Maka
Maka

कांदा, द्राक्षापाठोपाठ आता मकाही नाशिक जिल्ह्याचे प्रमुख पीक

नाशिक / येवला : कांद्याचा अन्‌ द्राक्षाचा जिल्हा अशी ओळख असलेला नाशिक जिल्हा आता मक्याचे सर्वाधिक पीक घेणारा जिल्हा म्हणूनही ओळखला जाऊ लागला आहे. यंदाच्या खरिपातील पाच लाख ६९ हजार हेक्‍टरवरील पेरणीपैकी तब्बल सव्वादोन लाख हेक्‍टर क्षेत्र मक्याच्या पिकाखाली गुंतविले आहे. कमी भांडवल, मर्यादित श्रम अन्‌ अधिक उत्पन्न देणारे पीक म्हणून या पिवळ्या सोन्याला जिल्ह्यातील दहा तालुक्‍यांत सर्वाधिक पसंती मिळत आहे.

एक हजार ७६० रुपयांचा हमीभाव निश्‍चित
जिल्ह्यातील पीक पॅटर्न गेल्या दोन-तीन वर्षांपासून बदलत आहे. यामध्ये मोठा बदल म्हणजे बाजरी, डाळी व तेलबियांचे क्षेत्र निम्म्याने घटले. याची जागा मक्यासह कांदा व भाजीपाला पिकाने घेतली आहे. विशेषतः सर्वाधिक क्षेत्र मक्याखाली गुंतविले जात असून, अत्यल्प खर्चात हे पीक निघत असल्याने शेतकऱ्यांना उत्तम पर्याय मिळाला आहे. प्रचंड प्रमाणात वाढलेल्या पोल्ट्री व स्टार्च उद्योगामुळे मक्याच्या मागणीत वाढ झाली आहे. या दोन्ही उद्योगांसाठी सांगली, सातारा, शिरपूर, दोंडाईचा येथे मागणी आहेच; पण गुजरात, तमिळनाडू, हरियाना, पंजाब आदी राज्यांत व युक्रेन, मलेशिया, व्हिएतनाम येथेही मोठ्या प्रमाणात मका निर्यात होतो. वाढलेल्या मागणीमुळे मागील वर्षी तर खासगी बाजारात दोन हजारांच्या आसपास दर पोचले होते. याशिवाय केंद्र शासनानेदेखील एक हजार ७६० रुपयांचा हमीभाव निश्‍चित केल्याने, मका पीक परवडणारे म्हणून शेतकऱ्यांकडून पसंती मिळत आहे.

यामुळे मक्याला सॉफ्ट कॉर्नर
खरिपाच्या सुरवातीला मका पीक घेऊन रब्बीतील गव्हासह उन्हाळ कांद्याचेही पीक घेता येते. बियाण्याच्या किमती मर्यादित, फक्त दोन-तीन फवारण्या, मर्यादित खते, आंतरमशागतीसह यंत्रामुळे काढणीचा खर्चही अल्प, जनावरांना चारा, तसेच काढणी करताना पाऊस असला तरी, बिट्या झाकून ठेवत केव्हाही मका तयार करून विक्री करता येते. शिवाय शासकीय हमीभावात विक्री केल्यास एक हजार ७६० रुपये दर निश्‍चितच असतो. यामुळेच मक्याला पसंती मिळत आहे. मक्याची सर्वाधिक लागवड येवला तालुक्यात झाली असून, त्याखालोखाल मालेगाव, बागलाण व नांदगावमध्ये मक्याखाली क्षेत्र गुंतले आहे, तर नाशिक, दिंडोरी, निफाडमध्ये अपेक्षेपेक्षा लागवड घटल्याचे आकडे सांगतात.

असे आहे अर्थशास्त्र
मक्याचे पीक १२० दिवसांत येते. जिल्ह्यातील जमिनीचा पोत बघता एकरी ३० ते ४०, तर सरासरी ३३ क्विंटल उत्पन्न मक्याचे निघते. शासकीय हमीभाव एक हजार ७६० रुपये गृहीत धरल्यास सरासरी ५० ते ६० हजारांचे उत्पन्न एका एकरातून मिळते. यातील सुमारे २० ते २५ हजारांचा खर्च जातो, तर अंदाजे ३० ते ४० हजार रुपये शेतकऱ्यांच्या हातात राहतात.

पोल्ट्री व स्टार्च उद्योगांमुळे मक्याला मागणी वाढली असून, गेल्या चार ते पाच वर्षांत जिल्ह्यातील मक्याचे उत्पादन वाढत आहे. परवडणारा भाव व कमी उत्पादन खर्च आणि केव्हाही पी विक्रीचा पर्याय, त्यातच हमीभावाने होणारी खरेदी या कारणांमुळेच शेतकरी मक्याकडे वळले आहेत. येथील मका तमिळनाडूसह युक्रेन, मलेशियात दर वर्षी पाठवितो. शेतकऱ्यांसाठी चार पैसे देणारे नगदी पीक म्हणून मक्याला पसंती मिळताना दिसते.-गोरख भागवत, मका व्यापारी, येवला

अशी होते पेरणी..
* खरीप हंगाम : १५ जून ते १५ जुलै
* रबी हंगाम : १५ ऑक्‍टोबर ते १५ नोव्हेंबर
* उन्हाळी : १ जानेवारी ते १५ फेब्रुवारी

जिल्ह्यातील मक्याचे क्षेत्र (हेक्टरमध्ये)
तालुका - पेरणी - टक्के
येवला : ३६,९७७ - १२१
मालेगाव : ३६,२३१- १०८
सटाणा : ३५,७५२ - १०३
कळवण : १९,३१७ - १०७
देवळा : १५,८५१ - १११
नांदगाव : ३१,२९० - ११५
नाशिक : २५१ - १८
त्र्यंबकेश्‍वर : ३५ - २०५
दिंडोरी : १,०१८ - ४८
इगतपुरी : ९२ - ४०
निफाड : ११,२७७ - ८१
सिन्नर : १६,८०१ - १२३
चांदवड : २१,१०० - १०२
एकूण : २,२४,९९५ - १०७ 

संपादन - ज्योती देवरे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com