डांबराच्या मलिद्यात भाजप वाटेकरी; विरोधी पक्षनेते बोरस्ते यांची टीका

विक्रांत मते
Sunday, 20 September 2020

याचाच अर्थ रस्ते गुणवत्तापूर्ण झालेले नाहीत. रस्त्यावरील खड्ड्यांवरून भाजपने बांधकाम व गुणवत्ता नियंत्रण विभागाला जाब विचारणे अपेक्षित असताना त्यांची पाठराखण करणे दुर्दैवी असल्याचे सांगत नाशिककर भाजपला माफ करणार नाही, असा टोला श्री. बोरस्ते यांनी लगावला.  

नाशिक : शहरातील रस्त्यांवर पडलेल्या खड्ड्यांवरून महापालिकेचा सार्वजनिक बांधकाम विभाग व गुणवत्ता व नियंत्रण विभागाच्या अधिकाऱ्यांना जाब विचारण्याचे सोडून सत्ताधारी भाजपकडून त्यांची पाठराखण केली जात आहे. याचाच अर्थ डांबराच्या मलिद्यात भाजप वाटेकरी झाल्याचा आरोप महापालिकेचे विरोधी पक्षनेते अजय बोरस्ते यांनी केला आहे. 

भाजप व अधिकाऱ्यांचे साटेलोटे? 

रस्त्यांच्या दुरवस्थेवरून शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेसने प्रशासनाला लक्ष्य करताना आंदोलनाचा इशारा दिल्यानंतर सत्ताधारी भाजप प्रशासनाच्या मदतीला धावून आले. शहरातील रस्त्यांवर पडलेले खड्डे भाजपच्या नव्हे, तर मनसेच्या सत्ताकाळात झाल्याचा पलटवार केल्यानंतर त्याला मनसेने जशास तसे उत्तर दिले. त्यापाठोपाठ शिवसेनेनेदेखील भाजपला धारेवर धरले आहे. रस्त्यांवर खड्डे पडले हे निश्‍चित, ते कोणाच्या सत्ताकाळात पडले, यावर चर्वितचर्वण करण्याऐवजी प्रशासनच्या पाठीशी उभे राहून सत्ताधारी भाजप त्यांची वकिली करत आहे. यावरून भाजप व अधिकाऱ्यांचे साटेलोटे असल्याचे स्पष्ट होते. 

हेही वाचा > मनाला चटका लावणारी बातमी : मुलाचा विरह अन् आई-वडिलांसह तिघांची निघाली अंत्ययात्रा; परिसरात हळहळ

नाशिककर भाजपला माफ करणार नाही...

ज्या मनसेवर भाजपकडून टीका केली जाते, त्या काळात उपमहापौरपदावर विद्यमान महापौर सतीश कुलकर्णी होते. याचाच अर्थ मनसेच्या पापात भाजपदेखील सहभागी होता. सत्तासुख घेतल्यानंतर आता नामानिराळे होण्याचा प्रयत्न भाजपकडून होत आहे. परंतु नाशिककरांना सर्व माहिती आहे. बांधकाम विभागाकडून साडेनऊ हजार खड्डे बुजविण्याचा दावा करण्यात आला. याचाच अर्थ रस्ते गुणवत्तापूर्ण झालेले नाहीत. रस्त्यावरील खड्ड्यांवरून भाजपने बांधकाम व गुणवत्ता नियंत्रण विभागाला जाब विचारणे अपेक्षित असताना त्यांची पाठराखण करणे दुर्दैवी असल्याचे सांगत नाशिककर भाजपला माफ करणार नाही, असा टोला श्री. बोरस्ते यांनी लगावला.  

हेही वाचा > थरारक दृश्य! नदीच्या पूरात वाहून गेली कार; अतिघाईच्या नादात घडला थरार; पाहा VIDEO

संपादन - किशोरी वाघ


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Opposition leader Boraste criticizes BJP nashik marathi news