नाशिक जिल्ह्यात उन्हाळ कांद्याला पसंती! मजूर टंचाईने शेतकरी हवालदिल

onion.jpg
onion.jpg

चांदवड (जि.नाशिक) : जिल्ह्यात सर्वत्र उन्हाळ कांद्याची लागवड जोरात सुरू आहे. या वर्षी डिसेंबरअखेर जिल्ह्यात ७८ हजार हेक्टर क्षेत्रावर उन्हाळ कांद्याची लागवड झाली असून, अद्याप ही लागवड सुरूच आहे. कांदा लागवड करताना शेतकरी मजूर टंचाईने हवालदिल झाले आहेत. एकरी लागवडीचा मजुरी दर वाढवूनही लागवडीसाठी मजुरांची टोळी मिळत नसल्याचे चित्र आहे. 

आशादायक : ७८ हजार हेक्टर क्षेत्रावर लागवड 
नगदी पिकांच्या तुलनेत उन्हाळ कांद्याचे पीक तसे परवडते. एकरी उत्पादन जवळपास दीडशे ते दोनशे क्विंटल मिळते. शिवाय या कांद्याला साठवून ठेवण्याचा पर्याय उपलब्ध असतो. बाजारभावात सुधारणा झाली, तर शेतकऱ्यांच्या पदरात दोन पैसे पडू शकतात. त्यामुळे ज्या शेतकऱ्यांकडे पाणी उपलब्ध असते, ते हमखास उन्हाळ कांद्याची लागवड करतात. दोन वर्षांपासून सर्वत्रच पाऊस चांगला झाला आहे. सगळेच पाझर तलाव, नाले तुडुंब भरले होते. त्यामुळे विहिरीची पातळी उंचावली आहे. म्हणूनच मका पिकाची काढणी केल्यानंतर त्या क्षेत्रात बहुतांश शेतकरी उन्हाळ कांद्याची लागवड करीत आहेत. मात्र, उन्हाळ कांद्याची लागवड करताना शेतकऱ्यांना मजूर टंचाईचा सामना करावा लागत आहे.

शेतकऱ्यांपुढे मोठा प्रश्न निर्माण

गेल्या वर्षी उन्हाळ कांद्याची लागवड दर एकरी सात हजार रुपये होती. या वर्षी एकरी आठ ते नऊ हजार रुपये देऊनही मजूर मिळत नसल्याने शेतकऱ्यांपुढे मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. इतर गावांतील मजुरांच्या टोळ्या आणूनसुद्धा काही भागांतील लागवड पूर्ण होत नसल्याचे चित्र आहे. मुख्यत्वे मालेगाव, सटाणा, देवळा, कळवण, येवला, सिन्नर, चांदवड तालुक्यांत मोठ्या प्रमाणात लागवड केली जात आहे. अनेक शेतकऱ्यांनी मध्य प्रदेश, गुजरात, पेठ, सुरगाणा आदी भागांतील मजूर आणलेले आहेत. तरीही मजुरांची टंचाई जाणवत आहे. 

मोठ्या प्रमाणात मजूर टंचाई
चार-पाच वर्षांपूर्वी आदिवासी भागातील मजुरांकडे कामे नसल्याने कामाच्या शोधार्थ होळीनंतर ते उन्हाळ कांदा लागवडीवेळी दर वर्षी येत असत. परंतु, दोन-तीन वर्षांपासून हे मजूर आता मार्केटमधील व्यापाऱ्यांच्या खळ्यावर सावलीत कांदा गोणी भरण्यासाठी जात असल्याने देवळा, बागलाण तालुक्यांत मोठ्या प्रमाणात मजूर टंचाई जाणवू लागली आहे. सध्या सर्वत्र कांदा काढणीचा हंगाम चालू असल्याने स्थानिक गावातील मजूर मिळत नसल्याने शेतकऱ्यांना बाहेरगावाहून मजूर आणणाऱ्या रिक्षा, टेम्पोचालकांची विनवणी करावी लागत आहे. गावागावांत पूर्वी मजुरी करणारे मजूरही आता बागायती शेती करू लागल्याने त्यांच्याकडे रोजगार उपलब्ध झाला असून, तेही अगदी मोजक्या प्रमाणात येतात. 

डिसेंबरअखेर उन्हाळ कांदा लागवडक्षेत्र (हेक्टरमध्ये) 
मालेगाव - १२,७३८ हे. 
सटाणा - २०,५६२ हे. 
नांदगाव - २५१६ हे. 
कळवण - १२,६४६ हेक्टर 
देवळा - ७५०६ हे. 
दिंडोरी - २९८ हे. 
सुरगाणा - ६८ हे. 
नाशिक - १५२ हे. 
त्र्यंबकेश्वर - ०० 
इगतपुरी - २३२ हे. 
पेठ - ८६ हे. 
निफाड - २,२८९ हे. 
सिन्नर - ४९७० हे. 
येवला - ८२३७ हे. 
चांदवड - ५४८७ हे. 
एकुण - ७७७८८ हे. 


खूप महागाचे बियाणे आणले. ते जगविण्यासाठी महागडी औषधे फवारली अन् आता मजुरांची टंचाई एकरी लागवडीसाठी नऊ हजार रुपये देऊनही मजूर मिळेना. मजूर सध्या अडून पाहत आहे. कांद्याला भाव पाहिजे तसा नाही. सर्व प्रतिकूल परिस्थिती पाहता शेतकऱ्यांना तोंड बांधून बुक्याचा मार सहन करावा लागत आहे. - नंदू चौधरी, प्रगतिशील शेतकरी, निंबाळे (ता. चांदवड)  

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com