शेतकऱ्यांना दिलासा! उन्हाळ कांद्याच्या भावामध्ये १०० ते ३५० रुपयांनी वाढ 

onion demand.jpeg
onion demand.jpeg

नाशिक : कांदा निर्यातबंदीच्या दुसऱ्या दिवशी उन्हाळ कांद्याच्या भावात घसरण झाली होती. पण, त्यानंतर भावात सुधारणा होण्यास सुरवात झाली आहे. गेल्या दोन दिवसांच्या तुलनेत शुक्रवारी (ता. १८) क्विंटलला १०० ते ३५० रुपयांनी वाढ झाली. जिल्ह्यातील बाजारात क्विंटलचा सरासरी भाव दोन हजार २०० ते दोन हजार ६०० रुपये क्विंटल असा राहिला. 

सरासरी भाव दोन हजार २०० ते दोन हजार ६०० 

देशांतर्गत मागणी कायम असल्याने कांद्याच्या भावात वाढ होत असल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे. यापूर्वी सुद्धा निर्यातबंदी झाल्यावर ४० रुपये किलोचा कांदा १०० रुपयांपर्यंत पोचला होता. यंदा खरीप तथा पोळ कांदा बाजारात येण्यासाठी आणखी महिन्याभराचा विलंब होणार आहे. त्याचवेळी पावसाने रोपांचे नुकसान केल्याने खरीप कांद्याच्या उत्पादनात निम्म्याने घट येण्याची शक्यता आहे. त्यामुळे साठवणुकीत असलेला आणि देशाला दोन महिने पुरेल इतका उन्हाळ कांदा भाव खाणार, हे जवळपास स्पष्ट झालेले आहे. सर्वपित्री अमावास्येमुळे गुरुवारी (ता. १७) जिल्ह्यातील काही बाजारपेठांमध्ये लिलाव झाले नाहीत. लिलाव झालेल्या कांद्याला मिळालेला भाव क्विंटलला सरासरी रुपयांमध्ये असा : कळवण- अडीच हजार, चांदवड- दोन हजार ४००, मनमाड- दोन हजार ३५०, पिंपळगाव बसवंत- दोन हजार ३५१, दिंडोरी- दोन हजार १००. 

१५ सप्टेंबरपर्यंत २० लाख टनांची आवक 

कृषी विभागाने कांदा उत्पादनाचा अहवाल सरकारला पाठविला आहे. त्यानुसार २०१९-२०२० मध्ये उन्हाळ कांद्याची एक लाख ७१ हजार ३९० हेक्टरवर लागवड झाली होती. त्यात बागलाण, मालेगाव, येवला, कळवण, चांदवड तालुक्यांचे क्षेत्र अधिक आहे. हेक्टरला २२.९३ टन इतकी उत्पादकता मिळाली असून, ३९ लाख ६१ हजार टन कांद्याचे उत्पादन झाले. १५ मार्चपासून १५ सप्टेंबरपर्यंत जिल्ह्यातील बाजारपेठेत १९ लाख ५० हजार क्विंटल कांद्याची विक्री झाली आहे. दरम्यान, जिल्ह्यात ५८ हजार ५२७ चाळी असून, त्यामध्ये १२ लाख २५ हजार टन, तर तात्पुरत्या स्वरूपातील चाळीत ११ लाख टन कांद्याची साठवणूक करण्यात आली आहे. बाजार समितीतील लिलावात सहभागी होण्याऐवजी दोन लाख दहा हजार टन कांद्याची परस्पर विक्री झाली आहे. ‘नाफेड’तर्फे ५० हजार टन कांद्याची खरेदी करण्यात आली आहे. एप्रिल ते सप्टेंबरमध्ये नाशिक निर्यात केंद्रातून एक लाख ९४ हजार टन, तर मुंबईतून सात लाख ३७ हजार टन कांद्याची निर्यात झाली आहे. 

खरीप कांद्याची २३ हजार हेक्टरवर लागवड 

साठवलेल्या उन्हाळ कांद्याचे सहा लाख टनांपर्यंत नुकसान झाले आहे. १५ सप्टेंबरनंतर नऊ लाख ९२ हजार टन कांद्याची विक्री जिल्ह्यात अपेक्षित आहे. या महिन्यात जिल्ह्यातील बाजार समितीत दिवसाला १३ हजार १५ टन कांदा विक्रीसाठी आला असून, आणखी ५५ दिवस साठवलेला कांदा विक्रीसाठी येईल. याखेरीज खरिपात २३ हजार ७९ हेक्टरवर कांद्याची लागवड झाली आहे. या कांद्याचे ११ टन हेक्टरी उत्पादन अपेक्षित असून, दोन लाख ५३ हजार टन कांदा खरिपामध्ये उत्पादित होईल. लेट खरीप कांद्याचे सर्वसाधारण क्षेत्र ५८ हजार ३९५ हेक्टरवर लागवड अपेक्षित आहे. या कांद्याची उत्पादकता हेक्टरी २६ टन अपेक्षित असून, १८ लाख टन कांदा जानेवारीपासून बाजारात विक्रीसाठी येईल, असेही कृषी विभागाच्या अहवालात नमूद करण्यात आले आहे. 

कांद्याच्या भावाची स्थिती 
(आकडे क्विंटलला सरासरी रुपयांमध्ये)
 

बाजारपेठ शुक्रवारी (ता. १८) बुधवारी (ता. १६) 
येवला दोन हजार ६०० दोन हजार ५०० 
निफाड दोन हजार ३५१ दोन हजार ३५० 
मुंगसे दोन हजार ५०० दोन हजार १५० 
कळवण दोन हजार ४०१ दोन हजार १०० 
चांदवड दोन हजार २०० दोन हजार २०० 
मनमाड दोन हजार ४५० दोन हजार ३५० 
पिंपळगाव दोन हजार ४५१ दोन हजार ३५१ 
दिंडोरी दोन हजार ५५० दोन हजार १२२ 
देवळा दोन हजार ६०० दोन हजार ५०० 
नामपूर दोन हजार ६५० दोन हजार ४५०  

संपादन - किशोरी वाघ

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com