जिद्दीला सलाम! आई-बापांचे कष्टाचे अश्रू पुसण्यासाठी 'राणी'चा अंधारात अभ्यास; शिक्षणाची अनोखी कास

संदीप मोगल
Tuesday, 26 January 2021

आजच्या युगात यांत्रिकीकरणामुळे घराघरांत वीज आल्यामुळे सर्वत्र प्रकाश दिसत आहे, पण या प्रकाशाचा लाभ काहींना मिळतो तर काहींना मिळत नाही. त्यात पथदीपाच्या खांबाखाली अभ्यास करणारी गरीब विद्यार्थी राणी कोणालाही दिसत नाही.

लखमापूर (जि.नाशिक) : आजच्या युगात यांत्रिकीकरणामुळे घराघरांत वीज आल्यामुळे सर्वत्र प्रकाश दिसत आहे, पण या प्रकाशाचा लाभ काहींना मिळतो तर काहींना मिळत नाही. त्यात पथदीपाच्या खांबाखाली अभ्यास करणारी गरीब विद्यार्थी राणी कोणालाही दिसत नाही.

आई-वडिलांचे अश्रू पुसण्यासाठी शिक्षणाची कास

दिंडोरी तालुक्यातील लखमापूर येथे पोटाची खळगी भरण्यासाठी बुलडाणा जिल्ह्यातील एक गरीब कुटुंब आले आहे. राहण्यास घर नाही. एका झाडाखाली फाटलेल्या गोण्या, तुटलेले पत्रे, असा एक खोपा तिडके परिवाराने तयार केला. घरात वीज नाही. फक्त एक तेलाचा दिवा. दिवसभर मिळेल ते काम करून कुटुंबाची गुजराण करायची. कधी काम नाही मिळाले तर उपाशी झोपायचे, असे हे कष्टकरी तिडके कुटुंब. मात्र, त्यांच्या राणीने आई-वडिलांचे अश्रू पुसण्यासाठी शिक्षणाची कास धरली आहे. 

हेही वाचा > अखेर गूढ उकललेच! म्हणून केली रिक्षाचालकाने 'त्या' गर्भवती महिलेची हत्या

कितीही कष्ट पडले तरी मुलांना शिक्षण द्यायचे
तिडके परिवाराला एक मुलगी, एक मुलगा असा परिवार. आई-बापाचे अत्यंत कमी शिक्षण असल्यामुळे कोठे नोकरी नाही. परंतु, आपल्याला शिक्षण घेता आले नाही. आपल्याला कितीही कष्ट पडले तरी मुलांना शिक्षण द्यायचे, ही आशा मनाशी बाळगून तिडके यांनी आपल्या मुलांना लखमापूर येथील प्राथमिक विद्यामंदिर शाळेत दाखल केले. दिवसभर मिळेल ते काम करायचे व आपल्या मुलांच्या शिक्षणांकडे लक्ष द्यायचे, असा नित्यनियम या परिवाराचा आहे. तिडके यांना राणी नावाची मुलगी आहे.

हेही वाचा > वाढदिवशीच दोघा मित्रांवर काळाची झडप; 'तो' प्रवास ठरला अखेरचाच

आई-बाबांच्या कष्टाची जाणीव

आई-बाप दररोज कष्ट करून आपले शिक्षण पूर्ण करून घेतात. याकडे आता चौथ्या इयत्तेत गेलेली राणी आई-बाबांच्या कष्टाची जाणीव ठेवून घरासमोरील पथदीपाच्या उजेडात दररोज तीन तास अभ्यास करते. घरात वीज नसल्याने राणी खांबाखाली अभ्यास करताना थंडी, पाऊस याची तमा बाळगत नाही. अँड्रॉइड मोबाईल नसल्याने राणीचे बाबा शिक्षकांना भेटून ऑनलाइन अभ्यासक्रमांची चौकशी करून तो अभ्यास राणीला देत पूर्ण करून घेतात. 

शिक्षकांचे मोलाचे मार्गदर्शन 
गरीब मुलींना मदतीचा हात देण्यासाठी पुढाकार घेतला पाहिजे. पोटाला एकवेळची भाकरी नाही; परंतु शिक्षण हेच जीवनाला आकार देण्यासाठी या युगातील महत्त्वाचे साधन आहे. राणीला नेमके हेच करण्याची जिद्द आहे. यासाठी शाळेचे शिक्षक एस. बी. जगताप, एस. ए. पाटील, एस. डी. शिंदे, के. व्ही. पाटील, जी. जे. देशमुख, एस. वाय. पाटील, बी. बी. खराटे, एस. पी. राऊत, ए. एस. पवार, ए. जे. राजपूत या शिक्षकांचे मार्गदर्शन मिळत आहे. 

 

राणी तिडके ही विद्यार्थिनी चौथ्या इयत्तेत शिक्षण घेत असून, तिला अभ्यासात मदत करण्याचे काम वर्गशिक्षिका अलका पगार करतात. राणी पहिलीपासूनच हुशार आहे. वेळोवेळी ती प्रत्येक स्पर्धेत भाग घेते. अशा गरीब हुशार मुलांना मदतीचा हात देण्याची खरी गरज आहे. -एच. एम. अढांगळे, मुख्याध्यापिका, प्राथमिक विद्यामंदिर, लखमापूर  
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Rani hard work for education and parents happiness nashik marathi news