CoronaUpdate : जिल्ह्यात ४८ दिवसांनंतर रुग्णसंख्या पाचशेपेक्षा कमी; तर १ हजार ७५ रुग्ण बरे

अरुण मलाणी
Sunday, 11 October 2020

गेल्‍या काही दिवसांपासून नव्‍याने आढळणाऱ्या कोरोनाबाधितांची संख्या घटत आहे. गेल्‍या ९ ऑगस्‍टला जिल्ह्यात ४२४ बाधित आढळून आले होते. त्‍यानंतर २४ ऑगस्‍टला ४२९ बाधित आढळले.

नाशिक : ऑक्‍टोबर महिन्‍यात बहुतांश वेळा दिवसभरात आढळणाऱ्या कोरोनाबाधितांची संख्या एक हजारच्‍या आत होती. त्‍यातच रविवारी (ता. ११) जिल्ह्यात ४२९ जणांचे कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आले. यापूर्वी गेल्‍या २४ ऑगस्‍टला ४२९ कोरोनाबाधित आढळले होते. त्यानंतर तब्‍बल ४८ दिवसांनंतर दिवसभरातील बाधितांची संख्या पाचशेपेक्षा कमी राहिली. दुसरीकडे दिवसभरात कोरोनामुक्‍त झालेल्‍या रुग्‍णांची संख्याही नव्‍याने आढळलेल्‍या बाधितांपेक्षा दुप्पटीहून अधिक राहिली. एक हजार ७५ रुग्‍ण दिवसभरात कोरोनामुक्‍त झाले, तर दहा रुग्‍णांचा मृत्‍यू झाला. 

कोरोनाबाधितांची संख्येत घट

गेल्‍या काही दिवसांपासून नव्‍याने आढळणाऱ्या कोरोनाबाधितांची संख्या घटत आहे. गेल्‍या ९ ऑगस्‍टला जिल्ह्यात ४२४ बाधित आढळून आले होते. त्‍यानंतर २४ ऑगस्‍टला ४२९ बाधित आढळले. तेव्‍हापासून नव्‍याने आढळणाऱ्या कोरोनाबाधितांचा आलेख वाढतच होता. ऑक्‍टोबर महिन्‍यात बहुतांश दिवशी एक हजारांहून कमी रुग्‍ण आढळले. रविवारी आढळलेल्‍या बाधितांमध्ये नाशिक शहरातील २९४, नाशिक ग्रामीणचे ११८, मालेगावचे सात, तर जिल्‍हाबाह्य दहा रुग्‍णांचा समावेश आहे. कोरोनामुक्‍त झालेल्‍या रुग्‍णांमध्ये नाशिक शहरातील ८१६, नाशिक ग्रामीणचे २४९, मालेगावचे पाच, तर जिल्‍हाबाह्य पाच रुग्ण आहेत. दहा मृतांमध्ये नाशिक शहरातील दोन, नाशिक ग्रामीणचे सहा, मालेगाव महापालिका हद्दीतील एक आणि जिल्‍हाबाह्य एका रुग्‍णाचा मृत्यू झाल्याची नोंद आहे. 

हेही वाचा > हाउज द जोश : 69 वर्षीय 'आजी'ने हरिहर किल्ला केला सर; तोही अवघ्या चार तासांत! पाहा VIDEO

एक हजार ५२३ रुग्‍णांचा मृत्‍यू

यातून जिल्ह्यातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या ८५ हजार ५११ झाली असून, यापैकी ७६ हजार २४८ रुग्‍णांनी कोरोनावर मात केली आहे. आतापर्यंत एक हजार ५२३ रुग्‍णांचा मृत्‍यू झाला असून, सद्यःस्‍थितीत सात हजार ७४० बाधितांवर उपचार सुरू आहेत. दिवसभरात नाशिक महापालिका रुग्‍णालये व गृहविलगीकरणात ७४२ संशयित, नाशिक ग्रामीण रुग्‍णालये व गृहविलगीकरणात ३५, मालेगाव महापालिका रुग्‍णालये व गृहविलगीकरणात १४, डॉ. वसंत पवार वैद्यकीय महाविद्यालयात १२, तर जिल्‍हा रुग्‍णालयात पाच संशयित दाखल झाले. सायंकाळी उशिरापर्यंत एक हजार ६५६ अहवाल प्रलंबित होते. यापैकी एक हजार ११५ अहवाल नाशिक ग्रामीण भागातील रुग्‍णांचे आहेत. 

हेही वाचा >  अशी ही माणुसकी! रस्त्यात सापडलेले पन्नास हजार केले परत; प्रामाणिकपणाचे सर्वत्र कौतुक


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: number of patients in the district is less than 500 nashik marathi news