BREAKING : दीड कोटींची फसवणूक.. भाजपा नेते पवार याच्यासह दोघांना पोलिस कोठडी

सकाळ वृत्तसेवा
Wednesday, 24 June 2020

मागील वर्षी पुणे पोलिसांनी पवार याची नाशिक येथे जाऊन चौकशी केली होती, त्यावेळी त्यास अटक करण्यात आली नाही. दरम्यान, पवार याने सत्र न्यायालय, उच्च न्यायालय व सर्वोच्च न्यायालयापर्यंत अटकपूर्व जामीनासाठी प्रयत्न केला होता.

नाशिक : भागीदारीमध्ये बांधकाम व्यवसाय करण्याचे व जादा नफा मिळवुन देण्याचे आमिष दाखवून पुण्यातील एका व्यावसायिक तब्बल पावणे दोन कोटी रूपयांची फसवणुक केल्याप्रकरणी कोंढवा (पुणे) पोलिसांनी नाशिक येथील बांधकाम व्यावसायिक व भारतीय जनता पक्षाचे नेता रत्नाकर पवार याच्यासह दोघांना मंगळवारी (ता. 23) नाशिक येथून अटक केली होती. बुधवारी (ता.24)  जेएमएफसी कान्टेंनमेट कोर्टात हजर केले असता 27 पर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. पवार हा नाशिकमधील भाजपचा नेता आहे. त्याने विधानसभा निवडणुकीत शिवसेनेच्या उमेदवाराविरुद्ध बंडखोरी करीत निवडणुक लढविली होती.

यापूर्वी चार जणाना अटक

रत्नाकर पवार व अशोक अहिरे (दोघेही रा. नाशिक) अशी अटक केलेल्या संशयित आरोपीची नावे आहेत. यापूर्वी चार जणाना अटक करण्यात आली आहे. याप्रकरणी मोहद्दीस महंमद फारुख बखला (रा. एनआयबीएम रोड, कोंढवा) यांनी मागील वर्षी कोंढवा पोलिस ठाण्यात फिर्याद दिली होती. 

काय आहे प्रकरण
कोंढवा पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक विनायक गायकवाड व तपासी अधिकारी महादेव कुंभार यांनी दिलेल्या माहितीनुसार, बखला यांची टुर्स अँड ट्रव्हल्स व ड्रीम होम कन्स्ट्रक्शन कंपनी आहे. त्यांना फेब्रुवारी २०१७ मध्ये अनिस मेमन याने इतर आरोपींशी ओळख करुन दिली. त्यावेळी रत्नाकर पवार याच्या मालकीच्या गिरणा इंफ्रा प्रोजेक्ट व इतर ठिकाणी पैसे गुंतविल्यास भरपूर फायदा मिळेल असे त्यांना सांगण्यात आले होते. त्यानुसार त्याच्याशी करारही करण्यात आला. व्यावसायासाठी त्यास फिर्यादी यांनी वेळोवेळी त१ कोटी ६४ लाख १६ हजार ३८७ रुपये दिले. त्यानंतर पवार व त्याच्या साथीदारानी ज्या प्रकल्पासाठी पैसे घेतले, त्यासाठी न वापरता त्याचा उपयोग स्वत:साठी केला. त्यानंतर फिर्यादी यांनी त्यास वारंवार पैसे देण्याची मागणी केली, मात्र त्यानी प्रतिसाद दिला नाही. त्यामुळे फिर्यादी यांनी त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला होता. त्यानुसार पोलिसांनी या प्रकरणात 4 आरोपीना यापूर्वीच अटक केली. तर मागील वर्षी पुणे पोलिसांनी पवार याची नाशिक येथे जाऊन चौकशी केली होती, त्यावेळी त्यास अटक करण्यात आली नाही. दरम्यान, पवार याने सत्र न्यायालय, उच्च न्यायालय व सर्वोच्च न्यायालयापर्यंत अटकपूर्व जामीनासाठी प्रयत्न केला होता.

हेही वाचा > धक्कादायक! लहान भावाने मोठ्या भावाच्या डोक्यात घातला दगड..जागीच ठार...कारण वाचून व्हाल थक्क..

फेटाळला होता अटकपूर्व जामीन अर्ज

लॉकडाऊनमुळे थांबलेले सर्वोच्च न्यायालयाचे कामकाज पुन्हा सुरु झाल्यानंतर २ जून रोजी तीन न्यायमुर्तींच्या खंडपीठाने रत्नाकर पवार याचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला. त्यानंतर कोंढवा पोलीस त्याचा शोध घेत होते़.परिमंडळात पाचचे पोलिस उप आयुक्त सुहास बावचे, सहाय्यक पोलीस आयुक्त सुनिल कलगुटकर यांचे मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक विनायक गायकवाड, पोलीस निरीक्षक (गुन्हे) महादेव कुंभार, पोलीस कर्मचारी विशाल गवळी, नितीन कांबळे यांच्या पथकाने ही कारवाई केली आहे.

हेही वाचा > अंत्यविधीची सुरू होती तयारी...अन् 'ती' एक बातमी येताच सगळ्यांनाच फुटला घाम..


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Ratnakar Pawar and two others were remanded in police custody nashik marathi news