कारभारणी लय भारी! गावगाडा हाकण्यासाठी सहा हजार रणरागिणी मैदानात; सरपंचपदावरही महिलांचा दावा 

संतोष विंचू 
Saturday, 9 January 2021

महिलाही पुरुषांच्या बरोबरीने योगदान देतात हे ग्रामपंचायत निवडणुकीच्या प्रचारात दिसून येत आहे. जितक्या सक्रियतेने पुरुष प्रचारात उतरले आहेत तितकाच उत्साह व सहभाग महिलांचाही दिसतोय.

येवला (जि.नाशिक) : महिलाही पुरुषांच्या बरोबरीने योगदान देतात हे ग्रामपंचायत निवडणुकीच्या प्रचारात दिसून येत आहे. जितक्या सक्रियतेने पुरुष प्रचारात उतरले आहेत तितकाच उत्साह व सहभाग महिलांचाही दिसतोय. जिल्ह्यातील ६२१ ग्रामपंचायतींत तब्बल दोन हजार ९४८ महिला सदस्य निवडून येणार असून, यासाठी सुमारे सहा हजारांवर रणरागिणी निवडणुकीच्या फडात उतरल्या आहेत. विशेष म्हणजे यातून ३१० ठिकाणी सरपंचपदावरही महिलांचा दावा असून, गावचा कारभारी त्या हाकणार आहेत. 

नवसाक्षर महिलाही निवडणुकीच्या रिंगणात
ग्रामपंचायत निवडणुकीत महिलांना ५० टक्के, अनुसूचित जाती-जमातींना लोकसंख्येच्या प्रमाणात, तर इतर मागासवर्ग २७ टक्के आरक्षण दिले जाते. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत महिलांना ५० टक्के आरक्षण दिल्यापासून त्यांचा राजकीय सहभाग वाढला आहे. यापूर्वी अनेक वयोवृद्ध व निरक्षर महिलांना संधी मिळत असल्याने साहजिकच त्यांचे पतिराज किंवा मुलगा राजकीय पटलावर सक्रिय असल्याचे चित्र दिसत होते. किंबहुना काहींनी तर महिलांच्या सह्यादेखील स्वतः करण्याचा सपाटा लावला होता. मात्र, कालौघात त्यात बदल होत असून, आता अनेक नवसाक्षर महिलाही निवडणुकीच्या रिंगणात उतरत आहेत. मागील पाच ते दहा वर्षांत अनेक महिलांनी ग्रामपंचायतीचे सरपंच व सदस्यपद लीलयापणे सांभाळले असून, सक्षमपणे आम्ही नेतृत्व करू शकतो हे दाखवून दिले आहे. 

हेही वाचा > नियतीची खेळी! एका मित्राला लागली हळद ,तर दुसऱ्याला दिला अग्नि; अक्षयच्या अवेळी जाण्याने परिसरात हळहळ

९४८ सदस्यांची होणार निवड 
या वेळी तर विक्रमी संख्येने महिला निवडणूक लढवत आहेत. जिल्ह्यातील ६२१ ग्रामपंचायतींत पाच हजार ८९५ सदस्यांच्या निवडीसाठी निवडणूक होत असून, यात दोन हजार ९४८ जागांवर महिलांची वर्णी लागणार आहे. यातही जिल्ह्यात एक हजार ६२७ जागा बिनविरोध झाल्या असून, सुमारे ७०० हून अधिक महिलांचा समावेश आहे. 

हेही वाचा > माहेरहून सासरी निघालेली विवाहिता चिमुकलीसह प्रवासातच गायब; घडलेल्या प्रकाराने कुटुंबाला धक्काच

यंदाच्या निवडणुकीत तरुणाईची संख्या वाढली असून, तिशीतील विवाहित महिला उमेदवारांची संख्या जास्त असल्याचे दिसते. यात कोणी उच्चशिक्षित, शिक्षित असून, काही महिला व्यावसायिक, गृहिणी आणि शेतकरी आहेत. वर्षानुवर्षे घरातील आणि शेतीच्या कामात मग्न असणाऱ्या महिला मात्र आता मैत्रिणी, जावा, नणंद, भावजय आणि भाऊबंद महिलांच्या सोबतीने घरोघरी जाऊन प्रचार करत आहेत. एरवी पुरुषांसमोर न येणाऱ्या या महिला आता बिनधास्तपणे घरोघरी जाऊन संपूर्ण कुटुंबाला मतदानासाठी साद घालत आहेत. किंबहुना स्वतः, पतीने, सासू-सासरे यांनी राजकारणात व समाजकारणात केलेल्या कामाचा पाढा वाचून मी यापुढे कसे काम करणार हे या महिला पटवून देताना दिसत आहे. एकूणच या वेळी गावच्या राजकारणात अनेक शिक्षित, तरुण महिला कारभारणी म्हणून पाहायला मिळतील हे नक्की. यातही ५९ टक्के म्हणजे ३११ ग्रामपंचायतींना सरपंच महिलाच लाभणार असून, गावागाड्याचा कारभार करण्याची संधी त्यांना मिळणार आहे. 

 

गावाच्या सर्वांगीण विकासासाठी महिला सक्षमपणे काम करू शकतात. विशेषतः महिलांचे प्रश्‍न सोडविण्यासाठी महिलांना अधिक संधी देण्याची गरज आहे. गावात व वस्तीवर पाणी, पथदीप, घरकुल, आरोग्य आदी मूलभूत सुविधा निर्माण करण्यासाठी मी प्रयत्न करणार आहे. -वंदना दत्तात्रय सानप, उमेदवार, राजापूर 

अशा निवडीतील महिला सदस्या 
तालुका ग्रामपंचायत सदस्या 

मालेगाव -९९ - ४८५ 
येवला -६९ - ३२७ 
कळवण - २९ - १३१ 
सिन्नर - १०० - ४६० 
इगतपुरी - ८ - ३२ 
दिंडोरी - ६० - २७५ 
त्र्यंबकेश्‍वर - ३ - ११ 
निफाड - ६५ - ३३८ 
सटाणा - ४० - १९९ 
चांदवड - ५३ - २४० 
देवळा - ११ - ६० 
नांदगाव - ५९ - २६४ 
नाशिक - २५ - १३० 
एकूण - ६२१ - २,९४८  
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: participation of women in election yeola nashik marathi news