नाशिकमध्ये ॲक्‍टिव्‍ह रुग्णसंख्येत १३४ ने घट; तर ३०३ रुग्णांची कोरोनावर मात

अरुण मलाणी
Sunday, 25 October 2020

रविवारी (ता. २६) कोरोनामुळे शहरात एकाही कोरोनाबाधिताचा मृत्‍यू नसल्‍याने काहीसा दिलासा मिळाला. तसेच कोरोनाबाधितांपेक्षा कोरोनामुक्‍तांची संख्या अधिक राहिली.

नाशिक : नव्‍याने आढळणाऱ्या कोरोनाबाधितांच्‍या तुलनेत कोरोनावर मात केलेल्‍या रुग्णांची संख्या अधिक राहत असल्‍याने गेल्‍या काही दिवसांपासून ॲक्‍टिव्‍ह रुग्णसंख्येत घट होते आहे. रविवारी (ता. २५) दिवसभरात नाशिक महापालिका हद्दीत १६९ नवीन कोरोनाबाधित आढळले, तर ३०३ रुग्णांनी कोरोनावर मात केली. यातून ॲक्‍टिव्‍ह रुग्णसंख्येत १३४ ने घट झाली आहे. सद्यःस्थितीत दोन हजार ९४५ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. दरम्‍यान, विजयादशमीची शासकीय सुटी असल्‍याने जिल्ह्याची माहिती मिळू शकली नाही. 

रविवारी (ता. २६) कोरोनामुळे शहरात एकाही कोरोनाबाधिताचा मृत्‍यू नसल्‍याने काहीसा दिलासा मिळाला. तसेच कोरोनाबाधितांपेक्षा कोरोनामुक्‍तांची संख्या अधिक राहिली. दिवसभरात १६९ बाधित आढळले असताना, ३०३ रुग्णांनी कोरोनावर मात केली. आतापर्यंत नाशिक महापालिका हद्दीत एकूण ६० हजार ९४९ बाधित आढळले असून, यांपैकी ५७ हजार १५१ रुग्णांनी कोरोनावर मात केली. आतापर्यंत ८५३ रुग्णांचा कोरोनामुळे उपचारादरम्‍यान मृत्‍यू झाला. शासकीय सुटीमुळे जिल्‍हा रुग्णालयातील कार्यालय बंद असल्‍याने जिल्‍हास्‍तरावरील माहिती मिळू शकली नाही. 

हेही वाचा >  पिंपळगावच्या टोमॅटोचा देशभरात डंका! सव्वाचारशे कोटी शेतकऱ्यांच्या पदरात 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: number of active corona patients decreased by 134 nashik marathi news