
नाशिक : पालघर जिल्ह्यात गडचिंचले-चौकीपाडा येथे गुरुवारी रात्री मॉब लिंचिंगच्या घटनेत ठार झालेल्या त्र्यंबकेश्वरच्या दक्षिणमुखी हनुमान मंदिराचे महंत कल्पवृक्षगिरी व महंत सुशीलगिरी महाराज यांच्या पार्थिवांना शनिवारी (ता. 18) मध्यरात्री त्र्यंबकेश्वर येथे शोकाकुल वातावरणात समाधी देण्यात आली. दरम्यान, या घटनेचे रविवारी देशभर तीव्र पडसाद उमटले. हिंदुत्ववादी संघटनांनी महाराष्ट्र सरकारवर सोशल मीडियाच्या माध्यमातून टीकेची झोड उठविली. दोन्ही महंतांच्या मृतदेहांची विटंबना झाल्याचा आरोप करीत घटनेतील दोषींवर कडक कारवाई करा, अन्यथा लॉकडाउननंतर तीव्र आंदोलन केले जाईल, असा इशारा अखिल भारतीय आखाडा परिषद तसेच नागा साधूंनी दिला आहे.
दोन्ही महंतांना त्र्यंबकेश्वर येथे समाधी
त्र्यंबकेश्वरच्या दक्षिणमुखी हनुमान मंदिराचे महंत कल्पवृक्षगिरी ऊर्फ चिकणे महाराज (वय 70), त्यांचे सहकारी महंत सुशीलगिरी (30), चालक नीलेश तेलगडे (30) हे तिघे गुरुवारी (ता. 15) रात्री त्यांच्या इको कार (एमएच 02, डीडब्ल्यू 6729)ने मुंबईतील कांदिवली येथून सुरतकडे आखाड्याच्या एका साधूच्या अंत्यसंस्कारासाठी जात होते. त्यांना दरोडेखोर समजून पालघर जिल्ह्यातील गडचिंचले-चौकीपाडा येथे रस्त्यात त्यांचे वाहन अडवून जमावाने गाडीतून बाहेर काढून मारले. शनिवारी रात्री उशिरा महंत कल्पवृक्षगिरी यांना दक्षिणमुखी हनुमान मंदिराच्या वरच्या भागात गुरूंच्या समाधीशेजारी, तर सुशीलगिरी यांना खालच्या बाजूला समाधी देण्यात आली.
विविध आखाड्यांनी व्यक्त केला संताप
रविवारी या घटनेचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले. बहुतेक दृश्यांमध्ये घटनेची माहिती मिळाल्यानंतर तेथे पोचलेल्या पोलिसांच्या उपस्थितीतच तिघांना जमावाने लाठ्याकाठ्यांनी ठार केल्याचे स्पष्ट झाले. जमावाच्या तावडीतून सुटण्यासाठी वयोवृद्ध साधू पोलिसांच्या आड लपताहेत आणि पोलिस मात्र त्यांना जमावामध्ये ढकलून देताहेत, अशी दृश्ये या व्हिडिओंमध्ये आहेत. मृतदेहांची विटंबनादेखील झाल्याचे स्पष्ट झाले. परिणामी, दोन्ही महंतांना समाधी दिल्यानंतर आखाडा परिषदेचे सदस्य असलेल्या विविध आखाड्यांनी संताप व्यक्त केला.
ठाकरे सरकारवर टीकेची झोड
अखिल भारतीय आखाडा परिषदेचे अध्यक्ष नरेंद्रगिरी यांच्यासह श्री पंच दशनाम जुना आखाड्याचे अध्यक्ष महंत प्रेमगिरी यांनी रविवारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे या प्रकरणाच्या निःपक्ष सखोल चौकशीची मागणी केली. या घटनेतील पोलिसांच्या भूमिकेवर आखाडा परिषदेने गंभीर प्रश्न उपस्थित केले आहेत. शिवसेना हा हिंदुत्ववादी पक्ष असताना त्यांच्याच सत्ताकाळात वयोवृद्ध महंतांची दोन सहकाऱ्यांसह अशी जमावाकडून ठेचून हत्या होते, ही शरमेची बाब असल्याचे आखाड्यांनी म्हटले आहे.
101 आरोपींना अटक; 30 एप्रिलपर्यंत पोलिस कोठडी
दरोडेखोर असल्याच्या संशयावरून शुक्रवारी रात्री गडचिंचले येथे तीन जणांची हत्या केल्याप्रकरणी 110 आरोपींना कासा पोलिसांनी अटक केली होती. त्यांपैकी नऊ आरोपी 18 वर्षांखालील असल्याने त्यांना भिवंडीच्या बालसुधारगृहात पाठविण्यात आले, तर अन्य 101 आरोपींना शनिवारी डहाणू कोर्टात हजर करण्यात आले. त्यांना 30 एप्रिलपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे, तर काही आरोपी फरारी असून, त्यांचा शोध कासा पोलिस घेत आहेत.
पालघर मॉब लिंचिंगमधून निर्माण होणारे प्रश्न
-सगळा घटनाक्रम पूर्वनियोजित असल्यासारखा का वाटतो?
-महंतांच्या मुंबई ते सुरत प्रवासाची माहिती आधी बाहेर कुणाला समजली होती का?
-अशा रीतीने गर्दी जमविणे व तिला हिंसाचारासाठी प्रवृत्त करणे यामागे कोणी मास्टरमाइंड आहे का?
-कोरोना संकटाचा मुकाबला करताना संचारबंदी लागू असताना वेगवेगळ्या पाड्यांवरच्या लोकांची गर्दी जमलीच कशी?
-जमावातील अनेकांकडे घातक शस्त्रे कुठून आली? नंतरच्या दृश्यांमध्ये पोलिस गायब कसे झाले?
-जिवंत असलेल्या तिघांना पोलिसांनी इतक्या सहजपणे पुन्हा जमावाच्या ताब्यात का दिले?
आखाडा परिषद, नागा साधूंकडून आंदोलनाचा इशारा
महाराष्ट्रात लॉकडाउनच्या काळात जमावाकडून दोन महंतांच्या हत्येचा घडलेला प्रकार निंदनीय आहे. लॉकडाउन असल्याने समाधी विधीसाठी इतर जिल्ह्यांतील साधू-महंत गेले नाहीत. मात्र या घटनेबद्दल साधू-महंतांच्या भावना तीव्र आहेत. सूर्याचार्य कृष्णदेवनंद गिरी महाराज यांच्यावर सातारा येथे असाच हल्ला झाला. महाराष्ट्र सरकारने दोषींवर आणि हलगर्जी करणाऱ्या पोलिस यंत्रणेवर कारवाई करावी, अन्यथा लॉकडाउननंतर तीव्र आंदोलन केले जाईल. -श्रीमहंत नरेंद्रगिरी महाराज, अध्यक्ष, अखिल भारतीय आखाडा परिषद
संचारबंदी असताना शेकडोंच्या संख्येने लोक जमा होतात व तिघांना ठेचून मारल्यानंतर त्यांच्याकडील पैसे, देवाचे सोन्याचे दागिने लुटतात हे धक्कादायक आहे. पोलिसांनी दोन्ही महंतांसह चालकाला संरक्षणासाठी त्यांच्या गाडीत बसविले. त्या वेळी तिघेही जिवंत होते. मग त्यानंतर पोलिसांवर चालून आलेला जमाव पांगविण्यासाठी पोलिस अधिकाऱ्यांनी हवेत गोळीबार का केला नाही? तिघांना वाचविण्याचे प्रयत्न का केले नाहीत? -महंत प्रेमगिरी, आंतरराष्ट्रीय अध्यक्ष, श्री पंच दशनाम आखाडा, वाराणसी
लॉकडाउनच्या काळात संचारबंदी असताना लोक शस्त्रे, लाठ्याकाठ्या घेऊन जमतात, पोलिसांच्या ताब्यातील महंतांना ठार करतात. हा सगळा प्रकार संशयास्पद व पूर्वनियोजित वाटावा असा आहे. या संदर्भात मुख्यमंत्र्यांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला जातोय, पण संपर्क होत नाही. हा प्रकार हिंदूंना लॉकडाउन करण्यासारखा आहे. राज्य शासन गंभीर नाही. त्यामुळे लॉकडाउननंतर नागा साधू आंदोलन उभे करतील. -जगद्गुरू कृष्णदेवनंद गिरी महाराज, मुंबई
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.