प्रभाग सभापतिपदासाठी चढाओढ! पंचवटी, पूर्वेत भाजप; तर सिडकोत शिवसेना

shivsena n bjp.jpg
shivsena n bjp.jpg

नाशिक : कोरोनामुळे रखडलेल्या निवडणुका घेण्याची सूचन निवडणूक आयोगाने दिल्यानंतर पुढील आठवड्यात होणाऱ्या प्रभाग समिती सभापतिपदासाठी चुरस निर्माण झाली आहे. सहा महिन्यांसाठी सभापती होण्यासाठी इच्छुकांनी फिल्डिंग लावण्यास सुरवात केली आहे. पक्षीय बलाबलाचा विचार करताना पंचवटी, पूर्वमध्ये भाजपला सरळ चाल आहे. तर नाशिक रोडमध्ये शिवसेना व भाजपचे समसमान बलाबल असल्याने राष्ट्रवादी काँग्रेसच्या एका नगरसेवकाची भूमिका महत्त्वाची ठरणार आहे. 

प्रभाग सभापतिपदासाठी पश्‍चिम, सातपूर, नाशिक रोडमध्ये चुरस 

सिडकोत शिवसेनेचे बळ असल्याने मार्ग मोकळा होणार आहे. सातपूरमध्ये मनसेची भूमिका भाजपसाठी महत्त्वाची ठरेल. पश्‍चिम विभागात मनसेने भाजपला साथ दिल्यास समसमान बलाबल होऊन महविकास आघाडीला धक्का बसेल. मार्चमध्ये प्रभाग समिती सभापतींची मुदत संपुष्टात आल्यानंतर निवडणूक प्रक्रिया सुरू होण्याच्या आतच कोरोना वाढू लागल्याने शासनाने सर्व प्रकारच्या निवडणुकांना स्थगिती दिली. तब्बल सहा महिन्यांनी विभागीय आयुक्तांकडे प्राप्त प्रस्तावानुसार निवडणुका घेण्याचे आदेशित करण्यात आले. त्यानुसार १५ ऑक्टोबरला व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे निवडणूक प्रक्रिया पार पडणार आहे. त्यामुळे सहा महिन्यांनंतर शहराचे राजकीय वातावरण पुन्हा ढवळून निघेल. प्रभाग सभापतिपद पुढील सहा महिन्यांसाठी असले तरी त्यापुढील वर्षी म्हणजे २०२२ मध्ये महापालिकेच्या निवडणुका असल्याने पदरात सत्तेचे पद पाडून घेण्यासाठी अनेक जण इच्छुक आहेत. त्यानुसार फिल्डिंग लावली जात आहे. 

मनसेची भूमिका निर्णायक 

पंचवटी प्रभाग समितीत एकूण २४ नगरसेवक आहेत. भाजपच्या शांता हिरे यांचे निधन झाल्याने एक जागा अद्यापही रिक्त आहे. शिल्लक २३ नगरसेवकांपैकी भाजपकडे अठरा नगरसेवक असल्याने सभापती बिनविरोध निवडून येईल. पूर्वमध्ये १९ पैकी भाजपचे बारा नगरसेवक असल्याने सभापती बिनविरोध होण्याची दाट शक्यता आहे. निवडणूक झाली तरी भाजपकडे अधिक नगरसेवक असल्याने सभापतिपदावर शिक्कामोर्तब होईल. सिडको विभागात २४ पैकी शिवसेनेचे १४ नगरसेवक असल्याने या समितीवर शिवसेनेचा भगवा फडकेल. पश्‍चिम व सातपूरमध्ये मात्र मनसेची भूमिका निर्णायक राहील. पश्‍चिममध्ये बारा नगरसेवकांपैकी भाजपचे सर्वाधिक पाच नगरसेवक आहेत. येथे २०१७ पासूनच महाविकास आघाडीचा फॉर्म्युला अस्तित्वात आहे. 

शिवसेनेला समितीवर भगवा फडकविण्याची संधी

भाजपपाठोपाठ काँग्रेसचे चार, तर शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस व मनसेचा प्रत्येकी एक सदस्य आहे. काँग्रेस, शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेस एक झाल्यास व मनसेची साथ मिळाल्यास भाजपला सत्ता मिळवता येणार नाही. परंतु मनसेने भाजपला पाठिंबा देण्याचा निर्णय घेतल्यास समसमान पक्षीय बलाबल होऊन काट्याची टक्कर होईल. सातपूर प्रभाग समितीत २० नगरसेवक असून, त्यात भाजपचे नऊ, शिवसेनेचे आठ, मनसेचे दोन, तर रिपब्लिकन पक्षाचा (आठवले गट) एक नगरसेवक आहे. मनसेची भूमिका महत्त्वाची ठरेल. भाजप व शिवसेना यापैकी एका पक्षाकडे मनसे वळल्यास त्या पक्षाला सत्ता राखता येणार आहे. नाशिक रोड विभागात २३ नगरसेवकांपैकी भाजप व शिवसेनेचे प्रत्येकी अकरा सदस्य आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचा एक सदस्य असून, महाविकास आघाडीचा फॉर्म्युला लक्षात घेता शिवसेनेला समितीवर भगवा फडकविण्याची संधी आहे. 

पक्षीय बलाबल असे 
पक्षाचे नाव पूर्व पश्‍चिम पंचवटी नाशिक रोड सिडको सातपूर एकूण 

भाजप १२ ५ १८ ११ ९ ९ ६४ 
शिवसेना -- १ ०१ ११ १४ ८ ३५ 
काँग्रेस ०२ ०४ -- -- -- -- ०६ 
राष्ट्रवादी काँग्रेस ०४ ०१ -- ०१ ०१ -- ०७ 
मनसे -- ०१ ०२ -- -- ०२ ०५ 
अपक्ष ०१ -- ०२ -- -- -- ०३ 
रिपाई (आ) -- -- -- -- -- ०१ ०१ 

एकूण १९ १२ २३ २३ २४ २० १२१ 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com