संचारबंदीत जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा सुरळीत सुरू राहणार - छगन भुजबळ

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 24 मार्च 2020

शेतकरी देखील थेट ग्राहकांना भाजीपाला विक्री करु शकतात, परंतु गर्दी होणार नाही याची काळजी घेणे गरजेचे आहे. जीवनावश्यक व अत्यावश्यक वस्तूंचा पुरवठा आवश्यकतेनुसार व सातत्याने सुरु ठेवण्यासाठी पोलीस व सर्व संबंधित यंत्रणांनी कार्यवाही करावी, अशा सूचना दिल्या असल्याचेही पालकमंत्री श्री. भुजबळ यांनी सांगितले आहे.

नाशिक : सहा महिने पुरेल एवढे अन्नधान्य उपलब्ध असल्याने नागरिकांनी काळजी करू नये. त्यासाठी किराणा दुकानांवर एकाचवेळी गर्दीदेखील करू नये, असे आवाहन 
पालकमंत्री छगन भुजबळ यांनी केले आहे.

गर्दी होणार नाही याची काळजी घेणे गरजेचे 

अन्नधान्य, भाजीपाला किंवा मटण मासे यासारख्या जीवनावश्यक वस्तू मिळणारी दुकाने तसेच दवाखाने, मेडिकल आदी सेवा संचारबंदीतून वगळण्यात आल्या आहेत. त्यामुळे या सेवा सुरळीत सुरू राहण्यासाठी शासन प्रशासनास नागरीकांनी आवश्यक ते सर्व सहकार्य करावे. त्याचप्रमाणे भाजीपाला, कांदा, बटाटा मार्केट बंद केलेले नाहीत. त्या ठिकाणी माथाडी कामगार कामावर जाणार असेल तर त्यासंबंधी पोलिसांनी सारासार विचार करून त्यांना कामावर जाऊ देण्याचे सहकार्य पोलीस प्रशासन करेल. शेतकरी देखील थेट ग्राहकांना भाजीपाला विकू शकतात, परंतु गर्दी होणार नाही याची काळजी घेणे गरजेचे आहे. जीवनावश्यक व अत्यावश्यक वस्तूंचा पुरवठा आवश्यकते नुसार व सातत्याने सुरू ठेवण्यासाठी पोलीस व सर्व संबंधित यंत्रणांनी कार्यवाही करावी, अशा सूचना दिल्या असल्याचेही पालकमंत्री श्री. भुजबळ यांनी सांगितले आहे.

किराणा किंवा इतर जीवनावश्यक वस्तू जास्त भावाने विकल्या जाण्याच्या तक्रारी समोर येताय...

नागरिकांनी सुद्धा संचारबंदी काळात अनावश्यक बाहेर पडू नये. तसेच जीवनावश्यक वस्तूंची खरेदी करण्यासाठी जाताना एकाच व्यक्तिने  जावे, संबंधित दुकानांवर जास्त गर्दी होणार नाही याची काळजी देखील नागरिकांनी घ्यावी. नागरिकांनी कोरोना विषाणूची भीती न बाळगता, सतर्कतेने, स्वच्छता ठेवून व एकमेकांपासून लांब राहून या परिस्थितीचा सामना करणे आवश्यक आहे. निर्माण झालेल्या परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन सामाजिक संस्थांनी गर्दीच्या ठिकाणी लोकांना ठराविक अंतरावर उभे करणे, निवडक थोड्याप्रमाणात रांगा लावून देणे असे सहज स्वरूपाचे मौलिक सहकार्य केल्यास वातावरण सुरळीत होण्यास मदत होईल.

हेही वाचा > मोबाईल हातात न दिल्याचाच राग...अन् त्याने केला धक्कादायक प्रकार

किराणा किंवा इतर जीवनावश्यक वस्तू जास्त भावाने विकल्या जाण्याच्या 
तक्रारी समोर येत आहेत. 

याबाबत नागरिकांनी जागरूक राहून संबंधित ग्राहक संरक्षण, पोलीस किंवा महसूल अशा यंत्रणांनाकडे त्वरित तक्रार करावी. जीवनावश्यक वस्तूंमध्ये मास्क आणि सॅनिटायझर यांचादेखील समावेश असल्याने यात काळाबाजार झाल्यास सात वर्षांची शिक्षा ठोठावण्यात येईल, असेही पालकमंत्री श्री. भुजबळ यांनी सांगितले आहे.

हेही वाचा > 'लॉकडाऊन' परिस्थितीत किराणा संपलाय?...चिंता नको हे वाचा​


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The supply of essential commodities will remain constant - Chhagan Bhujbal nashik marathi news