
अगोदरच द्राक्ष पिकांवर मोठ्या प्रमाणात खर्च झाला असतानाच आता पुन्हा या रोगापासून बचावासाठी पुन्हा वेगवेगळी औषधे फवारावी लागत आहे. तर झाडांवर साड्या टाकून सावली करणे, द्राक्षघडाभोवती कागद लावणे यामुळे खर्च वाढला आहे.
कसबे सुकेणे (नाशिक) : रात्री व पहाटेची थंडी, दिवसभरातील प्रचंड तापमान या बदलत्या हवामानामुळे कसबे सुकेणे व परिसरात द्राक्षबागांवर ‘उकड्या’ रोगाचा प्रादुर्भाव दिसून येत आहे. द्राक्ष पिकाबरोबरच कांदा, गहू व हरभरा या पिकांनाही या वातावरणातील बदलाचा मोठा फटका बसत असून, यामुळे शेतकरी त्रस्त झाला आहे.
परिसरातील शेतकऱ्यांसमोर नवे संकट
गेल्या पंधरवड्यात बेमोसमी पावसामुळे परिसरातील अनेक द्राक्षबागांना तडे गेले होते. या संकटातून शेतकरी सावरतोय तोच आता बदलत्या हवामानामुळे विशेषतः दुपारच्या प्रचंड तापमानामुळे द्राक्षबागांवर उकड्या रोगाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात जाणवत आहे. रात्रभर थंडीमुळे द्राक्ष पिकावर दव पडत असून, दुपारच्या तापमानामुळे विपरीत परिणाम होत आहे. अगोदरच द्राक्ष पिकांवर मोठ्या प्रमाणात खर्च झाला असतानाच आता पुन्हा या रोगापासून बचावासाठी पुन्हा वेगवेगळी औषधे फवारावी लागत आहे. तर झाडांवर साड्या टाकून सावली करणे, द्राक्षघडाभोवती कागद लावणे यामुळे खर्च वाढला आहे. दिवसा थंडी नसल्यामुळे हरभरा, गहू व कांदा पिकांवर या प्रतिकूल वातावरणाचा परिणाम होत आहे.
हेही वाचा > ‘कोब्रा-घोणस’च्या लढाईचा थरार! मांजराने केली मध्यस्थी; पाहा VIDEO
या वर्षी कधी नव्हे असे वातावरण बदलत असल्याने द्राक्ष पिकांसाठी हे वातावरण प्रतिकूल आहे. त्यामुळे उकड्या रोगाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शेतकऱ्यांनी फ्रूट गार्ड औषध फवारणी, उष्णतेपासून बचावासाठी द्राक्षाभोवती पेपर गुंडाळणे व सावलीसाठी झाडांवर साड्यांची सावली करणे आवश्यक आहे. - वासुदेव काठे, समन्वयक, द्राक्ष प्रयोग परिवार
हेही वाचा > ''माझ्या बायकोला आधी वाचवा हो'', रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या नवऱ्याचा आक्रोश; दुर्देवी घटना