सहा तालुक्यांत पावसाने गाठली शंभरी! धरणांचा पाणीसाठाही ऑगस्टअखेर ८० टक्के

संतोष विंचू
Friday, 4 September 2020

जून-जुलै पावसाने सहा तालुक्यांवर कृपा केली असल्याने या तालुक्यांचे आकडेही फुगले आहेत. ऑगस्टमध्ये दुष्काळी पट्ट्यातला पाऊस कमी होऊन पश्चिमेकडील माहेरघरी पडल्याने तिकडची टक्केवारीही वाढली असून, धरणांचा पाणीसाठाही ऑगस्टअखेर ८० टक्के झाला आहे.

नाशिक / येवला : पावसाळ्याचे तीन महिने पूर्ण झाले असतानाच जिल्ह्यातील इगतपुरी, मालेगाव, नांदगाव, बागलाण, देवळा, सिन्नर या सहा तालुक्यांनी वार्षिक पर्जन्यमानाची सरासरी ओलांडली आहे. जिल्ह्याचा आजपर्यंतचा एकूण सरासरी पाऊस ८७० मिलिमीटर (८७ टक्के) असून, गेल्या वर्षी ऑगस्टअखेर १२५० मिमी (१२५ टक्के) पाऊस झाला होता. 

धरणांचा पाणीसाठाही ऑगस्टअखेर ८० टक्के
जून-जुलै पावसाने अवर्षणप्रवण, दुष्काळी मालेगाव, येवला, नांदगाव, सिन्नर, चांदवड आदी तालुक्यांवर कृपा केली असल्याने या तालुक्यांचे आकडेही फुगले आहेत. ऑगस्टमध्ये दुष्काळी पट्ट्यातला पाऊस कमी होऊन पश्चिमेकडील माहेरघरी पडल्याने तिकडची टक्केवारीही वाढली असून, धरणांचा पाणीसाठाही ऑगस्टअखेर ८० टक्के झाला आहे. 

जिल्ह्याची वार्षिक सरासरी ८६ टक्के; ऑगस्टमध्ये सरासरी १३६ टक्के पर्जन्यमान 
ऑगस्टमध्ये इगतपुरीत १८४ टक्के पाऊस पडला असून, येवल्यात सर्वांत कमी ८५ टक्के नोंद झाली आहे. जिल्ह्यातील महिन्याचे सरासरी पर्जन्यमान २६७ असताना ३९५ मिलिमीटर (१३६ टक्के) पाऊस पडला आहे. 
वार्षिक सरासरीचा विचार केल्यास तीन महिन्यांत सर्वाधिक ६४० मिलिमीटर पाऊस (१४० टक्के) मालेगावमध्ये नोंदला गेला आहे. मालेगावसह इगतपुरी (१०९ टक्के), बागलाण (१३९ टक्के), देवळा (१०३ टक्के), सिन्नर (१२१), नांदगाव (११२) या तालुक्यांनी सरासरी शंभरी ओलांडली आहे. सर्वांत कमी पाऊस पेठ (६८) व त्र्यंबकेश्वर (६०), दिंडोरी (७३), चांदवड (७९), कळवण (७७), नाशिक (८५), येवला (९७) तालुक्यांत झाला असल्याने राहिलेली कसर शेवटच्या महिन्यात भरून निघेल, असा आशावादही व्यक्त होत आहे. 

हेही वाचा > धक्कादायक! सासरच्यांनीच लेकीचा घातपात करुन विहिरीत फेकल्याचा पित्याचा आरोप; परिसरात खळबळ

मूग, कांद्याचे नुकसान 
जुलैच्या शेवटी व ऑगस्टमध्ये काही ठिकाणी जोरदार पाऊस झाल्याने पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. विशेषत: शेतकऱ्यांची कांद्याची रोपे पूर्णपणे खराब झाली तर लागवड झालेल्या कांद्यातही २० ते ४० टक्के नुकसान झाले आहे. मुगाला शेतातच मोड फुटण्याचे प्रकार घडले. 

हेही वाचा > गाई चारायला गेलेल्या प्रशांतच्या नशिबी असे दुर्दैव; घटनेनंतर गावात भयाण शांतता

आकडे बोलतात... 
ऑगस्टमध्ये पडलेला पाऊस - ३९५ मिमी 
ऑगस्टची टक्केवारी- १३६.७० 
जून ते सप्टेंबरची सरासरी- १०७५ मिमी 
या वर्षीचा ऑगस्टअखेर पाऊस- ८७० मिमी 
ऑगस्टअखेर एकूण टक्केवारी- ८७ 
सप्टेंबरची सरासरी- २८८१ मिमी 
सप्टेंबरमधील पाऊस- १६४ मिमी  

संपादन - ज्योती देवरे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Rains in six talukas nashik marathi news