कांदा दराची झेप! उन्हाळ कांदा सात हजारांवर; तर लाल कांदा चार हजार रुपये प्रतिक्विंटल

दिपक आहिरे
Sunday, 18 October 2020

लाल कांद्याची अत्यल्प आवक होत असल्याने सर्व मदार उन्हाळ कांद्यावर आहे. परतीच्या पावसाचा मुक्काम वाढला, तर लाल कांदा येण्यास अधिक विलंब होईल व बाजारभाव दहा हजार रुपये प्रतिक्विंटलचा टप्पा ओलांडेल, असा अंदाज कांदा व्यापारी अतुल शाह यांनी व्यक्त केला. 

नाशिक : (पिंपळगाव बसवंत)केंद्र शासनाने निर्यातबंदीचा खटाटोप करून व व्यापाऱ्यांवर प्राप्तिकर विभागाचे छापे टाकूनही कांद्याच्या दराची उसळी थांबलेली नाही. वर्षभरानंतर उन्हाळ कांद्याला शनिवारी (ता.१७) सात हजार रुपये प्रतिक्विंटल असा आकर्षक दर मिळाला. नव्याने दाखल झालेल्या लाल कांद्याचे स्वागत चार हजार रुपये प्रतिक्विंटल दराने झाले आहे.

महिन्यापासून कांद्याला रोज उच्चांकी दर

परतीच्या पावसाने लाल कांद्याची नासाडी केली व पुरवठ्यापेक्षा मागणी वाढल्याने दराला झळाळी आली आहे. सहा महिन्यांपासून कांद्याचे दर रोडावलेले राहिले. अगदी आठ रुपये प्रतिक्विंटलपर्यंत कांदा विकावा लागला. पण महिन्यापासून कांद्याला रोज उच्चांकी दर मिळत आहेत. आज तर कांद्याने वर्षभरापूर्वी मिळालेल्या सात हजार रुपयांचा भाव खाल्ला. उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, बिहार, दिल्ली येथून मोठ्या प्रमाणात मागणी आहे. त्या तुलनेत बेंगळुरू, धुळे, पुणे येथे बाजारात येणारा कांदा पावसाने सडला. लाल कांद्याची अत्यल्प आवक होत असल्याने सर्व मदार उन्हाळ कांद्यावर आहे. परतीच्या पावसाचा मुक्काम वाढला, तर लाल कांदा येण्यास अधिक विलंब होईल व बाजारभाव दहा हजार रुपये प्रतिक्विंटलचा टप्पा ओलांडेल, असा अंदाज कांदा व्यापारी अतुल शाह यांनी व्यक्त केला. 

हेही वाचा > दारूची नशा भोवली : अगोदरच मद्यधुंद असूनही आणखी दारूची हौस; नशेत केले कांड, चौघे थेट तुरुंगात!

अडीच कोटी रुपयांची उलाढाल 

पिंपळगाव बाजार समितीत शनिवारी (ता.१७) दिवसभरात कांदा खरेदी विक्रीतून दोन कोटी ६५ लाखांची उलाढाल झाली. लाल व उन्हाळ कांद्याचे दर तेजीत असल्याने अवघी साडेपाच हजार क्विंटल कांद्याची आवक होऊनही अडीच कोटी रुपयांहून अधिक अर्थकारण झाले.  

हेही वाचा > दुर्देवी! मुसळधार पावसात घेतला झाडाचा आसरा; मात्र नियतीने केला घात


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The rate of onion Over seven thousand nashik marathi news