नाशिककर अन्‌ मुंबईकरांना मिळणार 'चिकन - अंडी'!...भुजबळांमुळे प्रश्‍न मार्गी

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 26 मार्च 2020

नाशिक व मुंबईमध्ये चिकन, अंडी मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. अन्न व नागरी पुरवठामंत्री छगन भुजबळ यांनी बुधवारी (ता. 25) दूरध्वनीवरून ब्रॉयलर कोंबड्या आणि अंड्यांची वाहतूक करणाऱ्या वाहनांना अडथळा येऊ नये, अशा सूचना नाशिक आणि मुंबई पोलिस आयुक्तालयाला दिल्या. त्याचप्रमाणे जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ. आरती सिंह यांनी मंगळवारी (ता. 24) पोल्ट्री शेडसाठी खाद्य आणि औषधांच्या वाहनांना अडथळा न करण्याच्या सूचना दिल्या होत्या. 

नाशिक : नाशिक व मुंबईमध्ये चिकन, अंडी मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. अन्न व नागरी पुरवठामंत्री छगन भुजबळ यांनी बुधवारी (ता. 25) दूरध्वनीवरून ब्रॉयलर कोंबड्या आणि अंड्यांची वाहतूक करणाऱ्या वाहनांना अडथळा येऊ नये, अशा सूचना नाशिक आणि मुंबई पोलिस आयुक्तालयाला दिल्या. त्याचप्रमाणे जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ. आरती सिंह यांनी मंगळवारी (ता. 24) पोल्ट्री शेडसाठी खाद्य आणि औषधांच्या वाहनांना अडथळा न करण्याच्या सूचना दिल्या होत्या. 

जीवनावश्‍यक वस्तूंमध्ये चिकन आणि अंड्यांचा समावेश

पोल्ट्री फार्मर्स व ब्रीडर असोसिएशनचे सचिव उद्धव अहिरे यांनी ही माहिती दिली. श्री. अहिरे म्हणाले, की जीवनावश्‍यक वस्तूंमध्ये चिकन आणि अंड्यांचा सरकारने समावेश केला आहे. सीमा सीलमधून वाहतुकीला सवलत देण्यात आली आहे. जिल्ह्यातून मुंबईकडे ब्रॉयलर कोंबड्या आणि अंडी जाण्यासाठी नाशिकमधील द्वारका व घोटी हे जंक्‍शन पॉइंट आहेत. याठिकाणी आणि मुंबईला ब्रॉयलर कोंबड्या व अंडी उतरवून रिकामी वाहने परत शेडकडे जाण्यामध्ये संचारबंदीच्या काळात अडचणीचे झाले होते. ही बाब पालकमंत्री भुजबळ यांच्यापर्यंत पोहचवण्यात आली. राष्ट्रवादी कॉंग्रेसचे शहराध्यक्ष रंजन ठाकरे यांचे सहकार्य लाभले. श्री. भुजबळ यांनी वाहतुकीचा प्रश्‍न मार्गी लावल्याने नाशिकप्रमाणे मुंबईत चिकन आणि अंडी उपलब्ध होतील. डॉ. सिंह यांनी जिल्ह्यात पोलिस अधिकाऱ्यांना कोंबड्या आणि अंडी, खाद्य, औषधे वाहतुकीला मदत करण्याचे आदेश दिले आहेत. डॉ. सिंह यांच्याशी श्री. अहिरे यांनी संवाद साधला होता. 

दीड कोटी कोंबड्या शेडमध्ये 

जिल्ह्यातील 15 हजार शेडमध्ये एक दिवसाच्या पिलापासून दीड महिन्यापर्यंत दीड कोटी कोंबड्या आहेत. मुंबईसाठी रोज दीड हजार टन कोंबड्या पाठविणे आवश्‍यक असल्याने वाहनांच्या अडचणींमुळे 35 टक्के मागणी पूर्ण करता येत आहे. 

दीड हजार कोटींचा फटका 

कोरोनाविषयक अफवेमुळे मंदी कोसळल्याने राज्यातील ब्रॉयलर कोंबड्या उत्पादकांना अकराशे आणि मका व सोयाबीन शेतकऱ्यांना चारशे असा एकूण दीड हजार कोटींचा दणका सव्वा महिन्यात बसला. सद्यःस्थितीत राज्यातील एक लाख शेडमध्ये सहा कोटी ब्रॉयलर कोंबड्या आहेत. 

 हेही वाचा> संचारबंदीत जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा सुरळीत सुरू राहणार - छगन भुजबळ

ब्रॉयलर कोंबड्या उत्पादकांच्या बाजूने "सकाळ' नेहमी उभा राहिला. बर्ड फ्लूमध्ये मदत केली. आता खाद्य आणि औषधांच्या वाहतूक विषयात मदत झाली. -उद्धव अहिरे, सचिव, पोल्ट्री फार्मर्स व ब्रीडर असोसिएशन  

हेही वाचा > ''कोरोना कळतो हो साहेब, पण या शेतमालाचं काय?''...शेतकऱ्यांची परिस्थितीशी झुंज सुरुच

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Now you get the chicken-egg nashik marathi news