रोपांच्या तुटवड्यामुळे कांदा उत्पादन घटणार; यंदा ५० ते ७० हजार हेक्टर लागवड कमी

बाबासाहेब कदम
Saturday, 10 October 2020

पुढील वर्षांच्या बियाण्यांसाठी साधारणतः ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये लागवड केली जाते. मात्र गत वर्षी कांद्याला भाव चांगला असल्यामुळे शेतकऱ्यांनी बहुसंख्य कांदा विकला. त्यामुळे अनेकांना बियाणे तयार करता आले नाही.

नाशिक : (बाणगाव बुद्रुक) जिल्ह्यात कांदा रोपांचा मोठ्या प्रमाणात तुटवडा निमार्ण झाला आहे. कांदा लागवडीसाठी तयार रोपांच्या शोधासाठी शेतकऱ्यांची गावोगाव भटकंती सुरू असल्याचे चित्र सध्या ग्रामीण भागात पाहावयास मिळत आहे. काही ठिकाणी बियाणे उपलब्ध असल्याने त्याची कुठलीही शास्वती मिळत नसल्याने ते घेण्याबाबत शेतकऱ्यांची संभ्रमावस्था निमार्ण झाली आहे. 

कांदा लागवडीचे क्षेत्र घटण्याचा अंदाज

रोपांचा तुटवड्यामुळे या वर्षी जिल्ह्यातील कांदा लागवडीचे क्षेत्र ५० ते ७० हजार हेक्टरने घटण्याचा अंदाज वर्तविला जात आहे. त्यामुळे एकंदरीत उत्पादन घटण्याची शक्यता निर्माण झाली आहे. महाराष्ट्राच्या एकूण कांदा उत्पादनापैकी फक्त नाशिक जिल्ह्यात ५० टक्के कांदा उत्पादन होते. सटाणा, मालेगाव, चांदवड, नांदगाव, येवला, कळवण, देवळा या तालुक्यांमध्ये प्रामुख्याने कांदा पिकाची मोठ्या प्रमाणात लागवड केली जाते. खरीप, लेट खरीप आणि रब्बी (उन्हाळ) अशा तीन हंगामात कांदालागवड केली जाते. सध्या उन्हाळ कांदा लागवडीसाठी शेतकरी बियाण्यांचा शोध घेत आहेत. 

पयार्याने उत्पादनातही घट होणार

गत वर्षी पावसामुळे कांद्याचे नुकसान झाल्याने अनेकांना घरचे बियाणे तयार करता आले नाही. ज्यांच्याकडे बियाणे होते त्यांना निसर्गाने साथ दिली नाही. जुलै-सप्टेंबर महिन्यात अतिवृष्टीमुळे रोपांचे नुकसान झाले आहे. त्यातच कांदा बियाण्यांना मोठ्या प्रमाणात भाव वाढला असून, दहा हजारांपासून १५ हजार रुपये पायलीपर्यंत दर गेले. तयार रोप एक एकर लागवडीसाठी ७० हजार रुपयांपर्यंत भाव गेल्याने अनेकांच्या तोंडचे पाणी पळाले आहे. याशिवाय बियाणे उत्पादक कंपण्यांकडेही या वर्षी बियाणे उपलब्ध नसल्याने या वर्षी कांदा लागवडीत पयार्याने उत्पादनातही घट निर्माण होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. 

म्हणून कांदा बियाण्यांची टंचाई

एक हेक्टरवरील कांदा लागवडीसाठी साधारणत दहा किलो बियाणे लागते. ८० ते ८५ टक्के शेतकरी घरचे बियाणे वापरतात, तर दहा ते २० टक्के शेतकरी कंपन्यांच्या बियाण्याला पसंती देतात. मागील वर्षी जिल्ह्यात दोन लाख ७५ हजार क्विंटल बियाणे उपलब्ध होते. गत वर्षी एक लाख ७१ हजार हेक्टरवर कांदालागवड झाली होती. पुढील वर्षांच्या बियाण्यांसाठी साधारणतः ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये लागवड केली जाते. मात्र गत वर्षी कांद्याला भाव चांगला असल्यामुळे शेतकऱ्यांनी बहुसंख्य कांदा विकला. त्यामुळे अनेकांना बियाणे तयार करता आले नाही. अकोला आणि बुलढाणा परिसरात कांदा बिजोत्पाद होते. मात्र गत वर्षी गारपीट झाल्याने तिकडेही उत्पादन कमी झाल्याने कांदा बियाण्यांची टंचाई निर्माण झाली आहे. 

हेही वाचा > दुर्दैवी : सलग चार वर्षे द्राक्षाचे उत्पन्नच नाही; बेपत्ता शेतकऱ्याच्या आत्महत्येचा खुलासा

कांदा लागवडीसाठी दोन वेळेस बियाणे टाकले; पण अतिवृष्टीमुळे रोप खराब झाले. आता तिसऱ्या वेळेस बियाणे टाकले. त्यास दररोज पहाटे फवारणी करावी लागते. जेवढे किमतीचे बियाणे तेवढ्याच खर्च फवारणीसाठी येतो. लागवडीसाठी रोप तयार करतात मोठी कसरत करावी लागत आहे. - किशोर आहेर, बाणगाव 

या वर्षी पाऊस वेळेवर व समाधानकारक असल्याने शेतीत चांगले उत्पन्न होईल, अशी अपेक्षा होती; पण अतिवृष्टीमुळे होत्याचे नव्हते झाले. दोन वेळेस कांदा रोपांचे नुकसान झाले. हातातोंडाशी आलेला घास गेला. आता अपेक्षा रब्बी कांद्याची; पण त्यासाठी शेत तयार आहे, पाणी आहे, पण रोप नसल्याने काहीच करता येत नाही. - रामेश्वर कवडे, बाणगाव  

हेही वाचा > पाकिस्तानला खबरी देणाऱ्या दीपक शिरसाठचा उद्योग HAL ला पडणार महागात! सुरक्षेला मोठे आव्हान

संपादन - किशोरी वाघ

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Onion production will decline due to shortage of seedlings nashik marathi news