तब्बल १४ वर्षांनंतर बदलले जिल्ह्याचे पर्जन्यमान..दुष्काळी भागालाही दिलासा 

संतोष विंचू : सकाळ वृत्तसेवा 
Monday, 18 May 2020

पर्जन्यमान कमी असल्याने थोडा पाऊस पडला तरी पर्जन्याची सरासरी वाढून अनेक तालुके दुष्काळी उपाययोजनांपासून वंचित राहत होते. आता सर्व तालुक्‍यांच्या पर्जन्यमानात शंभर ते सव्वाशे मिलिमीटरने वाढ झाल्याने कमी पाऊस पडल्यास या तालुक्‍यांना दुष्काळी लाभासाठी नक्कीच शासनदरबारी न्याय मिळेल, असे आकडे सांगतात. 

 

नाशिक / येवला : तब्बल 14 वर्षांनंतर जिल्हा व तालुक्‍याचे सरासरी पर्जन्यमान बदलले आहे, त्यासाठी तब्बल 50 वर्षांच्या पर्जन्यमानाचा विचार केला गेला असून, जिल्ह्यातील बहुतांश तालुक्‍याच्या पर्जन्यमानात मोठी वाढ झाली आहे, तर जिल्ह्यातील पावसाची वार्षिक सरासरी 35 मिलिमीटरने वाढली आहे. यात सर्वाधिक सुरगाणा तालुक्‍याची वार्षिक सरासरी 256 मिलिमीटरने वाढली आहे. नवीन आकडेवारीनुसार दुष्काळी तालुक्‍यातील पर्जन्यमान वाढलेले दिसत असल्याने या भागाला दिलासा मिळाला आहे. 

30 मिलिमीटरने वाढ.. 
पुण्याच्या हवामान खात्याने 1961 ते 2010 या 50 वर्षांचा अभ्यास करून 2006 नंतर आता तालुकानिहाय वार्षिक पावसाची सरासरी नव्याने निश्‍चित केली आहे. दहा-बारा वर्षांतच पर्जन्यमानात विषमता निर्माण झाली आहे. त्यामुळे इतक्‍या जुन्या पर्जन्यमानाचा विचार करण्यापेक्षा दहा-वीस वर्षांतील पर्जन्यमानावर सरासरी काढणे उचित ठरले असते, अशी अपेक्षाही या क्षेत्रातील तज्ज्ञांकडून व्यक्त होत आहे. विशेष म्हणजे जानेवारी ते डिसेंबर असा संपूर्ण वर्षभरातला पाऊस गृहीत धरून ही सरासरी काढली आहे. या पुढील काळात सर्वत्र नवीन वार्षिक सरासरीचीच आकडेवारी गृहित धरली जाणार आहे. पर्जन्यविषयक अहवाल तयार करण्यासाठी आणि दुष्काळाचे मूल्यांकन करण्यासाठीही याच आकडेवारीचा वापर केला जाणार आहे. 

दुष्काळी भागाला लाभदायी... 
नव्या आकडेवारीनुसार दुष्काळी तालुक्‍यातील पर्जन्यमान वाढलेले दिसत असून, यापूर्वी अल्प सरासरीमुळे दुष्काळाच्या निकषांचा फटका बसणाऱ्या येवला, नांदगाव, मालेगाव, सिन्नर यांसारख्या तालुक्‍यांना आता सरासरी वाढल्याने नक्कीच फायदा होणार आहे. जिल्ह्यात इगतपुरीचे पर्जन्यमान 128 मिलिमीटरने, पेठचे 62 व देवळ्याचे 46 मिलिमीटरने घटले आहे. याव्यतिरिक्त इतर सर्व तालुक्‍यांच्या पर्जन्यमानात वाढ झाली आहे. यापूर्वी पर्जन्यमान कमी असल्याने थोडा पाऊस पडला तरी पर्जन्याची सरासरी वाढून अनेक तालुके दुष्काळी उपाययोजनांपासून वंचित राहत होते. आता सर्व तालुक्‍यांच्या पर्जन्यमानात शंभर ते सव्वाशे मिलिमीटरने वाढ झाल्याने कमी पाऊस पडल्यास या तालुक्‍यांना दुष्काळी लाभासाठी नक्कीच शासनदरबारी न्याय मिळेल, असे आकडे सांगतात. 

वार्षिक सरासरीचे नवे-जुने आकडे व झालेली वाढ मिलिमीटरमध्ये... 

तालुका आत्तापर्यंत नवीन वाढ / घट
नाशिक 614 793 79
इगतपुरी 3325 3197 128
दिंडोरी  696 781 85 
पेठ 2194 2132 62
त्र्यंबकेश्‍वर  2194 2249 55 
मालेगाव 440 568 128 
नांदगाव  467 602 135
चांदवड   518 631 113
कळवण 664 767 103 
बागलाण 419 589 170
सुरगाणा  1744 1999 255
देवळा 571 525 46
निफाड  427 563 136
सिन्नर  492 657 165 
येवला  433 566 133
जिल्हा सरासरी  1013 1043 30 

हेही वाचा > धक्कादायक! राजकीय संबंधाचा घेतला गैरफायदा...महिलेवर केला अत्याचार

हेही वाचा > चोवीस तास बंदोबस्त असूनही 'त्याने' मारली शाळेतून दांडी?...धक्कादायक प्रकार


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Rainfall of the district has changed after 14 years nashik marathi news