esakal | कांद्याच्या भावात क्विंटलला 'इतक्यांनी' रुपयांची वाढ; सर्वपित्री अमावस्येनिमित्त लिलाव बंद
sakal

बोलून बातमी शोधा

onion price 4.jpg

कांदा निर्यातबंदीच्या विरोधात एकीकडे शेतकऱ्यांच्या भडकलेल्या आंदोलनाची धग दुसऱ्या दिवशीही कायम राहिली असताना दिलासादायक बाब म्हणजे, मंगळवार (ता. १५)च्या तुलनेत बुधवारी (ता. १६) बाजारभावात क्विंटलला वाढ झाली. त्यामुळे एक हजार ९०० रुपयांपर्यंत घसरलेला कांद्याचा भाव अडीच हजार रुपयांपर्यंत पोचला. लासलगाव, येवला, मुंगसेमध्ये अडीच हजार, तर पिंपळगावमध्ये दोन हजार ६५१ रुपये असा सरासरी भाव मिळाला. 

कांद्याच्या भावात क्विंटलला 'इतक्यांनी' रुपयांची वाढ; सर्वपित्री अमावस्येनिमित्त लिलाव बंद

sakal_logo
By
महेंद्र महाजन

नाशिक : कांदा निर्यातबंदीच्या विरोधात एकीकडे शेतकऱ्यांच्या भडकलेल्या आंदोलनाची धग दुसऱ्या दिवशीही कायम राहिली असताना दिलासादायक बाब म्हणजे, मंगळवार (ता. १५)च्या तुलनेत बुधवारी (ता. १६) बाजारभावात क्विंटलला १०० ते ६७६ रुपयांची वाढ झाली. त्यामुळे एक हजार ९०० रुपयांपर्यंत घसरलेला कांद्याचा भाव अडीच हजार रुपयांपर्यंत पोचला. लासलगाव, येवला, मुंगसेमध्ये अडीच हजार, तर पिंपळगावमध्ये दोन हजार ६५१ रुपये असा सरासरी भाव मिळाला. 

सर्वपित्री अमावस्येनिमित्त आज बंद; पाटण्याला ८०० टन कांदा रवाना 
सर्वपित्री अमावस्येनिमित्त गुरुवारी (ता. १७) बहुतांश बाजार समित्यांमधील लिलाव बंद राहतील. याच पार्श्‍वभूमीवर सटाणा भागात बुधवारी कांद्याची आवक मोठ्या प्रमाणात झाली. मात्र इतर बाजार समित्यांमधून फारशी आवक झाली नाही. दोन दिवसांमध्ये एक लाख दहा हजार क्विंटलच्या आसपास आवक झालेला कांदा देशांतर्गत बाजारपेठेत रवाना झाला आहे. पाटण्यासाठी मनमाडहून ८०० टनांचा रेक रेल्वेने रवाना झाला.

कांद्याच्या भावात क्विंटलला १०० ते ६७६ रुपयांची वाढ 

याशिवाय उत्तर प्रदेश, केरळ, पश्‍चिम बंगाल, आसाम आणि दक्षिणेत विक्रीसाठी ट्रकने कांदा पाठविण्यात आला आहे. देशांतर्गत मागणी कायम राहिल्याने निर्यातबंदीच्या दुसऱ्या दिवशी कोसळलेले भाव पूर्वपदावर येण्यास सुरवात झाली आहे. यापूर्वी निर्यातबंदी करण्यात आली असताना ४० रुपये किलो हा भाव शंभर रुपयांपर्यंत पोचला होता. त्याची पुनरावृत्ती आताही होणार काय, याकडे शेतकऱ्यांच्या नजरा लागल्या आहेत. बुधवारी लिलावासाठी बियाणे उत्पादक कंपन्यांच्या प्रतिनिधींनी उपस्थित राहून जिल्ह्याच्या विविध बाजारातून खरेदी केल्याची माहिती व्यापाऱ्यांनी दिली. 

हेही वाचा > जिवलग मित्रांची 'ती' सहल शेवटचीच! कोरोना काळात पर्यटनस्थळ बंदी नावालाच; प्रशासनाची भूमिका संशयास्पद 

अडविलेल्या कांद्याचे घोंगडे भिजत 
कांदा निर्यातबंदीचा अध्यादेश निघण्यापूर्वी मुंबई, चेन्नई, तुतीकोरीन बंदरात कंटेनर आणि बांगलादेश, भूतान, नेपाळच्या सीमेवर ट्रक अडविण्यात आले. निर्यातीसाठी रवाना होत असलेला आणि अडविण्यात आलेल्या कांद्याची माहिती केंद्र सरकारने मागविली होती. मात्र बुधवारी दुसऱ्या दिवशीही त्याबद्दल निर्णय होऊ शकला नाही. त्यामुळे निर्यातदारांच्या संघटनेने त्याविरुद्ध न्यायालयात दाद मागता येईल काय, याची कायदेविषयक माहिती घेण्यास सुरवात केली आहे. बांगलादेश सरकारने केंद्र सरकारला कांद्याची निर्यात मागे घेण्याची विनंती केल्याची माहिती निर्यातदारांपर्यंत पोचली आहे. 

हेही वाचा > धक्कादायक! जिल्हा रुग्णालयात गळफास घेऊन युवकाची आत्महत्या; कुटुंबियांचा आक्रोश 

राज्य सरकार करणार केंद्राला विनंती 
कांदा निर्यातबंदीसंबंधी बुधवारी राज्य मंत्रिमंडळात सदस्यांनी तीव्र भावना व्यक्त केल्या. त्यानंतर केंद्राला तातडीने पत्र पाठविण्यात येईल आणि पाठपुरावा करून निर्यातबंदी उठविण्यासंबंधी प्रयत्न करण्यात येतील, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितले. उपमुख्यमंत्री अजित पवार, अन्न व नागरी पुरवठामंत्री, छगन भुजबळ, महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी याबाबत बैठकीत भूमिका मांडली. प्रधान सचिव अनुप कुमार यांनी माहिती दिली, की २०१८-१९ मध्ये २१ लाख ८३ हजार टन, २०१९-२० मध्ये १८ लाख ५० हजार टन कांद्याची निर्यात झाली. मंत्री एकनाथ शिंदे यांनी मुंबईच्या जवाहरलाल नेहरू बंदरात चार लाख टन कांदा पडून असून, बांगलादेश, नेपाळ सीमेवर पाचशे ट्रक थांबून असल्याची माहिती दिली. 

कांद्याच्या भावाची स्थिती 
(आकडे क्विंटलला सरासरी रुपयांमध्ये) 

बाजारपेठ बुधवार (ता. १६) मंगळवार (ता. १५) 
लासलगाव २ हजार ५०० १ हजार ९०१ 
मनमाड २ हजार ३०० २ हजार २०० 
सटाणा २ हजार ४५० २ हजार ४७५ 
पिंपळगाव २ हजार ६५१ २ हजार २५१ 
दिंडोरी २ हजार १२२ २ हजार १०० 
नामपूर २ हजार ४५० २ हजार ३५० 
मुंगसे २ हजार ५०१ १ हजार ८२५ 
नाशिक २ हजार ४०० २ हजार ३००  

संपादन - ज्योती देवरे