PHOTOS : ज्येष्ठ नेते विनायकदादा पाटील पंचतत्वात विलीन; सरपंच, वनशेतीचे जनक ते मंत्री असा राजकीय प्रवास

सकाळ वृत्तसेवा
Saturday, 24 October 2020

महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांचे मार्गदर्शन लाभलेला एक नेता काळाच्या पडद्याआड गेला आहे. सरपंच, वनशेतीचे जनक ते मंत्री असा विनायकदादा पाटील राजकीय प्रवास थक्क करणारा होता.

नाशिक :  माजी मंत्री विनायकदादा पाटील (वय ७७) यांचे शुक्रवारी (ता. २३) रात्री पावणेबाराला निधन झाले. गेल्या काही दिवसांपासून त्यांच्यावर मुंबई येथील लीलावती रुग्णालयात उपचार सुरू होते. मुंबईतून उपचार घेऊन आल्यानंतर नाशिक येथे ते डायलिसिसवर होते.  महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांचे मार्गदर्शन लाभलेला एक नेता काळाच्या पडद्याआड गेला आहे. सरपंच ते मंत्री असा त्यांंचा राजकीय प्रवास थक्क करणारा होता.

विनायकदादा पंचतत्वात विलीन

विनायकदादा पाटील यांच्यावर आज सकाळी (ता.२४) नाशिकच्या गोदाकाठी अमरधाममध्ये शासकीय इतमामात अंत्यसंस्कार झाले. पालकमंत्री छगन भुजबळ, जिल्हाधिकारी सुरज मांढरे, आमदार देवयानी फरांदे, आमदार सरोज आहिरे आदी उपस्थित होते. 

सरपंच ते मंत्री असा राजकीय प्रवास

विनायकदादांचा जन्म १९ ऑगस्ट १९४३ ला निफाड तालुक्‍यातील शेतकरी कुटुंबात झाला. ते स्वतःही व्यवसायाने शेतकरीच होते. 
कुंदेवाडी गावचे सरपंच, निफाड तालुका पंचायत समितीचे सभापती, निफाडचे आमदार, विधान परिषदेचे सदस्य ते महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळात उद्योग, सांस्कृतिक कार्य, क्रीडा व युवकसेवा या विभागांचे मंत्री राहिले आहेत. सहकारी क्षेत्रात कुंदेवाडी विविध कार्यकारी सहकारी संस्थेचे अध्यक्ष, नाशिक जिल्हा सहकारी भूविकास बॅंकेचे अध्यक्ष, निफाड सहकारी साखर कारखान्याचे संचालक, नाशिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेचे संचालक म्हणूनही त्यांनी काम केले आहे. राज्यमंत्र्यांच्या दर्जासह त्यांना महाराष्ट्र राज्य वनविकास महामंडळाचे अध्यक्षपदही पाच वर्षे दिले होते. 

भारतातील सहकारी वनशेतीचे ते जनक

वनशेती हा त्यांच्या आवडीचा व अभ्यासाचा विषय होता. भारतातील सहकारी वनशेतीचे ते जनक आहेत. ज्या वनस्पतीच्या बियांच्या तेलापासून डिझेल या इंधनाची निर्मिती होऊ शकते त्या जेट्रोफा वनस्पतीची मोठ्या प्रमाणावर तंत्रशुद्ध शेती त्यांनी १९८६ मध्ये करून त्यावर प्रायोगिक तत्त्वावर डिझेल निर्माण करून जगाचे लक्ष वेधून घेतले होते. जेट्रोफाच्या लागवडी आता सरकारमार्फत भारतभर सुरू झाल्या आहेत व जगातील अनेक देश या लागवडीत व डिझेल निर्मितीत रस घेत आहेत. जेट्रोफाच्या लागवडी व त्यापासून डिझेलनिर्मिती हा विषय विनायकदादांच्या कामाचा संदर्भ घेतल्याशिवाय पूर्ण होत नाही. 

युनायटेड नेशनचा आउट स्टँडिंग फार्मर पुरस्कार

वनशेतीतील योगदानाकरिता त्यांना महाराष्ट्र शासनाचा ‘कृषीभूषण' व ‘ वनश्री' भारत सरकारचा इंदिरा प्रियदर्शनी ‘ तसेच युनायटेड नेशनचा आउट स्टँडिंग फार्मर हा पुरस्कार त्यांना मिळाला होता. एफएक्यू व रोलेक्स पुरस्कार मिळविणारे ते पहिले व एकमेव भारतीय आहेत. त्यांना प्रतिष्ठित असा ‘जमनालाल बजाज पुरस्कार’ही मिळाला होता.

 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Political journey of late former minister Vinayak patil nashik marathi news