एनडीए व नेव्‍हल ॲकॅडमी प्रवेशासाठी १९ पर्यंत संधी; राज्‍यात मुंबई, नागपूर केंद्रांवर होणार परीक्षा 

अरुण मलाणी
Monday, 4 January 2021

केंद्रिय लोकसेवा आयोगामार्फत नॅशनल डिफेन्‍स अकॅडमी ॲण्ड नेव्‍हल अकॅडमी एक्‍झामिनेशन (एक), २०२१ चे वेळापत्रक जारी केले आहे.

नाशिक : केंद्रिय लोकसेवा आयोगामार्फत नॅशनल डिफेन्‍स अकॅडमी ॲण्ड नेव्‍हल अकॅडमी एक्‍झामिनेशन (एक), २०२१ चे वेळापत्रक जारी केले आहे. त्‍यानुसार इच्‍छुक व पात्र विद्यार्थ्यांना ऑनलाइन स्‍वरूपात नोंदणी करण्यासाठी येत्‍या १९ जानेवारीपर्यंत मुदत असणार आहे. राज्‍यात मुंबई व नागपूर केंद्रावर १८ एप्रिलला ही परीक्षा होणार आहे. 

पुण्यातील राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी (एनडीए)मध्ये इयत्ता बारावीनंतर बी. टेक. या अभियांत्रिकी अभ्यासक्रमासह सैन्‍यदलात अधिकारीपदाची संधी उपलब्‍ध करून दिली जाते. तसेच केरळ येथील नेव्‍हल ॲकॅडमीमध्येही पदवी शिक्षणासोबत नौदलातील अधिकरी होण्याची संधी असते. या अभ्यासक्रमांच्‍या प्रवेशासाठी युपीएससीमार्फत प्रवेश परीक्षेद्वारे उमेदवारांची निवड केली जाते. त्‍यानुसार यंदाच्या परीक्षेबाबत दिशानिर्देश नुकतेच जाहीर झाले आहेत. इच्‍छुक पात्र उमेदवारांना १९ जानेवारीच्‍या सायंकाळी सहापर्यंत ऑनलाइन अर्ज दाखल करता येतील. तर १८ एप्रिलला देशभरातील परीक्षा केंद्रांवर ही परीक्षा घेतली जाणार आहे. तत्‍पूर्वी काही कारणास्‍तव विद्यार्थ्यांना आपला अर्ज मागे घ्यायचा असल्‍यास त्‍यासाठी २७ जानेवारी ते २ फेब्रुवारीदरम्‍यान मुदत दिली जाणार आहे. 

हेही वाचा> दिव्यांग पित्याचे मुलाला अभियंता बनविण्याचे डोळस स्वप्न; कॅलेन्डर विक्रीतून जमवताय पै पै, असाही संघर्ष

जागा, वय व पात्रतेच्या अटी 

एनडीएमध्ये ३७० जागांसाठी प्रवेश दिला जाणार असून, यापैकी २०८ आर्मी, ४२ नेव्‍ही आणि १२० एअर फोर्ससाठी असतील. नेव्‍हल ॲकॅडमी येथे तीस जागांसाठी अशा एकूण चारशे जागांसाठी या परीक्षेच्‍या माध्यमातून प्रवेश दिला जाईल. महाराष्ट्रात मुंबई, नागपूर या शहरांमध्ये परीक्षा होणार आहे. केवळ पुरूष उमेदवारांना परीक्षेसाठी अर्ज करता येणार असून, २ जुलै २००२ नंतर व १ जुलै २००५ पूर्वी जन्‍मलेले उमेदवार या परीक्षेस प्रविष्ठ होण्यास पात्र असतील. आर्मीकरीता बारावीपर्यंत शिक्षण आवश्‍यक असून, वायुदल किंवा नेव्‍हल शाखांसाठी इयत्ता बारावीत भौतिकशास्‍त्र, रसायनशास्‍त्र आणि गणित या विषयांतून उत्तीर्ण असणे आवश्‍यक आहे. 

नऊशे गुणांचे दोन पेपर 

नऊशे गुणांसाठी होणाऱ्या या परीक्षेत गणित विषयाचा पेपर तीनशे गुणांसाठी असेल. या पेपरसाठी अडीच तासाचा वेळ असेल. सामान्‍य आकलन क्षमतेवर आधारीत सहाशे गुणांच्‍या पेपरसाठी अडीच तासांची वेळ असेल. या पेपरमध्ये भौतिकशास्‍त्र, रसायनशास्‍त्र, सामान्‍य विज्ञान व सामान्‍य ज्ञानावर आधारीत प्रश्‍न असतील. प्रत्‍येक चुकीच्‍या प्रश्‍नासाठी निगेटीव्‍ह मार्कींग असणार आहे.  

हेही वाचा> गॅस गिझर भडक्यात बाथरूममध्ये तरुणाचा गुदमरून मृत्यू; नववर्षाच्या पहिल्याच दिवशी पाटील कुटुंबात आक्रोश
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Opportunity for admission to NDA and Naval Academy till January 19 nashik marathi news