पिंपळगावच्या नवविवाहित सूनबाई बनल्या उपजिल्हाधिकारी!

sharda patil.jpg
sharda patil.jpg

नाशिक : (पिंपळगावं बसवंत) काही व्यक्ती स्वप्नपूर्ती झाल्याशिवाय थांबत नाही, मग त्यासाठी हवे ते कष्ट सोसण्याची तयारी ठेवतात. महिनाभरापूर्वी पिंपळगावच्या सूनबाई म्हणून दारातील माप ओलाडलेल्या शारदा सुशांत पाटील यांनी उपजिल्हाधिकारी पदाला गवसणी घालत इतिहास रचला. 

यशाचा प्रवास थरारक व विलक्षण समस्यांचा

मुळच्या अहमदपूर (जि. लातूर) येथील शारदा पाटील यांच्या आई अयोध्याबाई प्राथमिक शिक्षिका, तर वडील बाळासाहेब पाटील बांधकाम व्यावसायिक आहेत. लहानपणापासूनच हुशार असलेल्या शारदा पाटील यांनी दहावी व बारावीला चांगले यश मिळवत पदवीही मिळविली. यांनतर स्पर्धा परीक्षेत उत्तीर्ण होत त्यांनी वनाधिकारी व नंतर अमरावती येथे प्रशिक्षणार्थी तहसीलदार म्हणून कामकाज सुरू केले. परंतु अधिक उंच झेप घेण्याचे स्वप्न त्यांना स्वस्थ बसू देत नव्हते. स्वप्न ही भव्यदिव्य असली, की अडथळेही तेवढेच मोठे असतात. शारदा पाटील यांचाही प्रवास थरारक व विलक्षण समस्यांचा आहे. प्रशिक्षणार्थी तहसीलदार म्हणून काम करत असताना त्यांनी गेल्या वर्षीपासून एमपीएससीचा अभ्यास सुरू केला. गेल्या परीक्षेत अवघ्या एका गुणाने त्यांचे स्वप्न भंगले. थोडक्‍यात हुकलेल्या यशाची हुरहुर मनात कायम असताना जिद्द न सोडता पुन्हा नेटाने अभ्यास केला आणि शुक्रवारी (ता.19) जाहीर झालेल्या निकालात शारदा पाटील यांनी उपजिल्हाधिकारी पदाला गवसणी घातली. 

पिंपळगांवच्या शिरपेचात मानाचा तुरा

भाजपचे जिल्हा संघटक बापूसाहेब पाटील यांचे पुतणे सुशांत पाटील यांच्याशी महिनाभरापूर्वी शारदा यांचा विवाह झाला. सुशांत गडचिरोली येथे वनक्षेत्रपाल पदावर कार्यरत आहे. लॉकडाउनमुळे गेल्या महिन्यात सुशांत व शारदा यांचा विवाह अवघ्या पन्नास पाहुण्यांमध्ये पिंपळगावं बसवंत येथे झाला. राजेंद्र पाटील यांच्या घरात सूनबाई म्हणून पाऊल ठेवलेल्या शारदा यांनी पाच महिन्यांपूर्वी एमपीएससी परीक्षा दिली होती. शुक्रवारी लागलेल्या निकालात मुलींमध्ये राज्यात शारदा पाटील पाचव्या क्रमांकाने उपजिल्हाधिकारी म्हणून उत्तीर्ण झाल्या. पाटील कुटुंबात यापूर्वी सुशांत वनक्षेत्रपाल, तर स्वाती पाटील कल्याण महापालिकेत उपायुक्त पदावर कार्यरत आहेत. शारदा यांच्या रूपाने पाटील कुटुंबात तिसरी व्यक्ती उच्चपदस्थ अधिकारी म्हणून ओळखली जाणार आहे. 

 उपजिल्हाधिकारी होण्याचे स्वप्न स्वस्थ बसू देत नव्हते. थोडक्‍यात आलेल्या अपयशाची सल मनात न ठेवता इरादा पक्का केला. सलग सात ते आठ तास अभ्यास केला. आई-वडील व सुशांतने दिलेले प्रोत्साहन, पिंपळगावच्या पाटील कुटुंबीयाचा आधार यामुळे आज हे ध्येय गाठता आले. नोकरीतून वेळ मिळाला तर यूपीएससीच्या परीक्षेची तयारी करणार आहे. -
शारदा पाटील (उपजिल्हाधिकारी) 

पिंपळगावमध्ये पहिली महिला उच्च अधिकारी पदावर पोचली याचा अभिमान आहे. इतर मुलींसाठी शारदा पाटील यांची कामगिरी आदर्श ठरेल. 
- बापूसाहेब पाटील (जिल्हा संघटक, भाजप)  

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com