esakal | लॉकडाउनच्या इशाऱ्याने धडकी! सामान्यांसह लहान-मोठे व्यवसायिक चिंतेत
sakal

बोलून बातमी शोधा

lockdown

यापूर्वीच्या लॉकडाउनमुळे सामान्य नागरिकांसह लहान-मोठ्या व्यावसायिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. अनेकांना कर्ज काढून जीवन जगण्याची वेळ आली होती.

लॉकडाउनच्या इशाऱ्याने धडकी! सामान्यांसह लहान-मोठे व्यवसायिक चिंतेत

sakal_logo
By
युनूस शेख

जुने नाशिक : शहर-जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या वाढत असल्याने सरकारतर्फे शहरात रात्री अकरा ते पहाटे पाचपर्यंत संचारबंदी घोषित केली आहे. सोमवार (ता.२२)पासून त्याची अंमलबजावणी होणार आहे. दरम्यान, नागरिकांनी नियमांचे पालन केले नाही, प्रादुर्भाव वाढत राहिल्यास लॉकडाउनचा इशाराही दिला आहे. यामुळे लहान- मोठ्या व्यावसायिकांमध्ये धडकी भरली आहे.

यापूर्वीच्या लॉकडाउनमधून सावरणे कठीण झाले आहे. आता पुन्हा लॉकडाउन झाले, तर जगणेच कठीण होणार आहे. त्यामुळे ‘लॉकडाउन नको रे बाबा’ अशा प्रतिक्रिया व्यावयासिकांकडून दिल्या जात आहेत. 

‘लॉकडाउन नको रे बाबा’

यापूर्वीच्या लॉकडाउनमुळे सामान्य नागरिकांसह लहान-मोठ्या व्यावसायिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. अनेकांना कर्ज काढून जीवन जगण्याची वेळ आली होती. अनलॉकनंतर काही महिन्यांपासून परिस्थिती सामान्य होत असताना पुन्हा एकदा लॉकडाउनची शक्यता सरकारतर्फे वर्तविण्यात येत आहे. नागरिकांना काही दिवसांचा कालावधी देत सोमवारपासून रात्री अकरा ते पहाटे पाचपर्यंत संचारबंदी करत भविष्यात लॉकडाउनचा इशारा दिला आहे. त्यामुळे सर्वांमध्ये भीती पसरली आहे. पहिल्या लॉकडाउनमध्ये तरी सामाजिक संस्थांची मदत झाली होती. या वेळी काय होणार, हे सांगता येत नाही. उपासमारीची वेळ येईल हे मात्र नक्कीच अशा प्रतिक्रिया दिल्या जात आहेत. त्यामुळे सरकारने निर्बंध कडक करावे. मात्र लॉकडाउन करू नये, अशी मागणी होत आहे. 
 

हेही वाचा - रक्षेसाठी राखी बांधलेले हातच रक्ताने माखलेले! रक्षणकर्ता भाऊच बनला बहिणीसाठी काळ

पहिल्या लॉकडाउनमधून सावरणे कठीण झाले आहे. त्यात पुन्हा लॉकडाउन झाले, तर जगणे कठीण होऊन जाईल. संचारबंदीची वेळ वाढविली, तरी चालेल मात्र लॉकडाउन नको. 
- सादाब अत्तार, चप्पल, बूट विक्रेता

नागरिकांना त्यांच्या जबाबदारीची ओळख करून देण्यासाठी संचारबंदी ठीक आहे. परंतु, लॉकडाउन नको. लॉकडाउनमुळे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. पुन्हा तीच वेळ नको. 
- राजेश रणधीर, विद्यार्थी वर्दी वाहनचालक 

पहिल्या लॉकडाउनमध्ये कसे दिवस गेले, याची कल्पनादेखील करवत नाही. आर्थिक नुकसानीमुळे उपासमारीची वेळ आली आहे. अजून त्यातून सावरण्याचा प्रयत्न करत आहोत. त्यात पुन्हा लॉकडाउनची चर्चा ठोका उडवत आहे. 
दिनेश मोरे, रिक्षाचालक 

हेही  वाचा - थरारक! सिटबेल्टमुळे पेटलेल्या गाडीत अडकला चालक; नातेवाईकांना घातपाताचा संशय 

दैंनदिन वाहनांच्या टायरचे पंक्चर काढून मिळणाऱ्या रकमेतून कुटुंबीयांची उपजीविका करत आहे. लॉकडाउन झाल्यावर रोजगार हिरावून जातो. उदरनिर्वाह चालवणे अवघड होते. त्यामुळे लॉकडाउनची कल्पनादेखील मन हेलावून टाकत आहे. 
जलाल अन्सारी, पंक्चर कारागीर