नुकसानभरपाईसह सरसकट पीकविमा द्या ; इगतपुरी तालुक्यातील शेतकऱ्यांची मागणी 

गौरव परदेशी
Friday, 16 October 2020

भातशेतीची खाचरेच्या खाचरे भुईसपाट झाल्याने भात उत्पादक शेतकऱ्यांवर पुन्हा आस्मानी संकट ओढावले आहे. खरिपाच्या भातपिकासह नागली, वरई, भुईमूग आदी पिकांचे नुकसानच झाल्याने शेतकऱ्यांना शासनाच्या मदतीशिवाय पर्यायच नाही

खेडभैरव (जि.नाशिक) : तालुक्यातील महत्त्वाचे भातपीक वादळी पावसाच्या तडाख्याने जमीनदोस्त झाले. भातशेतीची खाचरेच्या खाचरे भुईसपाट झाल्याने भात उत्पादक शेतकऱ्यांवर पुन्हा आस्मानी संकट ओढावले आहे. खरिपाच्या भातपिकासह नागली, वरई, भुईमूग आदी पिकांचे नुकसानच झाल्याने शेतकऱ्यांना शासनाच्या मदतीशिवाय पर्यायच नाही. याची तातडीने दखल घेऊन शेतकऱ्यांना शासनाने नुकसानभरपाई देऊन सरसकट पीकविमे मंजूर करण्याची मागणी येथील शेतकऱ्यांनी केली. 

नुकसानभरपाईसह सरसकट पीकविमा द्या
या वर्षी सुरवातीपासूनच भातशेती संकटात आहे. सुरवातीला शेतकऱ्यांना पावसाची जवळपास दोन महिने तीव्र प्रतीक्षा करावी लागली. त्यामुळे भात लागवडीलाही उशीर झाला. त्यानंतर कशीबशी उशिरा लागवड झाल्यानंतर कमी कालावधीत जास्त पाऊस झाल्याने भातशेतीला प्रचंड फटका सहन करावा लागला. महिनाभरातच करपा, तुडतुडा, पांढरा टाका या रोगांनी पिके खराब झाली. तालुक्‍यातील शेतकऱ्यांसह अनेक सामाजिक संघटनांनी शासनाकडे मदतीसाठी मागणी केली. बुधवारी झालेल्या वादळी पावसाने अक्षरशः पिके भुईसपाट झाली. 

हेही वाचा > एकुलती एक चिमुरडी झाली पोरकी! बाप अपराधी तर आई देवाघरी; सातपूरमधील दुर्दैवी घटना

उदरनिर्वाह करायचा कसा? 
तालुक्यातील खरिपाचे भात हे मुख्य पीक असून, शेतकऱ्यांच्या वर्षभराचा उदरनिर्वाह याच पिकाच्या उत्पन्नावर अवलंबून असतो. या वर्षी भातपिकासह नागली, वरई, भुईमूग आदी पिके पूर्णपणे उद्ध्वस्त झाल्याने उत्पन्न येणार नाही. वर्षभराचा उदरनिर्वाह करायचा कसा, असा प्रश्न शेतकऱ्यांना पडला आहे. शेतकऱ्यांनी उधार उसनवारी करून बी-बियाणे, खते, औषधे खरेदी केली. मात्र उत्पन्नच मिळणार नसल्याने हे कर्ज फेडायचे कसे, असा प्रश्न उभा आहे. 

हेही वाचा > धक्कादायक! आजोबांचे हातपाय बांधून नातूने फेकले नाल्यात; अंगावर काटा आणणारी करतूत 

सरसकट पीकविमे मंजूर करावेत

भातपिक करपा रोगाच्या संकटात असताना माझे एक ते दीड एकराचे नुकसान झाले. आता वादळी पावसाने दोन एकर भातपीक भुईसपाट झाले. शासनाने याची तातडीने दखल घेऊन नुकसानभरपाई देऊन सरसकट पीकविमे मंजूर करावेत. - शंकर बोंद्रे, शेतकरी, खेडभैरव 

 

ज्या शेतकऱ्यांनी या वर्षी पीकविमा भरला असेल, अशा शेतकऱ्यांचे नुकसान झाले असल्यास ‘क्रॉप इन्शुरन्स ॲप्लिकेशन’द्वारे आपल्या पिकांच्या नुकसानीची माहिती भरावी. यामुळे आपल्या नुकसानीची माहिती विमा कंपनीला समजू शकेल व योग्य न्याय मिळेल. - शीतलकुमार तंवर, तालुका कृषी अधिकारी, इगतपुरी  
 

संपादन - ज्योती देवरे 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Provide crop insurance with compensation igatpuri farmers demand nashik marathi news