इथेही माणुसकी मेली..! शेवटी कुटुंबाने नाहीच स्वीकारला माऊलीचा मृतदेह...मरणानंतरही फरफटच...

satana old woman.jpg
satana old woman.jpg
Updated on

नाशिक / सटाणा : आयुष्यभर मोलमजुरी आणि काबाडकष्ट करून कुटुंबाला घडवले... डोळ्यासमोर एकुलता एक मुलगा आणि सुनेचा मृत्यू बघितला... त्यांच्या निधनानंतर नातवासोबत राहत असलेली, लॉकडाऊनमुळे गेल्या तीन महिन्यांपूर्वी कुटुंबापासून दुरावलेली, गावोगावी भटकून, भीक मागून मिळेल तिथे भाजी-भाकरी खाऊन दिवस काढणार्‍या एका ८५ वर्षीय वयोवृद्ध महिलेच्या नशिबी मरणानंतरही फरफटच आली.

असे फिरले नशीबचक्र की...

लॉकडाऊनचा फटका विंचुरे (ता.बागलाण) येथील पवार कुटुंबीयांनाही पडला. त्यांची उपासमार होऊ लागल्याने कुटुंबप्रमुख असलेली धन्याबाई मोतीराम पवार (वय ८५) ही वयोवृद्ध महिला अन्नाच्या शोधार्थ कुणालाही न सांगता घराबाहेर पडली. आणि भीक मागता मागता गावोगावी भटकंती केल्यानंतर सात दिवसांपूर्वी मोरेनगर (ता.बागलाण) येथे पोहोचली. उन्हातान्हात पायी चालल्याने तिच्या पायाला आणि कंबरेला गंभीर दुखापत झाली होती. वृद्ध जखमी महिलेची माहिती सामाजिक कार्यकर्ते व वन स्टॉप सेंटर समितीचे जिल्हा सदस्य शाम बगडाणे यांना समजताच त्यांनी तात्काळ रुग्णवाहिकेच्या सहाय्याने तिला सटाणा ग्रामीण रुग्णालयात दाखल केले तसेच या अनोळखी महिलेबाबत पोलिस ठाण्यात माहितीही दिली. 

कोरोनामुळे आजीचा मृत्यू झाल्याचा कुटुंबियांचा आरोप

बगडाणे यांनी पोलिस निरीक्षक नंदकुमार गायकवाड व पोलिस नाईक बी.आर.निरभवणे यांच्या सहाय्याने महिलेच्या कुटुंबियांचा शोध लावण्याचा पूर्ण प्रयत्न केला. मात्र त्यात अपयश येत होते. उपचारांना प्रतिसाद देत असतानाच अखेर शुक्रवारी (ता.२९) रोजी तिचे दुर्दैवी निधन झाले. ग्रामीण रुग्णालयातील शवागारात महिलेचा मृतदेह तीन दिवस ठेवण्यात आला. मात्र महिलेची ओळख पटविण्यासाठी कुणीही पुढे येत नसल्याने अखेर बगडाणे यांनीच महिलेचे पालकत्व स्वीकारून तिच्यावर अंत्यसंस्कार करण्याचे ठरवले. 
दरम्यान, सोशल मीडियावरील वृद्ध महिलेचे छायाचित्र बघून विंचुरे (ता.बागलाण) येथील पोलिसपाटील पोपट बच्छाव यांनी बगडाणे यांच्याशी संपर्क साधून महिला विंचुरे येथील संतोष पवार यांच्या आजी असल्याचे कळविले. त्यानुसार संतोषला घेऊन ते सटाणा येथे आले. मात्र कोरोनामुळे आजीचा मृत्यू झाल्याच्या भीतीने आम्ही तिचा मृतदेह घेणार नाही, अशी भूमिका नातू संतोषने घेतली.

समयसूचकता आणि सामाजिक बांधिलकी

यावेळी बगडाणे, राजेंद्र देवरे, पोलिस नाईक निरभवणे, पोलिसपाटील पोपट बच्छाव, खमताणेचे पोलिसपाटील योगेश बागूल आदींनी संतोषची समजून काढल्यानंतर त्याने धन्याबाई पवार या आपल्या आजीचा मृतदेह ताब्यात घेतला आणि विंचुरे येथे तिच्यावर अंत्यसंस्कार केले. शाम बगडाणे यांनी दाखविलेल्या समयसूचकता आणि सामाजिक बांधिलकीमुळे समाजात एक नवा आदर्श निर्माण झाला आहे. 

वृद्ध महिलेवर अखेर अंत्यसंस्कार

येथील सामाजिक कार्यकर्ते व वन स्टॉप सेंटर समितीचे जिल्हा सदस्य शाम बगडाणे यांनी सामाजिक बांधिलकी जोपासत या हरवलेल्या वृद्ध महिलेची सेवाशुश्रूषा केली. दुर्दैवाने निधन झाल्यानंतर कुटुंबियांनी कोरोनाच्या भीतीने तिचा मृतदेह घेण्यास स्पष्ट नकार दिला. अखेर बगडाणे यांच्या समयसूचकतेमुळे वृद्ध महिलेवर घरी अंत्यसंस्कार झाले. 

वृद्ध महिलेची अवस्था बिकट
उपाशीपोटी अनवाणी, जखमी अवस्थेत फिरत असलेल्या धन्याबाई पवार या वृद्ध महिलेची अवस्था बिकट होती. लॉकडाऊन काळात महिलेचे पुढील भवितव्याचे काय होईल, या शंकेने तिची विचारपुस केल्यावर नावाव्यतिरिक्त तिला काहीच सांगता येत नव्हते. दुर्दैवाने तिचे निधन झाले याचे दु:ख आहे. मात्र पोलिस विभाग, ग्रामीण रुग्णालय, विंचुरे व खमताणे येथील पोलिस पाटील यांच्या मदतीमुळेच तिच्या कुटुंबियांचा शोध लावण्यात यश आले आणि रीतसर तिच्यावर अंत्यसंस्कार झाल्याचे समाधान आहे.  - शाम बगडाणे, सदस्य, वन स्टॉप सेंटर समिती, महिला व बाल विकास विभाग, महाराष्ट्र शासन.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com