रुग्णालयातील कर्मचाऱ्यांना टांग मारून पळालेल्या 'त्या' रुग्णाला घेतले ताब्यात...

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 5 एप्रिल 2020

कोरोना चाचणीनंतर इतर आजारांवर उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल असलेला रुग्ण शनिवारी (ता.4) प्रशासनाला गुंगारा देऊन फरार झाला. सायंकाळी साडेपाचच्या सुमारास तो रुग्णालयातील कर्मचाऱ्यांना चक्क टांग मारून पळून गेला. त्यास लासलगाव पोलिसांनी विंचूर येथून ताब्यात घेतले. याप्रकरणी जिल्हा रुग्णालयाला ताकीद देण्यात आल्याचे जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी म्हटले आहे. 

नाशिक : कोरोना चाचणीनंतर इतर आजारांवर उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल असलेला रुग्ण शनिवारी (ता.4) प्रशासनाला गुंगारा देऊन फरार झाला. सायंकाळी साडेपाचच्या सुमारास तो रुग्णालयातील कर्मचाऱ्यांना चक्क टांग मारून पळून गेला. त्यास लासलगाव पोलिसांनी विंचूर येथून ताब्यात घेतले. याप्रकरणी जिल्हा रुग्णालयाला ताकीद देण्यात आल्याचे जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी म्हटले आहे. 

प्रकार लक्षात आल्यानंतर तातडीने शोधमोहीम 

वैजापूर (जि. औरंगाबाद) येथील रहिवासी असल्याचे सांगणारा हा रुग्ण 19 वर्षांचा असून, त्याला कोरोना संशयित म्हणून शुक्रवारी (ता. 3) सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल केले होते. हा संशयित रुग्ण येवला भागातील असून, 108 रुग्णवाहिकेतून जिल्हा रुग्णालयात आणण्यात आला होता. कोरोनाच्या संशयावरून चाचणीचा अहवाल निगेटिव्ह आला. मात्र, त्याच्या इतर व्याधीमुळे वैद्यकीय चाचण्या आणि छातीचा एक्‍स रे काढण्याचे काम सुरू असतानाच त्याने कर्मचाऱ्यांना गुंगारा दिला. काही वेळातच हा प्रकार लक्षात आल्यानंतर तातडीने शोधमोहीम सुरू झाली. सायंकाळी पाचपर्यंत दुसरे गेट सुरू असल्याने तेथून तो फरार झाल्याची शक्‍यता आहे. तो फरारी झाल्याचे लक्षात आल्यावर त्वरित यंत्रणा कामाला लागली. 

मेहुण्याने पोलिसांना कळवून लासलगाव पोलिसांच्या ताब्यात दिले

त्यास लासलगाव पोलिसांनी विंचूर येथून ताब्यात घेतले. त्याचा स्वॅब अहवाल निगेटिव्ह आला असून, एक्‍स-रे काढण्यासाठी त्याला नेत असताना त्याने पलायन केले होते. यामुळे नाशिकच्या सरकारवाडा पोलिसांनी त्याला शोधण्यासाठी शोधमोहीम राबविल्यानंतर विंचूर येथील चौफुलीवर पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले. संशयिताने यादरम्यान त्याच्या मेहुण्याला फोन करून विंचूर चौफुलीवर बोलविले होते. संबंधित व्यक्ती विंचूर चौफुलीवर उभा असताना त्याच्या मेहुण्याने पोलिसांना कळवून लासलगाव पोलिसांच्या ताब्यात दिले. त्याला 108 क्रमांकाच्या रुग्णवाहिकेतून नाशिकला पाठवले आहे. 

हेही वाचा > 'ज्या शेतकऱ्यांचे द्राक्षे बाकी आहेत, त्यांनी बेदाणा निर्मिती करावी!' - आमदार दिलीप बनकर

संबंधितांविरुद्ध अत्यंत गंभीर कारवाई होणार

जिल्ह्यात नाकाबंदी असताना कोणत्याही वाहतुकीची सुविधा नसतानाही संबंधित व्यक्ती विंचूरपर्यंत कशी आली. तसेच रिपोर्ट निगेटिव्ह असला तरी दरम्यान, तूर्त त्याच्यापासून धोका नाही; परंतु भविष्यात अशा घटना घडू नयेत, याबाबत जिल्हा रुग्णालय प्रशासनाला सूचना देण्यात आल्या आहेत. असे प्रकार यापुढे आढळून आल्यास संबंधितांविरुद्ध अत्यंत गंभीर कारवाई करण्यात येईल, अशा सूचना दिल्याचे जिल्हाधिकारी मांढरे यांनी म्हटले आहे.  

हेही वाचा > घरबसल्या कोरोनावर फॉरवर्ड केलेला मेसेज 'असा' अंगाशी आला...! की थेट रवानगी जेलमध्येच

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Patient escaping from nashik district hospital vinchur detained by Lasalgaon police nashik marathi news