'ग्राहकांनो, कांदा खरेदीकडील हात आखडता घ्यावा लागणार वाटतंय!'...कारण

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 26 मार्च 2020

संसर्ग रोखण्यासाठी गर्दी आणि उपाययोजनांबरोबर मजुरांच्या उपलब्धतेचा प्रश्‍न गंभीर बनला आहे. त्यामुळे पहिल्यांदा पिंपळगाव बसवंतमधील व्यापाऱ्यांनी लिलाव अनिश्‍चित काळासाठी बंद ठेवण्याची भूमिका स्वीकारली होती. आता लासलगाव बाजार समितीत झालेल्या बैठकीनंतर व्यापाऱ्यांनी अनिश्‍चित काळासाठी कांदा आणि धान्य लिलाव बंद ठेवण्यात येणार असल्याचे पत्र दिले आहे.

नाशिक/लासलगाव : आशिया खंडातील सर्वांत मोठ्या पिंपळगाव बसवंत पाठोपाठ लासलगाव बाजार समितीमधील कांद्याचे लिलाव बंद राहणार आहेत. त्यामुळे कांद्याचा पुरवठा कमी होऊन भाव गगनाला भिडून शंभर रुपये किलोपर्यंत कांदा पोहचण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. 

अनिश्‍चित काळासाठी कांदा आणि धान्य लिलाव बंद ठेवण्यात येणार

कोरोना विषाणू संसर्ग रोखण्यासाठी लागू झालेल्या संचारबंदीच्या पार्श्‍वभूमीवर कामासाठी मजूर मिळणे मुश्‍कील झाले असल्याने व्यापाऱ्यांना अनिश्‍चित काळासाठी लिलाव बंद ठेवण्याचे पत्र बाजार समित्यांना दिले आहेत. जीवनावश्‍यकमध्ये अन्नधान्य, भाजीपाला, कांदा, द्राक्षे, डाळिंब येत असल्याने बाजार समित्यांमधील लिलाव सुरळीत ठेवण्याच्या सूचना पणन विभागाने दिल्या आहेत. त्याबद्दलची भूमिका सातत्याने जिल्हा प्रशासनाबरोबर जिल्हा उपनिबंधक गौतम बलसाणे यांनी स्पष्ट केली होती. याच पार्श्‍वभूमीवर व्यापाऱ्यांनी लिलाव सुरू ठेवले होते. मात्र संसर्ग रोखण्यासाठी गर्दी आणि उपाययोजनांबरोबर मजुरांच्या उपलब्धतेचा प्रश्‍न गंभीर बनला आहे. त्यामुळे पहिल्यांदा पिंपळगाव बसवंतमधील व्यापाऱ्यांनी लिलाव अनिश्‍चित काळासाठी बंद ठेवण्याची भूमिका स्वीकारली होती. आता लासलगाव बाजार समितीत झालेल्या बैठकीनंतर व्यापाऱ्यांनी अनिश्‍चित काळासाठी कांदा आणि धान्य लिलाव बंद ठेवण्यात येणार असल्याचे पत्र दिले आहे. बाजार समितीचे सचिव नरेंद्र वाढवणे यांनी ही माहिती दिली. 

हेही वाचा > COVID-19 : ''लेकरं घरी वाट बघताय आम्हाला घरी जायचंय!''...पोटा पाण्यासाठी आले अन् अडकून पडले

निर्यातीसाठीची कसरत 

देशांतर्गत कांद्याचा तुटवडा निर्माण झाल्यानंतर 17 डिसेंबरला लासलगाव बाजार समितीत लाल कांद्याने 11 हजार 111 रुपयांचा टप्पा पार केला होता. 15 मार्चला निर्यात खुली झाल्यावर जिल्ह्यातील बाजार समित्यांमधील कांद्याचे भाव घसरण्यास सुरवात झाली होती. एक हजार ते बाराशे रुपये क्विंटल भावाने शेतकऱ्यांना कांदा विकावा लागला. गेल्या आठवड्याच्या अखेरीस देशातंर्गत मागणी वाढल्याने कोसळणाऱ्या भावाला लगाम लागून भावात हळूहळू सुधारणा होण्यास सुरवात झाली होती. दुसरीकडे मात्र कांद्याच्या निर्यातीसाठी व्यापाऱ्यांना कसरत करावी लागत होती. त्यामुळे जागतिक परिस्थिती पूर्वपदावर येईपर्यंत अनेक निर्यातदारांनी या आठवड्यात कांदा खरेदीकडील हात आखडता घेतला होता. मंगळवार (ता.24) ची अमावास्या आणि बुधवार (ता. 25) चा पाडवा या पार्श्‍वभूमीवर लिलाव बंद ठेवण्यात आले होते.  

हेही वाचा > नाशिककर अन्‌ मुंबईकरांना मिळणार 'चिकन - अंडी'!...भुजबळांमुळे प्रश्‍न मार्गी

 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Onion prices are likely to rise nashik marathi news