Planning should be done for the farmers who repay the loan regularly nashik marathi news
Planning should be done for the farmers who repay the loan regularly nashik marathi news

जिल्ह्यातील शेतकऱ्यांना कर्ज वाटपासाठी नियोजन करा - कृषिमंत्री दादा भुसे

नाशिक/मालेगाव : नाशिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची स्थिती आपणास ज्ञात आहे. शेतकरी कर्जमुक्ती अंतर्गत 915 कोटी रुपये शासनाकडून प्राप्त झाले. जिल्हा बॅंकेने कर्जपात्र सभासदांसह, नियमित कर्जफेड करणाऱ्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना कर्ज वाटपासाठी नियोजन करावे, पतसंस्था व व्यक्तिगत ठेवीदारांसाठी नियोजनबध्द कार्यक्रमाची आखणी करुन ठेवीदारांनाही बँकेने दिलासा द्यावा. 30 सप्टेंबरपर्यंत पात्र सभासदांना कर्ज वितरण करावे, असे आवाहन कृषिमंत्री दादा भुसे यांनी सोमवारी (ता.14) येथे केले.

सप्टेंबरपर्यंत कर्जवितरण होणार

जिल्हा बँकेची खरीप कर्जवाटपाची स्थिती समाधानकारक नसल्याची खंत व्यक्त करतानाच तालुक्यात 122 कोटीपैकी फक्त 29 काेटी रुपये कर्ज वाटप झाले. या संदर्भात सोमवारपर्यंत निर्णय न झाल्यास जिल्हा बॅंकेत ठिय्या देण्याचा इशारा कृषिमंत्री दाद भुसे यांनी शनिवारी दिला होता. त्या पार्श्वभूमीवर सोमवारी जिल्हा बँकेचे अध्यक्ष केदा आहेर, संचालक शिरीष कोतवाल, विभागीय अधिकारी एम. टी. डंबाळे, शाखा निरीक्षक गोरख जाधव यांनी सोमवारी भुसे यांच्या संपर्क कार्यालयात भेट दिली. या वेळी झालेल्या बैठकीत  भुसे यांनी शेतकऱ्यांना कर्जवितरणा संदर्भात विविध सूचना केल्या. 30 सप्टेंबरपर्यंत कर्जवितरण करु. तालुक्यासाठी पाच कोटी रुपये तातडीने मंजुर करण्याचे आदेश अध्यक्ष आहेर यांनी या वेळी दिले. या वेळी पतसंस्था व व्यक्तिगत ठेवीदारांच्या ठेवीसंदर्भात, बँकेची आर्थिक स्थिती, बँकेची सामोपचार कर्ज परतफेड योजना, जिल्ह्यातील कर्जमाफी, कर्जमाफीस पात्र सभासद या सह विविध विषयांवर चर्चा झाली. पाच कोटी रुपये मालेगाव तालुक्यातील प्रलंबित कर्ज प्रकरणांसाठी तातडीने देण्यात आले. आहेर यांच्या आश्‍वासनानंतर भुसे यांनी जिल्हा बँकेत ठिय्या देण्याचा निर्णय मागे घेतला.

कोतवाल यांनी यावेळी जिल्हा बँकेला पीक कर्जाबराेबरच मध्यम मुदतीचा कर्जपुरवठा करणे आवश्‍यक आहे. जिल्हा बँकेची स्थिती पहाता राज्य सहकारी बँकेकडून निधी उपलब्ध करुन देण्यासाठी आपण पुढाकार घ्यावा अशी विनंती भुसे यांना केली. यासंदर्भात बँकेचे शिष्टमंडळ मुंबई येथे श्री. भुसे व राज्य सहकारी बँकेच्या पदाधिकाऱ्यांची भेट घेईल असे निश्‍चित करण्यात आले. यावेळी बाजार समितीचे उपसभापती सुनील देवरे, संचालक गोरख पवार, गटसचिव संघटनेचे प्रदेश अध्यक्ष विश्‍वनाथ निकम, पंचायत समितीचे माजी सभापती धर्मा पवार, सुरेश पवार, शिवसेनेचे तालुकाप्रमुख संजय दुसाने आदी उपस्थित होते.

7 हजार शेतकरी अद्यापही वंचित

मालेगाव तालुक्यातील 12 हजार 900 सभासदांना 122 कोटी रुपयांची कर्जमाफी मिळाली आहे. 12 हजार शेतकरी कर्जास पात्र आहेत. यासाठी मालेगाव विभागाने जिल्हा बँकेकडे 90 कोटीची मागणी केलेली आहे. जिल्हा बँकेने आजवर 4 हजार 720 सभासदांना 29 कोटी रुपयांचे वाटप केले आहे. सुमारे 7 हजार शेतकरी अद्यापही कर्जापासून वंचित आहेत. 61 कोटी रुपये रुपये अद्याप बँकेकडून प्राप्त होणे बाकी आहे.

संपादन- रोहित कणसे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com