नाशिकच्या उन्हाळ कांद्याच्या स्पर्धेत पाकिस्तानचा नवा कांदा 

महेंद्र महाजन : सकाळ वृत्तसेवा 
Wednesday, 22 July 2020

बकरी ईदनिमित्त बांगलादेश, दुबईसह आखाती देश आणि मलेशियामध्ये १५ दिवस अगोदर आयातदारांची मागणी वाढते. सद्यःस्थितीत आठवड्याला पाच कंटेनरभर कांद्याची मागणी नोंदवणाऱ्या आयातदारांना १५ दिवसांतून एकदा तीन कंटेनरभर कांदा पाठवावा लागतो, असे कांदा निर्यातदार विकास सिंह यांनी ‘सकाळ’ला सांगितले.

नाशिक : नाशिकच्या उन्हाळ कांद्याच्या स्पर्धेत पाकिस्तानचा नवा कांदा उतरला आहे. मात्र अजूनही टनाला ५० ते ७५ डॉलर अधिकचा भाव असल्याने पाकिस्तानच्या कांद्याकडे कल वाढलेला नाही. मुळातच, किलोला १७ ते १८ रुपये भाव असताना आयातदारांनी भाव वाढतील म्हणून कांद्याची खरेदी मोठ्या प्रमाणात करून ठेवली. त्यामुळे आता भाव कमी झालेले असतानाही ग्राहक ‘फेस्टिव्हल मूड’मध्ये नसल्याने आयातदार खरेदीकडील हात आखडता घेतला आहे. पाकिस्तानी कांद्याचा भाव टनाला ३००, तर नाशिकच्या उन्हाळ कांद्याचा भाव २२० ते २२५ डॉलर इतका आहे. 

बकरी ईदसाठी बांगलादेश, दुबईसह आखाती देश आणि मलेशियामध्ये मागणीचा अभाव 
बकरी ईदनिमित्त बांगलादेश, दुबईसह आखाती देश आणि मलेशियामध्ये १५ दिवस अगोदर आयातदारांची मागणी वाढते. सद्यःस्थितीत आठवड्याला पाच कंटेनरभर कांद्याची मागणी नोंदवणाऱ्या आयातदारांना १५ दिवसांतून एकदा तीन कंटेनरभर कांदा पाठवावा लागतो, असे कांदा निर्यातदार विकास सिंह यांनी ‘सकाळ’ला सांगितले. सिंह म्हणाले, की कोलंबोमध्ये किलोला २४ रुपये या भावाने कांदा पोच होतोय. श्रीलंकेत किलोला १५ रुपयांपर्यंत आयात शुल्क आकारले जाते. शिवाय दुबई, सिंगापूर, मलेशियामध्ये ३२ रुपये किलो या भावाने पोच कांदा द्यावा लागतो. जहाजाने श्रीलंका, दुबईचा प्रवास तीन, तर सिंगापूर-मलेशियाचा सात ते आठ दिवसांचा आहे. प्रवासभाड्यावर खर्च अधिक करावा लागतो. कोरोना विषाणू संसर्गाच्या पार्श्‍वभूमीवर आयात-निर्यातीवर मर्यादा आल्याने कार्गोसाठी माल उपलब्ध होत नसल्याने आठवड्याला पाचऐवजी दोन अथवा तीन जहाजे मुंबई बंदरातून रवाना होताहेत. त्यातून कांदा पाठविला जात आहे. फळे आणि भाजीपाल्याचे प्रमाण २० ते २५ टक्क्यांपर्यंत असते. 

पुढचा महिना कठीण काळ 
कर्नाटकमध्ये पुढील महिन्याच्या मध्यापासून नवीन कांद्याचे उत्पादन बाजारात यायला सुरवात होते. मग निर्यातदारांचा कल त्या कांद्याकडे वाढतो. त्याच वेळी मध्य प्रदेशामध्ये १५ टक्क्यांनी यंदा कांद्याचे उत्पादन अधिक झाले असल्याने पुढील महिना अथवा सप्टेंबरमध्ये मध्य प्रदेशातील कांदा संपेल की नाही, हा प्रश्‍न कायम आहे. त्यामुळे नाशिकच्या कांद्याच्या दृष्टीने पुढचा महिना कठीण काळ असेल. देशात पावसाने मुसळधार पावसाने हजेरी लावल्यास त्याचा फायदा नाशिकच्या कांद्याला होऊ शकतो, असे व्यापाऱ्यांचे म्हणणे आहे. सद्यःस्थितीत कांद्याचे आगर असलेल्या नाशिक जिल्ह्यातील बाजारपेठांमधून ७०० ते ८०० रुपये क्विंटल या भावाने कांद्याची विक्री सुरू आहे. लासलगावमध्ये ७५०, पिंपळगाव बसवंतमध्ये ८०० रुपये क्विंटल असा भाव आज शेतकऱ्यांना मिळाला. मुंबईत ८५०, औरंगाबादमध्ये ५५०, धुळ्यात ५८०, नागपूरमध्ये ९५०, पुण्यात ७०० रुपये क्विंटल असा भाव राहिला. 

हेही बघा >VIDEO : कृषीमंत्री कोरोनाबाधितांसोबत तीन पावली नृत्यावर थिरकतात तेव्‍हा.. व्हिडीओ होतोय प्रचंड व्हायरल!

६० ते ७० लाख टन कांदा शिल्लक 
देशाला महिन्याला दहा लाख टन कांदा खाण्यासाठी लागतो. मेपासून सहा महिने उन्हाळ कांदा खाण्यासाठी वापरला जात असल्याने बियाणे आणि खराब होणाऱ्या कांद्याचे प्रमाण लक्षात घेतले, तरीही ७० ते ८० लाख टन कांदा पुरेसा ठरतो. यंदा देशात १३० लाख टन कांद्याचे उत्पादन झाले असून, सद्यःस्थितीत ६० ते ७० लाख टन कांदा चाळींमध्ये शिल्लक असल्याचा अभ्यासकांचा अंदाज आहे. अशातच, ऑक्टोबरमध्ये नवीन पोळ कांद्याचे उत्पादन शेतकऱ्यांच्या हातात असेल. 

हेही बघा > अरेच्चा! तर हे रहस्य आहे काय मालेगावमधून कोरोना संपुष्टात येण्याचं?...भन्नाट व्हिडिओ एकदा पाहाच!

निर्यातवृद्धीकडे लक्ष द्यावे लागेल
दसऱ्याच्या पुढे उन्हाळ कांदा राहत नाही. यंदा मात्र तो दीपावलीपर्यंत टिकेल अशी स्थिती आहे. सध्याच्या वातावरणामुळे काही भागातील चाळींमध्ये वास यायला लागला. तरीही पुढील महिन्यापासून कांदा खराब होण्याचे प्रमाण वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे उपलब्ध कांद्याला चार पैसे मिळण्यासाठी निर्यातवृद्धीकडे लक्ष द्यावे लागेल. -चांगदेवराव होळकर, माजी अध्यक्ष, नाफेड  

स्टोरी - महेंद्र महाजन

(संपादन - ज्योती देवरे)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Pakistan's new onion in Nashik's summer onion competition nashik marathi news