शाळेवर टाकण्यात आली आहे. लोकसहभागातून या वस्तू मिळू शकल्या नाहीत तर काय करावे, या प्रश्‍नाने गुरुजी मात्र पुरते गोंधळून गेले आहेत. समजा अशी खरेदी झालीच तरीही ती वारंवार करावी लागणार आहे. तसेच लोकसहभागातून घेताना अशी मदत जेथून मिळवायची त्या ग्रामीण भागात दुर्बल व वंचित घटकांतील पालक मोलमजुरी करून आपला उदरनिर्वाह करतात. शिवाय त्यांच्याकडे अँड्रॉइड मोबाईल नाही. घरामध्ये दूरचित्रवाणी संच नाही. रेडिओ नाही. काही पालकांच्या घरात वीज नाही. अशा पालकांच्या पाल्यांना ऑनलाइन शिक्षण कशा पद्धतीने द्यावे, अशा नानाविध प्रश्‍नांनी गुरुजी दुहेरी कात्रीत सापडले आहेत. 

हेही वाचा > "चमत्कार झाला..! मालेगावात नेमके काय घडले?" सर्वत्र आश्चर्य..!

वरिष्ठांकडून मार्गदर्शन अपेक्षित
दोन विद्यार्थ्यांमधील सामाजिक अंतर कसे राखावे, याविषयी कला, कार्यानुभव व शारीरिक शिक्षण या तासिकांच्या बाबतीत शिक्षकांना वरिष्ठांकडून मार्गदर्शन अपेक्षित आहे. -ललित पगार, तालुकाध्यक्ष, प्राथमिक शिक्षक संघ, नांदगाव 

हेही वाचा >  नाशिकमधील 'हे' गाव झालयं चक्क मुंबईतील धारावी.. कोणाचा कुठे ताळमेळ बसेना

 
गुरुजनांना नित्याने करावी लागणारी गैरकामे 
निवडणुकीसंदर्भातील सर्व कामे, जनगणना, मतदार नोंदणी, आर्थिक व सामाजिक सर्वेक्षण, हागणदारीमुक्त व निर्मल ग्राम योजना सर्वेक्षण, शालेय पोषण आहार, शालेय खोल्या बांधकाम, शासनस्तरावरील विविध सर्वेक्षणे, कुटुंबकल्याण, ग्रामपातळीवरील कामे, सातत्याने माहिती संकलन, आपत्ती व्यवस्थापन सहभाग.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Now Guruji will ask for mask, soap and sanitizer in every village nashik marathi news