ढगाळ वातावरणामुळे इगतपुरीतील रब्बी पिकांवर संक्रांत; शेतकऱ्यांवर दुहेरी संकटाची शक्यता

विजय पगारे
Sunday, 3 January 2021

तालुक्यात रब्बी हंगामातील पिकांची अल्पशः प्रमाणावर का होईना लागवड करण्यात आली आहे; परंतु काही दिवसांपासून झालेल्या ढगाळ वातावरणामुळे व थंडीचे प्रमाण कमी झाल्याने रब्बी हंगामतील पिकांवर रोगांचा मोठ्या प्रमाणावर प्रादुर्भाव झाला आहे.

इगतपुरी (जि. नाशिक) : तालुक्यात रब्बी हंगामातील पिकांची अल्पशः प्रमाणावर का होईना लागवड करण्यात आली आहे; परंतु काही दिवसांपासून झालेल्या ढगाळ वातावरणामुळे व थंडीचे प्रमाण कमी झाल्याने रब्बी हंगामतील पिकांवर रोगांचा मोठ्या प्रमाणावर प्रादुर्भाव झाला आहे. यामुळे पिके धोक्यात आली असून, शेतकरी दुहेरी संकटात सापडण्याची शक्यता आहेत. 

पिकांवर रोगांचा प्रादुर्भाव

ऑक्टोबर, नोव्हेबरमध्ये झालेल्या परतीच्या पावसाने तालुक्यातील खरीप हंगामाची पूर्णपणे वाट लावली. त्यातच आता रब्बीच्या पिकांवरही ढगाळ वातावरणामुळे विविध रोगांचा प्रादुर्भाव झाल्याने पुन्हा एकदा शेतकरी आर्थिक संकटात सापडणार आहे. अगोदरच अधिकच्या आर्थिक मदतीच्या प्रतीक्षेत असलेला बळीराजा ढगाळ वातावरणामुळे मेटाकुटीला आला आहे. तालुक्यातील शेतकऱ्यांनी दिवाळीनंतर आपल्या शेतीची मशागत करून रब्बीची पेरणी सुरू केली. पाण्याची मोठ्या प्रमाणावर उपलब्धता असल्याने कांदा, गहू, मसूर, हरभरा यांसह विविध भाजीपाल्याच्या पिकांची लागवड केली आहे; परंतु सततच्या ढगाळ वातावरणामुळे पिकांवर रोगांचा प्रादुर्भाव दिसून येत आहे. 

हेही वाचा> गॅस गिझर भडक्यात बाथरूममध्ये तरुणाचा गुदमरून मृत्यू; नववर्षाच्या पहिल्याच दिवशी पाटील कुटुंबात आक्रोश

कांद्याची नवीन लागवड धोक्यात

यात गहू व कांद्याचे क्षेत्र मोठे आहे. सुरवातीपासूनच रोगाचा प्रादुर्भाव निर्माण झाल्याने उत्पन्नात घट येण्याची शक्यता आहे. सततचे ढगाळ वातावरण आणि गायब झालेली थंडी यामुळे गव्हावर मावा येण्याची दाट शक्यता आहे, तसेच परिसरातील उन्हाळ कांद्याचे रोप परतीच्या पावसाने गेले, मात्र आहे त्या रोपामध्ये कांदालागवड मोठ्या प्रमाणात सुरू झाली आहे. अजूनही काही भागात शेतकरी कांदालागवड करत आहेत. या हवामानामुळे नवीन लावलेल्या कांद्यावरही करप्याने आक्रमण केल्याने नवीन लागवड धोक्यात आली आहे. पिकांना वाचविण्यासाठी शेतकऱ्यांनी विविध औषधांची फवारणी सुरू केली आहे, तर अनेक ठिकाणी शेतकरी महागडी औषधे फवारणी करताना दिसून येत आहेत.

हेही वाचा> दिव्यांग पित्याचे मुलाला अभियंता बनविण्याचे डोळस स्वप्न; कॅलेन्डर विक्रीतून जमवताय पै पै, असाही संघर्ष

मदतीची प्रतीक्षा

खरिपात कर्जबाजारी झालेला शेतकरी आता रब्बीतही कर्जबाजारी राहतो की काय, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. अवकाळीने नुकसान झालेल्या पिकांचे पंचनामे तर झाले. त्याच्या नुकसानीचा एक हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये वर्ग झाला. अनेक शेतकरी मदतीच्या प्रतीक्षेत आहेत. नुकसानभरपाई अजूनही पदरात पडलेली नाही. अशा विचित्र परिस्थितीत या परिसरातील बळीराजा सापडला आहे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Rabi crops in Igatpuri in danger due to cloudy weather nashik marathi news