विद्यार्थ्यांना दिलासा! पुणे विद्यापीठाकडे करा परीक्षा समस्‍या नोंदणी; संकेतस्‍थळावर अर्ज उपलब्ध

अरुण मलाणी
Thursday, 15 October 2020

तांत्रिक अडचणींमुळे गुणांवर परिणाम व्‍हायला नको म्हणून अनेक विद्यार्थ्यांनी ऑफलाइन परीक्षेचा पर्याय निवडला होता. सोमवारी परीक्षेच्‍या पहिल्‍या दिवशी ऑनलाइन व ऑफलाइन अशा दोन्‍ही परीक्षांमध्ये तांत्रिक अडचणी उद्भवल्‍याने विद्यार्थ्यांना मनस्‍तापाला सामोरे जावे लागले होते.

नाशिक : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठार्फे सोमवार (ता. १२)पासून सुरू झालेल्‍या अंतिम वर्ष परीक्षांमध्ये तांत्रिक अडचणींमुळे विद्यार्थ्यांना मनस्‍ताप होत होता. या गोंधळाची तातडीने दखल घेत ‘सकाळ’ने विद्यार्थ्यांच्‍या व्‍यथा मांडल्‍या. परिणामी पुणे विद्यापीठाने अशा विद्यार्थ्यांसाठी परीक्षा समस्‍या नोंदणी अर्ज उपलब्‍ध करून दिला आहे. 

संगणकावर प्रश्‍न न दिसता केवळ पर्यायच

पुणे विद्यापीठाने विद्यार्थ्यांच्‍या सुविधेसाठी ऑनलाइन व ऑफलाइन अशा दोन्‍ही पद्धतीने परीक्षा देण्याचे पर्याय उपलब्‍ध करून दिले होते. त्‍यानुसार बहुतांश विद्यार्थ्यांनी ऑनलाइन परीक्षेचा पर्याय नोंदविला, तर ऑनलाइन प्रक्रियेत तांत्रिक अडचणींमुळे गुणांवर परिणाम व्‍हायला नको म्हणून अनेक विद्यार्थ्यांनी ऑफलाइन परीक्षेचा पर्याय निवडला होता. सोमवारी परीक्षेच्‍या पहिल्‍या दिवशी ऑनलाइन व ऑफलाइन अशा दोन्‍ही परीक्षांमध्ये तांत्रिक अडचणी उद्भवल्‍याने विद्यार्थ्यांना मनस्‍तापाला सामोरे जावे लागले होते. ऑनलाइन परीक्षेत विद्यार्थ्यांना लिंक न उघडणे, लॉगइन न होणे, तर काही विद्यार्थ्यांना संगणकावर प्रश्‍न न दिसता केवळ पर्याय दिसत असल्‍याचा अजब प्रकार निदर्शनात आला होता. 

नोंदणी अर्ज विद्यापीठाच्‍या संकेतस्‍थळावर 

ऑफलाइन परीक्षेत विद्यापीठाकडून प्रश्‍नसंच मिळण्यासाठी विलंब झाल्‍याने दीड ते दोन तास उशिराने परीक्षा घेण्यात आल्‍याचेही प्रकार घडले होते. या गोंधळाची पुनरावृत्ती मंगळवारी (ता.१३) देखील झाली होती. या सर्व परिस्‍थितीवर ‘सकाळ’च्‍या माध्यमातून लक्ष वेधण्यात आले होते. दरम्‍यान, या प्रकाराची दखल घेत विद्यापीठाने विद्यार्थ्यांना परीक्षा समस्‍या नोंदणी अर्ज विद्यापीठाच्‍या संकेतस्‍थळावर उपलब्‍ध करून दिला आहे. 

हेही वाचा > हाउज द जोश! वयाच्या ऐंशीव्या वर्षीही वृत्तपत्र विक्री करणारे मधुकर कोष्टी; ६८ वर्षांपासून सेवा

सर्व माहिती नोंदवावी लागणार 

परीक्षा समस्‍या नोंदणी अर्जात विद्यार्थ्यास त्‍याचे नाव, पीआरएन क्रमांक, शाखा, परीक्षा पद्धतीचा पर्याय, विषय क्रमांक (सब्‍जेक्‍ट कोड), विषय, परीक्षेची तारीख, नेमकी काय समस्‍या उद्भवली, याबाबतचा तपशील या अर्जात नोंदवायचा आहे. विद्यापीठाकडे नोंदविलेल्‍या या अर्जानंतर अशा विद्यार्थ्यांना पुन्‍हा एकदा परीक्षा देण्याची उमेद निर्माण झाली आहे. यासंदर्भात विद्यापीठ नेमके काय धोरण जाहीर करते, याकडेही लक्ष लागले आहे. 

हेही वाचा > विकृत नातवाची करामत! आजोबांना संपवून रडण्याचे केले ढोंग; अखेर पोलिसांनी आवळल्या मुसक्या

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Provided by Pune University Exam Problems Registration Application nashik marathi news