जिल्हा परिषदेच्या १२ टक्के विद्यार्थ्यांना ऑनलाइन शिक्षण; सोशल मीडियाचाही फायदा

महेंद्र महाजन
Monday, 21 September 2020

तीन हजार २५७ शाळांमध्ये स्वच्छतागृह असून, नऊ ठिकाणी उपलब्ध नाही. तीन हजार २४२ शाळांमध्ये पिण्याच्या पाण्याची सुविधा आहे. २४ शाळांमध्ये ही सुविधा नाही. दोन हजार ५०९ शाळांमध्ये विद्युतीकरण झाले आहे. २०७ शाळांमध्ये विद्युतीकरण नाही. तसेच ५५० शाळांचे वीजबिल न भरल्याने वीज खंडित करण्यात आली आहे.

नाशिक : कोरोना विषाणू संसर्गाच्या काळात जिल्हा परिषदेच्या विद्यार्थ्यांच्या शिक्षणाची सोय व्हावी म्हणून मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड यांनी विविध उपक्रम राबविण्यास सुरवात केली. 'डोनेट अ डिव्हाइस' या चळवळीअंतर्गत एक हजार ४४३ उपकरणे भेट मिळाली आहेत. याशिवाय पहिली ते आठवीच्या एकूण दोन लाख ६७ हजार ७९४ विद्यार्थ्यांपैकी १२ टक्के म्हणजे ३२ हजार ८१ विद्यार्थ्यांची ऑनलाइन शिक्षणाची सोय झाली आहे.

८९ हजार १२ विद्यार्थ्यांना ‘फेस टू फेस’ शिक्षण

ऑनलाइन झूम, गुगल मीट, जिओ मीट, गुगल क्लासरुम, दिक्षा ॲपचा त्यात समावेश आहे. सोशल मीडियाच्या ॲपच्या माध्यमातून एक लाख तीन हजार ५८० विद्यार्थ्यांना अध्यापन केले जात आहे. दूरचित्रवाहिनी संच, रेडिओ, फोन कॉल, एसएमएस अशा ऑफलाइन पद्धतीने ९२ हजार १११ विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. ८९ हजार १२ विद्यार्थ्यांना ‘फेस टू फेस’ शिकविले जात आहे. जिल्ह्यात पहिली ते बारावीच्या विद्यार्थ्यांची संख्या १३ लाख सात हजार २२ आहे. जिल्हा परिषद, नगर परिषद, कटक मंडळ, सरकारी, खासगी अनुदानित, विनाअनुदानित, स्वयं अर्थसहाय्यित, महापालिका अशा पाच हजार ६२६ शाळांमधून या विद्यार्थ्यांना ४१ हजार २१७ शिक्षक अध्यापन करत आहेत.

व्यवस्थापननिहाय शाळांची विद्यार्थी आणि शिक्षकांची अनुक्रमे संख्या अशी

जिल्हा परिषद --- तीन हजार २७२ - दोन लाख ६७ हजार ७९४ - ११ हजार ६५५, 
नगर परिषद --- २२ - दोन हजार एक - ९०, 
कटक मंडळ --- चार - एक हजार ५७० - ४५, 
सरकारी --- ९७ - ४७ हजार ३२ - एक हजार ३७८, 
खासगी अनुदानित --- एक हजार १५२ - सहा लाख ७९ हजार ३८३ - १६ हजार ८३५, 
विनाअनुदानित --- १४७ - ३३ हजार २९५ - एक हजार ८५, 
स्वयंअर्थसहाय्यित --- ७४१ - दोन लाख २७ हजार ५५० - आठ हजार ६१४, 
महापालिका --- १९१ - ४७ हजार २१३ - एक हजार ४६५. 

मोबाईल, दूरचित्रवाणी संच भेट 

श्रीमती बनसोड यांनी राबवलेल्या ‘डोनेट अ डिव्हाइस’ उपक्रमांतर्गत स्मार्ट फोनपासून ते दूरचित्रवाणी संचापर्यंतची भेट विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी मिळाली आहे. भेट मिळालेल्या साहित्याची संख्या याप्रमाणे : स्मार्ट फोन- २३३, साधे फोन- १४७, टेबल- ४०, पेनड्राइव्ह- २७९, दूरचित्रवाणी संच- ३५, संगणक डेक्सटॉप- ३१, लॅपटॉप- सात, वर्कबुक- ३८९, रेडिओ- २१३, वायफाय- ३, स्पीकर एम्‍प्लीफायर- ६६. तंत्रसेतू उपक्रमांतर्गत दहा हजार ९०२ शिक्षकांनी तंत्रसेतू हेल्पलाइनसाठी नोंदणी केली आहे. याशिवाय २७ हजार २७० विद्यार्थी आणि पालक, तर ३११ शिक्षणप्रेमी व्यक्ती व स्वयंसेवी संस्थांचा सहभाग मिळाला आहे. शैक्षणिक अध्यापन माध्यमात ५१ हजार ६२९ विद्यार्थ्यांची जबाबदारी आठ हजार ९३९ गल्लीमित्रांनी स्वीकारली आहे. ३८ हजार ४५ विद्यार्थ्यांना सात हजार ३७१ विषयमित्र अध्यापन करत आहेत. एक लाख तीन हजार ९२३ विद्यार्थ्यांना गटांतर्गत अध्यापन केले जाते. गृहभेटीद्वारे सात हजार ६५६ जण एक लाख ३७० विद्यार्थ्यांना शिकवत आहेत. 

हेही वाचा > थरारक दृश्य! नदीच्या पूरात वाहून गेली कार; अतिघाईच्या नादात घडला थरार; पाहा VIDEO

एक लाख १७ हजार विद्यार्थी ऐकतात रेडिओ 

एक लाख १७ हजार २१९ विद्यार्थी रेडिओवरील शैक्षणिक कार्यक्रम ऐकतात. दोन हजार ४९५ शाळा हे कार्यक्रम ऐकवत असून, दहा हजार ३४२ शिक्षकांनी त्यासाठी पुढाकार घेतला आहे. शैक्षणिक कार्यक्रम ऐकणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या अशी : रेडिओ- १४ हजार ११६, एफएमद्वारे- १३ हजार १७८, मोबाईलद्वारे- ३४ हजार २६२, मोबाईल ॲपद्वारे- ५५ हजार ६६३. 

५५० शाळांची वीज खंडित 

युडायस प्लस २०१९-२०२० नुसार जिल्हा परिषदेच्या शाळांसाठी ३२७ अतिरिक्त वर्गखोल्यांची मागणी आहे. एक हजार ७६५ वर्गखोल्यांची मोठी दुरुस्ती करण्याची आवश्‍यकता आहे. तीन हजार २५३ शाळांसाठी इमारत उपलब्ध असून, १३ शाळांना इमारतीची आवश्‍यकता आहे. तीन हजार २५७ शाळांमध्ये स्वच्छतागृह असून, नऊ ठिकाणी उपलब्ध नाही. तीन हजार २४२ शाळांमध्ये पिण्याच्या पाण्याची सुविधा आहे. २४ शाळांमध्ये ही सुविधा नाही. दोन हजार ५०९ शाळांमध्ये विद्युतीकरण झाले आहे. २०७ शाळांमध्ये विद्युतीकरण नाही. तसेच ५५० शाळांचे वीजबिल न भरल्याने वीज खंडित करण्यात आली आहे.  

हेही वाचा > मनाला चटका लावणारी बातमी : मुलाचा विरह अन् आई-वडिलांसह तिघांची निघाली अंत्ययात्रा; परिसरात हळहळ

संपादन - किशोरी वाघ


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Online education for 12 percent students of Zilla Parishad nashik marathi news