COVID-19 : 'शहराने पैसे कमवायला शिकवलं अन् गावाने निरोगी आरोग्य सांभाळायला!'...नोकरदार गावाकडे परतले

योगेश सोनवणे : सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 25 मार्च 2020

शहराने पैसे कमवायला शिकवलं पण मात्र गावाने निरोगी आरोग्य सांभाळायला अशी प्रतिक्रिया शहरातून गावाकडे परतलेल्या लोकांकडुन ऐकू येऊ लागली आहे. कोरोनाच्या धास्तीमुळे गावचं एकमेव सुरक्षित आहे असे समजून त्यांनी आपला मोर्चा सुरक्षितते साठी गावाकडे वळविला आहे. 

नाशिक : (दहीवड) नोकरी, व्यवसाय, शिक्षण यांसारख्या कारणांसाठी शहरात स्थलांतरित झालेली मंडळी कोरोनाच्या धास्तीने गावाकडे परतली आहेत. शहराने पैसे कमवायला शिकवलं पण मात्र गावाने निरोगी आरोग्य सांभाळायला अशी प्रतिक्रिया शहरातून गावाकडे परतलेल्या लोकांकडून ऐकू येऊ लागली आहे. कोरोनाच्या धास्तीमुळे गावचं एकमेव सुरक्षित आहे असे समजून त्यांनी आपला मोर्चा सुरक्षितते साठी गावाकडे वळविला आहे. 

मुला बाळांसह कुटुंब गावाकडे आले

गावाकडील बेरोजगार तरुणांना रोजगार उपलब्ध व्हावा म्हणून त्यांनी शहर गाठलं, ग्रामीण भागातील बरेचसे कुटुंब काम धंद्याच्या निमित्ताने शहरात स्थलांतरित झाली. जे कुटुंब शहरात विसावले ते तिकडेच रमले. त्यांचे आपत्य देखील शहरात शिक्षण घेऊ लागली. शिक्षण घेऊन तेही आपल्या कामधंद्याला लागली. गावाकडील शेती व घरे सांभाळण्यासाठी घरातील ज्येष्ठ व वृद्धीमंडळी गावाकडेच वास्तव्यास असल्याचे नेहमी निदर्शनास येते. शहरात विसावलेली कुटुंब सणासुधीला किंवा सुख दुःखाच्या प्रसंगी गावाकडे फिरकतात अन् सुट्ट्या संपताच पुन्हा शहरी जीवनात समरस होतात. परंतु सध्या कोरोनाच्या धास्तीने शासकीय कार्यालयातील कर्मचाऱ्यांची पाच टक्के उपस्थिती वगळता अनेक खासगी कंपनीतील कर्मचारी गावाकडे परतल्याचे चित्र आहे. बरचसे खासगी कंपनीतील कर्मचारी वर्क फ्रॉम होम करताना दिसत आहेत. शाळांनाही सुट्टी जाहीर करण्यात आली असल्यामुळे मुला बाळांसह कुटुंब गावाकडे थांबले आहेत. 

मिळेल त्या वाहनाने गाव गाठले

कोरोनाचा विषाणूंचा प्रसार होऊ नये म्हणून शासकीय पातळीवरून अनेक उपाय योजना केल्या जात आहेत. शहरातील कार्यालये, उद्योग, व्यवसाय ठप्प असून संचार बंदीमुळे शहरातील कुटुंबियांना शहरात चार भिंतींच्या आत राहणे कठीण होऊन बसल्यामुळे अनेक कुटुंबियांनी मिळेल त्या वाहनाने किंवा स्वतःच्या वाहनाने गाव गाठले आहेत. गावात प्रवेश केल्यावर सगळ्यांची आरोग्य तपासणी करून त्यांना घरीच राहण्याचे आदेश प्रशासनाकडून करण्यात आले आहे. 

हेही वाचा> संचारबंदीत जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा सुरळीत सुरू राहणार - छगन भुजबळ

आजच्या घडीला गावातचं सुरक्षितता वाटते म्हणून गावी आलोय...

शहरात एका हाकेवर घराच्या बाहेर न निघता ऑनलाईन हवे ते आपल्या 
दारात मागवले जाते पण आज ते दार सोडून जन्मभूमीत का परतलो याचं खरं उत्तर मला मिळालं ते म्हणजे सुरक्षित राहण्यासाठी.. सध्याची परिस्थिती जर बघितली तर 
सर्वात सुरक्षित ठिकाण हॉस्पिटल नसून गावं वाटत आहे. शुद्ध प्राणवायू, पशु पक्ष्यांची किलबिल, उगवत्या सूर्याचे दर्शन, गवतावरील दवबिंदू आणि मंदिरातून कानी पडणारा 
घंटानाद खूप दिवसानंतर अनुभवला. त्याचं कारण जरी कोरोना असेल तरी हे वास्तव आहे आणि ते मला आवर्जून सांगावस वाटतं. अत्याधुनिक सुविधांचा झगमगाट जरी शहरात असेल तरी आजच्या घडीला गावातचं सुरक्षितता वाटते म्हणून गावी आलोय सध्या वर्क फ्रॉम होम सुरू आहे. - मिलिंद कदम, इंजिनियर जॉनडियर, पुणे (हल्ली मुक्काम, मेशी)

हेही वाचा > ''कोरोना कळतो हो साहेब, पण या शेतमालाचं काय?''...शेतकऱ्यांची परिस्थितीशी झुंज सुरुच


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The peoples who had gone to the city for a job returned to the town for fear of Corona nashik marathi news