गुजरात, राजस्थानमधील डाळिंब उत्पादक थेट "कसमादे'त? हे आहे कारण...

गोकुळ खैरनार : सकाळ वृत्तसेवा 
Tuesday, 9 June 2020

गुजरात व राजस्थानमध्ये जून-जुलैमध्ये छाटणी केली जाते. जानेवारी ते मार्चदरम्यान फळकाढणी होते. कुशल कामगारांअभावी बागा संकटात आल्याने परराज्यातील काही डाळिंब उत्पादक थेट कसमादेत येऊन कामगारांना घेऊन जात आहेत. उत्तर गुजरातमधील शेतकरी छाटणीसाठी मोठ्या झाडास 20 रुपये मजुरी देण्यास तयार आहेत. ​

नाशिक/मालेगाव : डाळिंबबागेत काम करणारे कुशल कामगार पायघड्या घालूनही कोरोनाच्या भीतीपोटी येण्यास तयार नसल्याचे पाहून गुजरात, राजस्थानमधील डाळिंब उत्पादक थेट "कसमादे'त दाखल होत आहेत. कामगारांच्या दारात गाडी आणून त्यांना कामासाठी नेले जात आहे. कामगारांना पाच हजारांपर्यंत ऍडव्हान्स मिळत असून, छाटणीचा मोबदला वाढून मिळणार आहे. शिक्षणापेक्षा अंगी असलेल्या कलेमुळे "हायटेक' झालेला हा कामगारही खुशीत स्पेशल गाडीने परराज्यात रवाना होत आहे. 

कामगारांचा भाव वधारला 
कसमादेत डाळिंबावरील कुशल कामगारांची खाण आहे. 15 ते 20 हजार कामगार गुजरात, राजस्थान, तमिळनाडू, पंजाब आदी राज्यांमध्ये छाटणीला जातात. लॉकडाउनमुळे गावी आलेल्या कामगारांना 15 दिवसांपासून बोलावणे येत आहे. "गाडी करून या, आम्ही भाडे देऊ', असा सांगावा होता. मात्र, कोरोनाच्या भीतीमुळे व गाडीभाड्याला पैसे नसल्याने कामगारांनी हा सांगावा परतवून लावला. दरम्यानच्या काळात काही कामगार औरंगाबाद, जालना आदी भागात कामास निघून गेले. हक्काचे व नियमित येणारे कामगार लांबतील, या भीतीने परराज्यांतील डाळिंब उत्पादक चिंतित आहेत. यातील काहींनी वाहने आणून कामगारांना नेण्याचा निर्णय घेतला आहे. 

गाडी कामगारांच्या दारात 
गुजरात व राजस्थानमध्ये जून-जुलैमध्ये छाटणी केली जाते. जानेवारी ते मार्चदरम्यान फळकाढणी होते. कुशल कामगारांअभावी बागा संकटात आल्याने परराज्यातील काही डाळिंब उत्पादक थेट कसमादेत येऊन कामगारांना घेऊन जात आहेत. उत्तर गुजरातमधील शेतकरी छाटणीसाठी मोठ्या झाडास 20 रुपये मजुरी देण्यास तयार आहेत. छाटणीतील हा आजवरचा सर्वोच्च भाव असल्याचे कामगारांनी सांगितले. कुशल कामगार उशिरा गेले, तर दोन्ही राज्यांतील डाळिंब अडचणीत येणार आहे. अडीच महिन्यांपासून घरीच असल्याने आर्थिक अडचणीत असलेले कामगारही खुशीने छाटणीसाठी जात आहेत. 

हेही वाचा > भीतीदायक! दोघींना पकडून अंधारात खेचत नेले...भय इथले कधी संपणार?..

नाशिक जिल्ह्यातील कामगार डाळिंबाची चांगली छाटणी करतात. त्यामुळे पीक चांगले येते. आम्ही कामगारांची निवास, जेवण आदींसह सर्व काळजी घेतो. त्यांना दोन्ही बाजूचे प्रवासभाडे देतो. व्यवस्था नसल्यामुळे कामगारांना गुजरातमधून घेण्यास आलो. - ईश्‍वरभाई पटेल, शेतकरी, रोनाल, जि. बनासकांठा, उत्तर गुजरात 

हेही वाचा > वाहनांची वर्दळ कमी..तरीही जाताएत इतके जीव? दुष्टचक्र कधी संपणार?
अडीच महिन्यांपासून काम नसल्याने घरीच होतो. आम्ही वैद्यकीय तपासणी करून जात आहोत. या भागापेक्षा परराज्यात कामाचा चांगला मोबदला मिळतो. -,काशीनाथ पवार, छाटणी कामगार


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: pomegranate growers from Gujarat and rajasthan are in nashik district marathi news