अरे व्वा! नवीन रुग्णांच्या संख्येपेक्षा बरे होणाऱ्यांची संख्या वाढतेय; जिल्‍हावासीयांसाठी दिलासादायक बाब

अरुण मलाणी
Wednesday, 19 August 2020

गेल्‍या काही दिवसांपासून जिल्‍हाभरात नव्याने आढळणाऱ्या कोरोनाबाधितांच्‍या तुलनेत बरे होऊन घरी परतणाऱ्या रुग्‍णांची संख्या अधिक असल्‍याचे दिसून येत आहे. यातून ॲक्टिव्‍ह रुग्‍णसंख्येत घट होत असून, जिल्‍हावासीयांसाठी ही दिलासादायक बाब आहे.

नाशिक : गेल्‍या काही दिवसांपासून जिल्‍हाभरात नव्याने आढळणाऱ्या कोरोनाबाधितांच्‍या तुलनेत बरे होऊन घरी परतणाऱ्या रुग्‍णांची संख्या अधिक असल्‍याचे दिसून येत आहे. यातून ॲक्टिव्‍ह रुग्‍णसंख्येत घट होत असून, जिल्‍हावासीयांसाठी ही दिलासादायक बाब आहे.

चक्क इतक्या रुग्‍णांची कोरोनावर मात

मंगळवारी (ता. १८) नव्‍याने ६२२ कोरोनाबाधित आढळले असताना बरे झालेल्‍या रुग्‍णांची संख्या ८९५ होती. गेल्‍या तीन दिवसांत अनुक्रमे २७८, २०४ आणि २८२ इतक्‍या संख्येने ॲक्टिव्‍ह रुग्‍णांची संख्या घटली. १५ ऑगस्‍टला पाच हजार ११५ असलेली ॲक्टिव्‍ह रुग्‍णसंख्या आता चार हजार ३५१ झाली आहे. जिल्ह्यात २५ हजार ९१० रुग्‍ण आढळून आले असून, यापैकी २० हजार ८४६ रुग्‍णांनी कोरोनावर मात केली आहे. बरे झालेल्‍या रुग्‍णांचे प्रमाण ८०.४४ टक्‍के आहे. 

हेही वाचा >दुर्दैवी! बैलपोळ्याच्या पूर्वसंध्येला अचानक आलेल्या 'त्या' बातमीने ममदापूर हळहळले..काय घडले नेमके?

ही वाढ दिलासादायक
रुग्‍णसंख्येत होणारी वाढ चिंताजनक वाटू लागली असतानाच, बरे झालेल्‍या रुग्‍णांच्या प्रमाणात झालेली वाढ दिलासादायक आहे. नाशिक शहरात आढळलेल्‍या १७ हजार ४२० रुग्‍णांपैकी १४ हजार ६६६ रुग्‍णांनी कोरोनावर मात केली असून, ॲक्टिव्‍ह रुग्‍णांची संख्या दोन हजार ३४९ आहे. ग्रामीण भागात सहा हजार २२० रुग्‍ण आढळले असून, चार हजार ६५४ रुग्‍णांनी कोरोनावर मात केली आहे. त्यामुळे ॲक्टिव्‍ह रुग्‍ण एक हजार ३७६ आहेत. मालेगाव महापालिका क्षेत्रात आढळलेल्‍या दोन हजार ७८ रुग्‍णांपैकी एक हजार ३६४ रुग्‍ण कोरोनामुक्‍त झाले असून, ६१७ ॲक्टिव्‍ह रुग्‍ण आहेत. 
दरम्‍यान, मंगळवारी (ता. १८) आढळलेल्‍या कोरोनाबाधितांपैकी ४५२ शहरातील, १३४ ग्रामीण भागातील, ३३ मालेगावचे, तर जिल्‍हाबाह्य तीन रुग्ण आहेत. बरे झालेल्‍या रुग्‍णांमध्ये १६६ ग्रामीणमधील, ७०६ रुग्‍ण नाशिक शहरातील, मालेगावचे २१, तर जिल्‍हाबाह्य दोघांचा समावेश आहे. नाशिक शहरातील पाच, ग्रामीणमधील चार रुग्‍णांचा कोरोनामुळे मृत्‍यू झाल्‍याची नोंद असून, मृतांची संख्या ७१३ झाली आहे. दिवसभरात नाशिक महापालिका रुग्‍णालये व गृहविलगीकरणात ३९३ रुग्‍ण, ग्रामीण रुग्‍णालये व गृहविलगीकरणात २४१, जिल्‍हा रुग्‍णालयात १३, डॉ. वसंतराव पवार वैद्यकीय महाविद्यालयात सहा, तर मालेगाव महापालिका रुग्‍णालय व गृहविलगीकरणात ३० संशयित ठेवण्यात आले आहेत. 

हेही वाचा > धाबे दणाणले! नियुक्ती होऊनही उमेदवार कामावर नाही?कारवाई तर होणारच

कोरोनाबाधितांच्‍या तुलनेत बरे होणाऱ्या रुग्‍णांचे प्रमाण असे 
तारीख नवीन रुग्‍ण बरे झालेले रुग्‍ण 
१५ व १६ ऑगस्‍ट १,०८६ १,३५१ 
१७ ऑगस्‍ट ८३१ १,०२० 
१८ ऑगस्‍ट ६२२ ८९५  


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: number of recoveries is increasing more than the new patients nashik marathi news