चिंताजनक! जिल्ह्यात रुग्णसंख्येने ओलांडला साठ हजारांचा टप्पा; तर दिवसभरात एक हजार ४९६ रुग्ण कोरोनामुक्त

अरुण मलाणी
Saturday, 19 September 2020

तर नाशिक ग्रामीण रुग्‍णालये व गृहविलगीकरणात १५९, मालेगाव महापालिका क्षेत्रातील रुग्‍णालये व गृहविलगीकरणात ४१, डॉ. वसंतराव पवार वैद्यकीय महाविद्यालयात २९, तर जिल्‍हा रुग्‍णालयात १२ संशयित दाखल झाले आहेत. सायंकाळी उशिरापर्यंत एक हजार ४३८ अहवाल प्रलंबित होते. यांपैकी ९६१ अहवाल नाशिक ग्रामीणचे आहेत.

नाशिक : जिल्ह्यातील एकूण कोरोनाबाधितांच्या संख्येने ६० हजारांचा टप्पा ओलांडला आहे. शुक्रवारी (ता. १८) दिवसभरात एक हजार ५३५ कोरोनाबाधित आढळले, तर एक हजार ४९६ रुग्‍णांनी कोरोनावर मात केली. तेरा रुग्‍णांचा मृत्‍यू झाला असून, यातून ॲक्‍टिव्‍ह रुग्‍णसंख्येत २६ ने वाढ झाली आहे. 

नव्याने आढळले एक हजार ५३५ बाधित

शुक्रवारी आढळलेल्‍या कोरोनाबाधितांमध्ये नाशिक शहरातील एक हजार १५२, नाशिक ग्रामीणचे ३२४, मालेगावचे ४५, तर जिल्‍हाबाह्य १४ रुग्ण आहेत. बरे झालेल्‍या रुग्‍णांमध्ये नाशिक शहरातील ९८८, ग्रामीणचे ४५०, मालेगावचे ४६, तर जिल्‍हाबाह्य १२ रुग्णांचा समावेश आहे. तेरा मृतांमध्ये नाशिक शहरातील नऊ, नाशिक ग्रामीणचे तीन, मालेगाव महापालिका हद्दीतील एका बाधिताचा मृत्‍यू झाल्याची नोंद आहे. जिल्ह्यातील एकूण बाधितांची संख्या ६१ हजार १२० वर पोचली आहे. ४९ हजार ६१९ रुग्‍णांनी कोरोनावर मात केली आहे. एक हजार १३९ रुग्‍णांचा कोरोनामुळे मृत्‍यू झाल्‍याची नोंद आहे. दरम्‍यान, दिवसभरात नाशिक महापालिका रुग्‍णालये व गृहविलगीकरणात एक हजार ९०८ संशयित आढळले, तर नाशिक ग्रामीण रुग्‍णालये व गृहविलगीकरणात १५९, मालेगाव महापालिका क्षेत्रातील रुग्‍णालये व गृहविलगीकरणात ४१, डॉ. वसंतराव पवार वैद्यकीय महाविद्यालयात २९, तर जिल्‍हा रुग्‍णालयात १२ संशयित दाखल झाले आहेत. सायंकाळी उशिरापर्यंत एक हजार ४३८ अहवाल प्रलंबित होते. यांपैकी ९६१ अहवाल नाशिक ग्रामीणचे आहेत.

मालेगावला मनपा कर्मचाऱ्यासह तिघांचा मृत्यू 

मालेगाव : शहर व तालुक्यात २४ तासांत महापालिका कर्मचाऱ्यासह दोन कोरोनाबाधित व एक संशयित असा तिघांचा मृत्यू झाला. शहरातील कोरोनाबळींची संख्या १३८, तर तालुक्यातील ४३ झाली आहे. शुक्रवारी नव्याने ४५ रुग्ण आढळून आले, तर महापालिकेच्या दोन्ही कोविड केअर केंद्रांत ४१ रुग्ण दाखल झाले. शहरातील ५९६ रुग्णांवर सध्या उपचार सुरू आहेत. तालुक्यातील रुग्णसंख्येने ३०० चा टप्पा ओलांडला आहे. गृहविलगीकरणासह झोडगे व दाभाडी केंद्रावर उपचार घेणाऱ्या रुग्णांची संख्या ३१२ झाली आहे. शहरातील २०० अहवाल प्रलंबित आहेत.

हेही वाचा > मनाला चटका लावणारी बातमी : मुलाचा विरह अन् आई-वडिलांसह तिघांची निघाली अंत्ययात्रा; परिसरात हळहळ

मनपाच्या पाच कर्मचाऱ्यांचा बळी 

महापालिका प्रभाग एकचे लिपिक ज्ञानेश्‍वर बाळासाहेब पवार (वय ४०)गेल्या आठवड्यापर्यंत शहरातील मालमत्ता कराच्या नोटीसवाटपाचे काम सोयगाव व नववसाहत भागात करत होते. त्याचदरम्यान त्यांना कोरोना संसर्ग झाला. महापालिकेचे विद्युत अधीक्षक अभिजित पवार व सामाजिक कार्यकर्ते निखिल पवार यांचे ते बंधू होत. यापूर्वी महापालिकेतील सफाई कामगार निर्मलाबाई अहिरे, लिपिक कुंदन अवस्थी, विलास हिरे व गेल्या आठवड्यात क्षयरोग प्रयोगशाळा पर्यवेक्षक अनिल सोनवणे या चौघांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. महापालिकेतील पाच कर्मचाऱ्यांचा बळी गेल्याने महापालिका अधिकारी, कर्मचाऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण आहे.

हेही वाचा > थरारक दृश्य! नदीच्या पूरात वाहून गेली कार; अतिघाईच्या नादात घडला थरार; पाहा VIDEO

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The number of patients exceeded Stage of sixty thousand nashik marathi news