नुकसान कोट्यवधींचे पण पंचनामे नाहीच! येवल्यात २५ हजारांवर हेक्टर बाधित 

संतोष विंचू
Tuesday, 22 September 2020

गेले दोन ते तीन दिवस सतत पडणाऱ्या पावसामुळे तालुक्यातील पंचवीस ते तीस हजार हेक्‍टरवरील पिकांचे नुकसान झाले आहे. अद्यापही मका, कांद्यासह बाजरीचे पीक अनेक ठिकाणी पाण्यात असून, कांदे शेतातच सडत आहेत. कांदा रोपांची हीच अवस्था असून, शेतकऱ्यांचे नुकसान कोटींच्या वर आहे. मात्र, पंचनामे अद्यापही सुरू न झाल्याने शासनाने त्वरित पंचनाम्याचे आदेश देण्याची मागणी होत आहे. 

नाशिक / येवला : गेले दोन ते तीन दिवस सतत पडणाऱ्या पावसामुळे तालुक्यातील पंचवीस ते तीस हजार हेक्‍टरवरील पिकांचे नुकसान झाले आहे. अद्यापही मका, कांद्यासह बाजरीचे पीक अनेक ठिकाणी पाण्यात असून, कांदे शेतातच सडत आहेत. कांदा रोपांची हीच अवस्था असून, शेतकऱ्यांचे नुकसान कोटींच्या वर आहे. मात्र, पंचनामे अद्यापही सुरू न झाल्याने शासनाने त्वरित पंचनाम्याचे आदेश देण्याची मागणी होत आहे. 

येवल्यात २५ हजारांवर हेक्टर बाधित; सर्वच पिके पाण्यात 
तालुक्यात १४ तारखेला ५१३ मिलिमीटर पावसाची नोंद होती. आज हाच आकडा ५८७ मिलिमीटर झाला आहे. १६ तारखेला ११ व १७ ला १५ मिलिमीटर पाऊस झाला, तर २० तारखेला धोधो बरसणारा पाऊस तब्बल ३८ मिलिमीटरपर्यंत नोंदवला गेला. रात्रीच्या वेळेस झालेल्या या पावसाने तालुक्याच्या सर्व भागात कमी-अधिक प्रमाणात हजेरी लावली; पण काही भागात अधिक मुसळधार स्वरूप असल्याने शेतीचे प्रचंड नुकसान झाले आहे. अनेक बंधारे व नद्याही तुडुंब भरून वाहिल्या. देशमाने, मानोरी परिसरात नदीला आलेल्या पुराने पिकांचे मोठे नुकसान झाले. तालुक्‍यात सुमारे सहा हजार ५०० हेक्टरवर कांद्याची लागवड झाली असून, यातील सहा हजार हेक्टर कांदा पीक जमिनीतील बुरशी व सततच्या पावसामुळे बाधित झाले आहे. 
 

हेही वाचा >  मनाला चटका लावणारी बातमी : मुलाचा विरह अन् आई-वडिलांसह तिघांची निघाली अंत्ययात्रा; परिसरात हळहळ

अतिवृष्टीने सोंगणीला आलेले सोयाबीन, बाजरी पूर्णपणे खराब झाले. लागवड झालेला कांदा पूर्णपणे नष्ट झाला, तर हजारो रुपये खर्च करून खरेदी केलेले कांदा बियाणेही पावसाने नष्ट झाले. सर्व नुकसानीचे तातडीने पंचनामे करून शेतकऱ्यांना दिलासा द्यावा. -हरिभाऊ महाजन, तालुकाध्यक्ष, प्रहार शेतकरी संघटना 
 
दोन दिवस झालेला जोरदार पाऊस व वाऱ्यामुळे आमचे तीन एकर मका क्षेत्र भुईसपाट होऊन प्रचंड नुकसान झाले. मका सोंगायलाही महाग होणार आहे. हातातोंडाशी आलेले मका पिकाचे नुकसान बघवत नाही. प्रशासनाकडून अजून पंचनामे झाले नाही. -गणेश गुंड, मका उत्पादक, मुखेड 

मका पीक पावसाने आडवे पडून सडायला लागले. सोयाबीन पाण्यात पोहत आहे. रोगामुळे कांदा रोप वारंवार टाकून, फवारणी करूनही उतरत नाही. तर लागवड झालेले कांदे मातीत जाताय. पाऊस पाण्यातून टोमॅटो तोडावे कसे, शेताबाहेर आणावे कसे. -बापूसाहेब पगारे, शेतकरी संघटना, येवला 

 हेही वाचा > थरारक दृश्य! नदीच्या पूरात वाहून गेली कार; अतिघाईच्या नादात घडला थरार; पाहा VIDEO


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Over twenty five hectares affected in Yeola nashik marathi news