#Lockdown : हलाखीच्या परिस्थितीत अडकलेल्या 'त्या' कष्टकऱ्यांच्या मदतीसाठी सोशल नेटवर्किंग फोरमचा पुढाकार!

worker.jpg
worker.jpg

नाशिक : जिल्ह्यातूनच नव्हे, तर राज्याच्या विविध भागांत पोटाची खळगी भरण्यासाठी गेलेले आदिवासी कष्टकरी आपल्या घरी सुखरूप पोहचावेत म्हणून त्यांचे प्रतिनिधित्व करणाऱ्या आमदारांनी रात्रीचा दिवस करायला सुरवात केली. त्याच वेळी कष्टकऱ्यांच्या मदतीसाठी विविध सामाजिक संस्था पुढे आल्या आहेत. बाहेरगावाहून परतलेल्या कष्टकऱ्यांना घरी पोहचण्यापूर्वी आरोग्य केंद्रातून तपासणी करून, काही शारीरिक त्रास नसल्याचे लिहून आणावे लागत आहे. 

बांधकामावर काम करण्यासाठी नाशिकमध्ये ते आले

खरशेत-हरसूल भागातील आदिवासी कुटुंब बांधकामावर काम करण्यासाठी नाशिकमध्ये आले होते. त्यांना कामावरून घरी जाण्यास सांगण्यात आले. हे कुटुंब हुतात्मा स्मारकासमोरील स्मार्ट रस्त्यावरील शेडमध्ये बसले होते. त्याची माहिती मिळताच, दिशा फाउंडेशनच्या स्वयंसेवकांनी या कुटुंबाची भेट घेतली आणि त्यांच्या प्रवासाची व्यवस्था करण्यासाठी आमदार हिरामण खोसकर यांच्याशी संपर्क साधण्यात आला. पण इतक्‍या व्यवस्थेची सवय नसलेल्या कुटुंबाने शहरालगतच्या नातेवाइकांकडे थांबण्याचा निर्णय घेतला. या घटनेमुळे आदिवासी कष्टकऱ्यांच्या घरी परतण्यासाठी चाललेल्या कसरतीचे धगधगते चित्र पुढे आले आहे. 

जिल्हा परिषद अन्‌ क्रेडाईला साद 

आदिवासी कष्टकऱ्यांच्या गावातील वास्तव्यातील व्यवस्थेबद्दल दिशा फाउंडेशनच्या अध्यक्षा डॉ. अंजली बोऱ्हाडे यांनी जिल्हा परिषदेच्या प्रशासनाला साद घातली. त्यास मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड यांच्याकडून सकारात्मक प्रतिसाद मिळाला, असे सांगून डॉ. बोऱ्हाडे म्हणाल्या, की होळीनिमित्त गावाकडे आलेले आदिवासी परत कामासाठी गेले नसल्याने परतणाऱ्यांची संख्या कमी झाली असली, तरीही पेठ, त्र्यंबकेश्‍वर तालुक्‍यातील परतलेल्यांची संख्या 40 हजारांच्या आसपास आहे. शिवाय त्यापेक्षा निम्मे जण सुरगाणा तालुक्‍यातील आहेत. फाउंडेशनच्या जोगमोडी, गिरणारे, हरसूल, पेठ स्थलांतरण सहकार्य केंद्राच्या माध्यमातून परतणाऱ्या आदिवासींची माहिती संकलित करण्यात येत आहे. घरी परतल्यावर ताप, खोकल्याची लक्षणे असलेल्या आदिवासींना "होम क्वारंटाइन' करत त्यांच्यावरील इलाजाची व्यवस्था करण्यास यंत्रणेने प्रतिसाद दिला आहे. अशांच्या भोजनाची व्यवस्था न झाल्यास त्यांच्यासाठी "फूड पॅकेट' नाशिकमधून उपलब्ध करून देण्याबद्दल विविध सामाजिक संघटनांशी चर्चा सुरू आहे. त्यास चांगले यश येत असून, प्रशासनाच्या मान्यतेने फूड पॅकेट पोचविण्याचा मानस आहे. याशिवाय क्रेडाईच्या अध्यक्षांकडून बांधकामांची ठिकाणे कुठे आहेत आणि त्यावर किती मजूर उपलब्ध आहेत, याची माहिती फूड पॅकेट पोचविण्यासाठी मागविण्यात आली आहे. त्याचबरोबर फूड पॅकेट पोचविण्यासाठी मदत करण्याची विनंती क्रेडाईला करण्यात आली आहे. 

सोशल नेटवर्किंग फोरमचा पुढाकार 

हातावर पोट असलेल्या आणि मजुरीसाठी अन्यत्र स्थलांतरित झालेल्या आदिवासी बांधवांना मजुरी न मिळण्याबरोबर घराकडे परत जाणे कठीण झाले आहे. काही ठिकाणी मालकांनी व्यवस्था केली आहे. तरीही अनेक आदिवासी पायी घरी निघाले आहेत. प्रवासात त्यांच्या भोजनाचे हाल होत आहेत. अशा हलाखीच्या परिस्थितीत अडकलेल्या आदिवासींना मदत करण्यासाठी सोशल नेटवर्किंग फोरमने पुढाकार घेतला आहे. "आपल्यातील माणुसकी जिवंत ठेवू या, आपल्या बांधवांना मदत करू या अन्‌ मानवतेला जागवू या' ही मोहीम फोरमतर्फे राबविण्यास सुरवात करण्यात आली आहे. 
संपर्क 
नाशिक ----- 9422769364 आणि 9421609987 
पेठ ----- 7588013709 
त्र्यंबकेश्‍वर ----- 8551820961 
सुरगाणा ----- 9689647138

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com