महाविकास आघाडीचा पॅटर्न 'इथे' यशस्वी होणार? भाजपसह मनसेची कसोटी 

सकाळ वृत्तसेवा 
Thursday, 9 January 2020

राज्यात नव्याने तयार झालेल्या महाविकास आघाडीचा पॅटर्न यशस्वी करण्यासाठी शिवसेना, कॉंग्रेस व राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते सरसावले आहेत. या प्रभागात महाविकास आघाडीला यश मिळाल्यास महासभेत राष्ट्रवादी कॉंग्रेसचा एक सदस्य वाढेल. तर भाजपला एक जागा गमवावी लागेल. स्थायी समिती सदस्यत्वाच्या गुणोत्तर प्रमाणावर त्याचा फरक पडेल

नाशिक : राज्यात नव्याने तयार झालेल्या महाविकास आघाडीचा पॅटर्न यशस्वी करण्यासाठी शिवसेना, कॉंग्रेस व राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते सरसावले आहेत.

महापालिका पोटनिवडणुकीत भाजपसह मनसेची कसोटी 

विधानसभा निवडणुकीसाठी रिक्त झालेल्या प्रभाग 22 अ व प्रभाग क्रमांक 26 अ मध्ये गुरुवारी (ता.9) पोटनिवडणूक होत असून, निवडणुकीच्या माध्यमातून सत्ताधारी भारतीय जनता पक्षाची कसोटी लागणार आहे. पोटनिवडणूक पुढील निवडणुकीची दिशा ठरविणारी असल्याने दोन्ही जागा पदरात पाडून घेण्यासाठी भाजपचे प्रयत्न आहेत. प्रभाग 26 मध्ये मनसेला यश आल्यास महापालिकेतील टक्का वाढणार आहे. प्रभाग 22 अ मध्ये भाजपच्या नगरसेविका सरोज आहिरे यांनी राजीनामा देत राष्ट्रवादी कॉंग्रेसकडून देवळाली विधानसभेची निवडणूक लढविली होती. तर प्रभाग 26 अ मधून शिवसेनेचे नगरसेवक दिलीप दातीर यांनी राजीनामा देत मनसेकडून पश्‍चिम विधानसभा मतदारसंघाची निवडणूक लढविली होती. त्या दोन्ही जागांवर मतदान होत आहे. प्रभाग 22 मध्ये आठ उमेदवार असून, महाविकास आघाडीतर्फे राष्ट्रवादीचे जगदीश पवार व भाजपकडून विशाखा शिरसाठ निवडणूक लढवत आहेत. राष्ट्रीय समाज पक्षातर्फे जितेंद्र लासुरे निवडणूक लढवत आहेत, तर अरुण गिरजे, रामदास सदाफुले, मनोज सातपुते, सारिका कीर, नितीन जगताप अपक्ष निवडणूक लढवत आहेत. प्रभाग 26 मधून शिवसेनेचे मधुकर जाधव, भाजपचे कैलास अहिरे, मनसेचे दिलीप दातीर, माकपचे मोहन जाधव यांच्याव्यतिरिक्त अपक्ष एकनाथ सावळे, सुवर्णा कोठावदे यांच्यात लढत होत आहे. 

हेही वाचा > भुजबळ की भुसे? नाशिकचे पालकत्व कोणाला?

भाजप, शिवसेनेची कसोटी 
प्रभाग 22 मध्ये महाविकास आघाडी व भाजपमध्ये लढत असली तरी अपक्ष रामदास सदाफुले यांचे आव्हान आहे. या प्रभागात महाविकास आघाडीला यश मिळाल्यास महासभेत राष्ट्रवादी कॉंग्रेसचा एक सदस्य वाढेल. तर भाजपला एक जागा गमवावी लागेल. स्थायी समिती सदस्यत्वाच्या गुणोत्तर प्रमाणावर त्याचा फरक पडेल. प्रभाग 26 मध्ये पूर्वी शिवसेनेकडे जागा होती. परंतु आता दातीर मनसेकडून निवडणूक लढवत असून, मनसेकडे जागा गेल्यास महापालिकेतील सदस्यांची संख्या एकने वाढेल. तर शिवसेनेने जागा कायम राखल्यास आब कायम राहील. भाजपकडे जागा आल्यास महापालिकेच्या आगामी निवडणुकीचा कौल काही प्रमाणात स्पष्ट होईल. 

मतदारसंख्या 
- प्रभाग 22 अ- 30,165 
- प्रभाग 26 अ- 26,606 

हेही वाचा > PHOTOS : सहनशीलतेची हद्द पार..ज्येष्ठ रुग्णाचा पाहिला अंत.. रुग्णालय सामान्यांसाठी की धनदांडग्यांसाठी?


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Political News of Municipal by-election Nashik Marathi News