लुटालुट थांबणार तरी कधी?...बियाण्यांचा दर तिप्पट...शेतकरी हतबल!

1Soyabin_2.jpg
1Soyabin_2.jpg

नाशिक : टाळेबंदीत शेतीकामे शिथिल झाली असताना बियाण्यांची दरवाढ झाल्याने शेतकऱ्यांमध्ये संतापाचे वातावरण आहे. मागील वर्षासारखीच बीज प्रक्रियेच्या नावाखाली अधिक दर आकारले जात आहेत. हे सर्व असताना हमी देऊनही प्रादुर्भाव दिसून येतो. मग अशावेळी कृषी विभागाचा गुणवत्ता नियंत्रण विभाग नेमका कुठे अन्‌ नेमका काय करतोय, असा सवाल शेतकरी उपस्थित करत आहेत. 

दिलासा मिळणार की नाही

सोयाबीन बियाण्यांचा सध्या तुटवडा असून, मका बियाण्यांची बीज प्रक्रियेखाली लूट सुरू आहे. खरीप कर्ज मिळत नसल्याने उसनवारी, सावकारी रकमा घेऊन हंगामाचे नियोजन करत आहेत. काही विक्रेते उधारीच्या नावाखाली अतिरिक्त दर व काही ठिकाणी व्याज आकारत असल्याची बाब नाव जाहीर न करण्याच्या बोलीवर बोलून दाखविली. त्यामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळणार की अशीच लूट होणार, असा सवाल शेतकरी करू लागले आहेत. 

बीज प्रक्रियेच्या नावाखाली लूट 

सोयाबीन बियाणे मागणीच्या तुलनेत उपलब्ध नसल्याने अगोदरच दरवाढ झाली आहे. त्यातही मागणी व पुरवठा गणित बिघडल्याने दरवाढीचा प्रश्‍न निर्माण झाला आहे. मक्‍याच्या बाबतीत मागील लष्करी अळीचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी बियाण्याला प्रतिबंधात्मक औषधांचे वेष्टन असल्याचे कारण पुढे करत दरवाढ झाली. मात्र त्याचे परिणाम दिसून आले नाही. चालू वर्षी ही पुन्हा झालेली दरवाढ शेतकऱ्यांसाठी डोकेदुखी ठरत आहे. 

 दरफलक नसल्याने संताप

चांदवड तालुक्‍यातील काही भागात कृषी निविष्ठा विक्री केंद्रात दर फलक नाही, त्या दुकानांमध्ये चांदवड तालुक्‍याचे कृषी अधिकारी यांनी दुर्लक्ष करत असल्याचा आरोप माहिती अधिकार कार्यकर्ते राजू खंगाळ यांनी केला आहे. पेठसारख्या आदिवासी बहुल तालुक्‍यातील काही भागात दर फलक न लावता चढ्या दराने विक्री होत असल्याबाबत कृषी विभागाला लक्ष देण्याबाबत कॉंग्रेस पक्षाने निवेदन दिले आहे. त्यामुळे शेतकरी अडचणीत असताना कृषी विभागाचे लक्ष नसल्याने संताप व्यक्त होत आहे. 

मागील काही वर्षांपूर्वी पाच किलोपर्यंत पिशव्या उपलब्ध होत्या. अलीकडे वजन कमी करून त्या चार किंवा 3.5 किलो इतक्‍या उपलब्ध होऊ लागल्या आहेत. वजन कमी झाले, मात्र गेल्या दोन वर्षात 400 ते 500 रुपयांपर्यंत वाढ झाल्याने शेतकऱ्यांचा उत्पादनखर्च वाढतच आहे. - ज्ञानेश्‍वर कांगुणे, शेतकरी, दरसवाडी (ता. चांदवड) 

मका 1,200 ते 1,300 रुपये क्विंटल अन्‌ बियाण्यांची मका 35 हजार रुपये प्रतिक्विंटल. मग सांगा, असा नेमका कोणता खर्च बियाणे प्रक्रियेला येतो. त्याचा खर्च चार किलोसाठी असतो, कंपन्यांनी खुलासा करावा अन्‌ शेतकऱ्यांची होणारी लूट थांबवावी. सरकारी यंत्रणांचे दुर्लक्ष असल्याने शेतकऱ्यांना भुर्दंड का? कृषिमंत्र्यांनी यात लक्ष द्यावे. हा प्रत्येक शेतकऱ्याच्या मनातील प्रश्‍न आहे. - श्रावण भोरकडे, शेतकरी, पिंपळगाव जलाल (ता. येवला)  

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com