विमा कंपन्यांचे सुविधा केंद्र बंद; पीक नुकसानीची माहिती देण्यासाठी ई-मेल करण्याची सूचना 

अजित देसाई 
Friday, 23 October 2020

निसर्गाच्या लहरीपणामुळे यंदा मोठ्‌या प्रमाणात सर्वत्र पिकांचे नुकसान होऊन शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका बसला आहे. शेतकऱ्यांनी शासकीय मदतीवर अवलंबून न राहता पेरणी केलेल्या हंगामी पिकांचा विमा उतरून घेण्याचे आवाहन शासन स्तरावरून करण्यात येते.

नाशिक/सिन्नर : यंदाच्या खरीप हंगामात अतिवृष्टीमुळे तोंडाशी आलेला घास अतिवृष्टीने हिरावून घेतल्याने शेतकरी सैरभैर झाला आहे. ही एक अडचण असताना बळीराजाला नुकसानीची माहिती देण्यासाठी एकमेव असलेले विमा कंपन्याचे सुविधा केंद्र देखील कोरोनाच्या पाश्‍र्वभूमीवर कंपन्यांकडून बंद करत नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी ई-मेल, व्हाट्सअप क्रमांकावर नुकसानीची माहिती कळवावी असे आवाहन कंपन्यांकडून करण्यात येत आहे. 

निसर्गाच्या लहरीपणामुळे यंदा मोठ्‌या प्रमाणात सर्वत्र पिकांचे नुकसान होऊन शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका बसला आहे. शेतकऱ्यांनी शासकीय मदतीवर अवलंबून न राहता पेरणी केलेल्या हंगामी पिकांचा विमा उतरून घेण्याचे आवाहन शासन स्तरावरून करण्यात येते. शासनाच्या आवाहनाला प्रतिसाद देत सिन्नर तालुक्यातील बहुसंख्य शेतकऱ्यांनी यंदाच्या खरीप हंगामात पिकविमा काढला आहे. दुर्दैवाने यंदा तालुक्यात शेती पिकांना अतिवृष्टीचा फटका बसला असून ऐन काढणीच्या टप्प्यात मोठ्या नुकसानीचा सामना करावा लागत आहे.

हेही वाचा >  मध्यरात्रीस खेळ चाले! गायींना भुलीचे औषध देऊन तस्करी; महागड्या गाड्यांचा वापर 

ऑनलाईन सुविधा केंद्र बंद

अशा परिस्थितीत पिकविमा दिलासा देईल ही शेतकऱ्यांची अपेक्षा आहे. विमा कंपनीच्या नियमावलीप्रमाणे नुकसानीची २४ तासांच्या आत विशिष्ट टोल फ्री क्रमांकावर माहिती देणे बंधनकारक आहे. या क्रमांकावर संपर्क साधल्यावर शेतकऱ्यांना त्यांच्या नोंदणीकृत मोबाईलवर तक्रार नोंदणी क्रमांक उपलब्ध होतो. या क्रमांकाच्या आधारे विमा कंपनीकडे पाठपुरावा करून भरपाई मिळवता येते. मात्र, कोरोना संसर्गाचे कारण देत विमा कंपन्यांनी या टोल फ्री क्रमांकाशी जोडलेले ऑनलाईन सुविधा केंद्र बंद ठेवल्याचा धक्कादायक अनुभव शेतकऱ्यांना येत आहे. तक्रारीसाठी भारती-अक्सा जनरल इन्शुरन्स कंपनीच्या 'त्या' टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधला असता ध्वनिमुद्रित सूचना ऐकवली जाते. सध्या ग्राहक सुविधा केंद्र बंद असून शेतकऱ्यांनी आपल्या समस्या अथवा तक्रारी ई-मेल द्वारे कळवाव्यात किंवा एका विशिष्ट व्हाट्सअप क्रमांकावर मिस कॉल द्यावा असे या संदेशात म्हटले आहे. पिकांचा विमा काढल्याने सरकारकडे भरपाई मागता येत नाही. तर दुसरीकडे ई-मेलवर पीक नुकसानीची माहिती कळवण्यासाठी पुन्हा आर्थिक भुर्दंड सोसायचा काय हा शेतकऱ्यांचा सवाल आहे. 

विमा कंपनीच्या टोल फ्री क्रमांकावर पीक नुकसानीची माहिती नोंदवली जात नाही. स्थानिक कृषी अधिकाऱ्यांशी संपर्क साधला असता त्यांच्याकडून ऑनलाइन तक्रारीचा क्रमांक मागीतला जातो. अशा परिस्थितीत नेमके करायचे काय? संगमनेर तालुक्यात विमा कंपन्या व शासनाचे प्रतिनिधी बांधावर जाऊन नुकसानीचे पंचनामे करत असून सिन्नर मध्ये मात्र शेतकऱ्यांना प्रतीक्षा करावी लागत आहे. 
- संतोष जोशी, उपाध्यक्ष तालुका काँग्रेस कमिटी 
 

हेही वाचा >  क्रूर नियती! नवरात्रीच्या पहिल्याच दिवशी देवीभक्ताचा दुर्देवी अंत; कुटुंबियांचा आक्रोश

अतिवृष्टीमुळे तीस गावांमध्ये संयुक्त पंचनामे करण्यात आले आहेत. यासह मोह, चिंचोली, मोहदरी,जामगाव, खापराळे, चंद्रपूर, धोंडबार, औंढेवाडी, बेलू, अगासखिंड, पांढुर्ली, बोरखिंड,मनेगाव या १३ गावांमध्ये संयुक्त पंचनामे करण्याचे आदेश तहसीलदार राहुल कोताडे यांनी दिले आहेत. विमाधारक शेतकऱ्यांच्या बाबतीत कंपन्यांना सूचना करून नुकसानीचे पंचनामे करून घेण्यात येतील. 
- अण्णासाहेब गागरे, तालुका कृषी अधिकारी 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Online facility of insurance companies closed nashik marathi news