अतिवृष्टीमुळे जिल्‍ह्यात ३७ हजारांवर हेक्टर क्षेत्र बाधित; गावोगावी सर्वेक्षणाचे आदेश

yeola.jpg
yeola.jpg

नाशिक : (येवला) दोन आठवड्यांपासून जिल्ह्यात सर्वदूर धो धो पडणाऱ्या पावसाने खरीप पिकांचे प्रचंड नुकसान केले आहे. तसेच यापूर्वीही नुकसान झाले असल्याने जून ते ऑगस्ट व सप्टेंबरमध्ये अतिवृष्टी व पुरामुळे झालेल्या पिकांचे, फळ पिकांच्या नुकसानीचे पंचनामे करून अहवाल सादर करण्याच्या सूचना कृषी आयुक्तांनी दिल्या आहेत. त्यानुसार जिल्ह्यात पंचनाम्याची कार्यवाही सुरू झाली. मागील आठवड्याच्या पावसाने ३७ हजारांहून अधिक हेक्टर क्षेत्र बाधित झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. 


३३ टक्क्यांवरील नुकसानीचे पंचनामे सुरू

ऑगस्ट महिन्याची जिल्ह्याच्या पर्जन्यमानाची सरासरी १८३ मिलिमीटर असताना आजपर्यंत तब्बल २०४ मिलिमीटर पाऊस पडला आहे. विशेषता दिंडोरी, मालेगाव, नांदगाव, चांदवड, कळवण, बागलाण, देवळा, निफाड, सिन्नर व येवला तालुक्यांत ऑगस्टची सरासरी ओलांडली असून, काही भागात दुप्पट पाऊस झाला आहे. पावसामुळे खरिपातील कपाशी, मका, सोयाबीनचे प्रचंड नुकसान झाले आहेत. याशिवाय कांद्याचे प्रचंड नुकसान झाले असून, प्रथमच वाफ्यात ७० टक्क्यांवर कांदे मृत झाल्याची स्थिती आहे. यासंदर्भात पंचनामे करून नुकसानभरपाई मिळण्याची मागणी शेतकऱ्यांकडून होत होती. त्यानुसार कृषी आयुक्तांनी यासंदर्भात गुरुवारी आदेश काढून तत्काळ पंचनामे करण्याच्या सूचना केल्या असून, प्रांताधिकारी व तहसीलदारांनी देखील गावोगावी तलाठी, कृषी सहाय्यक व ग्रामसेवक यांची नियुक्ती करून ३३ टक्क्यांपेक्षा जास्त नुकसान झालेल्या क्षेत्राचे सर्वेक्षण करून अहवाल सादर करण्याच्या सूचना केल्या आहेत. त्यानुसार आजपासून प्रत्यक्ष कामालाही सुरवात झाल्याचे सांगण्यात आले. 

पिके काढण्याच्या अवस्थेत जमीनदोस्त

या पावसाने जिल्ह्यातील २६३ गावांतील ३६ हजार ५०१ शेतकऱ्यांचे ३७ हजार ८३९ हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाल्याचा कृषी विभागाचा प्राथमिक अंदाज आहे. २२ हजार ५४१ हेक्टरवरील जिरायती, तर ११ हजार ९६२ हेक्टरवरील बागायती व पाच हेक्‍टरवरील वार्षिक व ३२१ हेक्‍टरवरील बहुवार्षिक फळ पिकांचे नुकसान झाल्याचा कृषी विभागाचा अंदाज आहे. मकाच्या पिकाचे १७ हजार ८१५ हेक्‍टर, तर सोयाबीनचे चार हजार ५१८ हेक्‍टर व कांद्याचे नऊ हजार ९५९ हेक्‍टरला फटका बसल्याचा अंदाज आहे. विशेषतः मका, बाजरी, भुईमूग, सोयाबीन आदी पिके काढण्याच्या अवस्थेत जमीनदोस्त झाली असून, पाण्यातही तरंगत असल्याने मोठा फटका शेतकरी सहन करत आहे. टोमॅटो भाजीपालादेखील या पावसात खराब होत आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com