मालेगाव पोलिसांची 'ऑलआऊट मोहिम'! पाऊणेआठ लाखाचा ऐवज जप्त; 36 संशयित अटकेत

malegaoan all out operation
malegaoan all out operation

नाशिक/मालेगाव : नवरात्रोत्सव व आगामी ईद-ए-मिलाद सण उत्सवांच्या अनुषंगाने मालेगाव विभागात ऑलआऊट स्कीम, कोंबींग ऑपरेशन राबवत सराईत गुन्हेगारांची आश्रयस्थाने, हॉटेल, ढाबे, लॉज तपासणी करण्यात आली. पोलिसांनी तीन दिवसांच्या कारवाईत भारतीय हत्यार कायदा, गोवंश हत्या व जुगार कायद्यान्वये 36 संशयितांना अटक केली.

या कारवाईत एक गावठी पिस्तुल, तीन तलवारी, एक सुरा, पाच जनावरे, पीकअप गाडी, 14 मोबाईल, 7 दुचाकी व रोख रक्कम असा सुमारे 7 लाख 82 हजार रुपयांचा ऐवज जप्त करण्यात आल्याचे अपर पोलिस अधिक्षक चंद्रकांत खांडवी यांनी बुधवारी (ता. 21) येथे पत्रकार परिषदेत सांगितले. खांडवी म्हणाले, की पवारवाडी गोळीबारातील संशयित मुद्दसीर अहमद अख्तर हुसेनला (33, राशीदनगर) तातडीने अटक केली. त्याच्या ताब्यातून 15 हजाराची गावठी पिस्तुल व गुन्ह्यात वापरलेली दुचाकी जप्त करण्यात आली. याच गुन्ह्यातील एक संशयित आबीद उमर मुश्‍ताक याच्या कब्जातून 2400 रुपयांच्या दोन तलवारी जप्त करण्यात आल्या.

बोलेरो पिकअपसह गायी जप्त

आयशानगर भागातूनही शकील खानला (रा. कामगार कॉलनी) अटक करुन त्याच्या जवळून 500 रुपये किंमतीची धारदार तलवार जप्त केली. येवला तालुका पोलिसांनी अमोल उर्फ भावड्या वाघ (24,रा. राजापूर) याच्या ताब्यातून धारदार सुरा व मोबाईल असा तीन हजाराचा ऐवज जप्त केला. शहर व कॅम्प पाेलिसांनी केलेल्या कारवाईत कमालपुरा भागात 65 हजार रुपये किंमतीच्या तीन जर्शी गाई व नामपूर रस्त्यावर केलेल्या कारवाईत बोलेरो पिकअपसह एक गाय, एक बैल असा 2 लाख 7 हजार रुपयांचा ऐवज जप्त करण्यात आला. रमजानपुरा, किल्ला, आयेशानगर पोलिस ठाण्यात करण्यात आलेल्या जुगाराच्या कारवाईत 27 संशयितांना अटक करुन 14 मोबाईल, 7 दुचाकी, रोख रक्कम असा सुमारे 4 लाख 89 हजार रुपयांचा ऐवज जप्त करण्यात आला.

36 संशयितांना अटक

वेगवेगळ्या कारवाईत 36 संशयितांना अटक करण्यात आली. उपअधिक्षक मंगेश चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक खगेंद्र टेंभेकर, गुलाबराव पाटील, रवींद्र देशमुख, भाऊसाहेब पठारे, सहाय्यक पोलिस निरीक्षक दिगंबर पाटील व सहकाऱ्यांनी ही कारवाई केली. आगामी काळातही सातत्याने या पध्दतीची कारवाई सुरु राहील. अवैध धंद्यांना आळा घालण्यात येईल. दुचाकी चोरीतील गुन्हेगार लवकरच जेरबंद करु असे त्यांनी सांगितले. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com