कोरोनाच्या वाढत्या प्रभावामुळे दिवाळीपर्यंत शिक्षण ऑनलाइनच

विजय पगारे 
Sunday, 27 September 2020

शाळा सुरू झाल्या तर मुलांना कोरोनाची लागण होईल तसेच मुलांच्या माध्यमातून ही कोरोनाची साथ त्यांच्या घरापर्यंत जाईल. हे होऊ द्यायचे नसेल तर शाळा दिवाळीपर्यंत बंद ठेवणे योग्य राहील, असे सांगण्यात आले.

नाशिक/इगतपुरी : कोरोनाच्या वाढत्या प्रभावामुळे राज्यातील सर्व शाळा दिवाळीपर्यंत बंद ठेवल्या जाणार असल्याने सहाजिकच दिवाळीपर्यंत ऑनलाइन शिक्षण सुरूच राहणार आहे. शाळा सुरू केल्या तर काय परिस्थिती निर्माण होईल, कुठे किती सुरक्षितता आहे याची विस्तृत माहिती शिक्षण विभागाच्या अधिकाऱ्यांनी शालेय शिक्षण विभागाला दिली आहे. 
शहरी भागासह ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणावर कोरोनाचे रुग्ण वाढत आहेत. ज्या जिल्ह्यात दोनआकडी रुग्णसंख्या होती तेथे आता रुग्णांची संख्या चार ते पाच आकड्यांवर गेलेली आहे. 

शाळा सुरू झाल्या तर मुलांना कोरोनाची लागण होईल तसेच मुलांच्या माध्यमातून ही कोरोनाची साथ त्यांच्या घरापर्यंत जाईल. हे होऊ द्यायचे नसेल तर शाळा दिवाळीपर्यंत बंद ठेवणे योग्य राहील, असे सांगण्यात आले. राज्यातील एकही शाळा क्वारंटाइनसाठी वापरली जात नाही. शिक्षकांच्या सेवादेखील मोठ्या प्रमाणावर आता कोरोनासाठी घेणे कमी झाले आहे. 

हेही वाचा >  तीन दिवसांपासून शोधाशोध; आणि तपास लागला १५० फूट खोल गाळात!

अभ्यासाची सवय तुटणार नाही याकडे लक्ष द्या

ऑनलाइन शिक्षण घेण्यावरून झालेल्या चर्चेत अनेक भागांत नेटवर्कचा प्रश्न आहे. त्यामुळे या शिक्षणाचा फारसा उपयोग होईल असे वाटत नाही, असा मतप्रवाह व्यक्त करण्यात आला आहे. त्यामुळे दिवाळीपर्यंत विद्यार्थ्यांना रिकामे बसू न देता त्यांच्याकडून, त्यांच्या वयोगटानुसार वेगवेगळे उपक्रम राबवून घेणे, अभ्यासक्रमांची ओळख कायम ठेवणे, या गोष्टी जाणीवपूर्वक शिक्षकांनी केल्या पाहिजेत. तसेच पालकांनीदेखील यात हातभार लावला पाहिजे, जेणेकरून विद्यार्थ्यांची अभ्यासाची सवय तुटणार नाही, याकडे लक्ष दिले पाहिजे, असे निर्देश शिक्षकांना देण्यात आले. 

हेही वाचा > भीषण! ३५ हून अधिक मजुरांचा तो कानठळ्या बसविणारा आवाज; महामार्गावरील थरार

राज्यभरातील इयत्तानिहाय स्थिती : 
वर्ग एकूण विद्यार्थी 

पहिली ते चौथी ७९ लाख ३८ हजार ५९१ 
पाचवी ते सातवी ५८ लाख ८३ हजार ५२५ 
आठवी ते दहावी ५६ लाख ४९ हजार १४४ 
अकरावी-बारावी २८ लाख ८४ हजार ७११  


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: online schooling due to increase in coronavirus nashik marathi news