'महिला नावाच्या दुर्गेमुळेच समाज जिवंत' - DCP पौर्णिमा चौगुले-श्रींगी

विक्रांत मते
Saturday, 17 October 2020

त्यामुळे गुन्हेगारांना वठणीवर आणण्यासाठी पोलिसांचा ‘सच बोल पट्टा’ बाहेर काढण्याशिवाय पर्याय नव्हता. त्या पट्ट्याला शौर्याची साथ देत गुन्हेगारांना वठणीवर आणले. आजही जत तालुक्यात माझे नाव काढल्यावर अनेकांना धडकी भरते.

नाशिक : देशाला स्वातंत्र्य मिळाले. ते फक्त पुरुषांसाठीच नव्हते, तर महिलांसाठीसुद्धा होते. पुरुषप्रधान संस्कृतीत याचा विचार करावा. महिला सहनशील आहे. याचा अर्थ असा नाही, की ती दुबळी आहे. स्त्री नवदुर्गेचे रूप आहे. म्हणूनच दुर्गेची पूजा आदरयुक्तच व्हायला हवी. महिला नावाच्या दुर्गेमुळेच समाज जिवंत आहे. प्रत्येकाला आई, मुलगी असते. घरात जसा महिलांना सन्मान मिळतो, तोच सन्मान प्रत्येक स्त्रीला मिळालाच पाहिजे. वाचा आजच्या नवदुर्गा पोलिस उपायुक्त पौर्णिमा चौगुले-श्रींगीबद्दल...

उपजिल्हाधिकारीपदाच्या परीक्षेत राज्यात पहिला क्रमांक

गारगोटी (ता. भुदरगड, जि. कोल्हापूर) इथं प्राथमिक शिक्षण पूर्ण करत असताना दूरदर्शनवरील ‘उडाण’ मालिका पाहण्यात आली. त्या मालिकेत अनंत अडचणींना सामोरे जाणाऱ्या महिलांची कथा रेखाटली आहे. त्या पात्राने माझ्या जीवनावर सकारात्मक परिणाम केला. माजी तुरुंग महासंचालक मीरा बोरवणकर आमच्या गावाकडच्या एका निवडणुकीच्या वादग्रस्त प्रसंगाला सामोऱ्या गेल्या. तणावाच्या परिस्थितीत त्या त्यांच्या बाळाला पोलिस जीपमध्ये ठेवून सामोऱ्या गेल्या. अत्यंत संयमाने त्यांनी हाताळलेल्या परिस्थितीने माझ्या आयुष्यावर मोठा परिणाम केला. त्यानंतर आयुष्यात काहीतरी मोठे व्हायचे मी ठरविले. वडिलांची साथ मिळाली. लहानपणापासूनच चंचल स्वभाव असल्याने वडिलांनी मोठे होऊन पोलिस अधिकारी व्हायचे स्वप्न दाखविले. त्या दिशेला आजीचीही साथ मिळाली. मात्र, मला डॉक्टर अथवा इंजिनिअर व्हायचे होते. दहावीला चांगले गुण मिळाल्यानंतर सायन्स घ्यावे असे ठरवले. पण, वडिलांनी आर्टस घेऊन स्पर्धा परीक्षा देण्याचा सल्ला दिला. त्याप्रमाणे एम. ए. (पॉलिटिक्स) केले. सांगली येथील नेताजी प्रबोधिनीमध्ये प्रवेश घेत स्पर्धा परीक्षेची तयारी करताना शारीरिक प्रशिक्षण घेतले. २००८ मध्ये नाशिकच्या पोलिस अकादमीत प्रशिक्षण घेताना उपजिल्हाधिकारीपदाच्या परीक्षेत राज्यात पहिला क्रमांक मिळविला. त्या वेळी महसूल की पोलिस, असा संघर्ष मनात तयार झाला. अनेकांनी महसूलची नोकरी स्वीकारण्याचा सल्ला दिला. मात्र, लहानपणीच काहीतरी वेगळे करून दाखविण्याचा केलेला निश्‍चय स्वस्थ्य बसू देत नव्हता. अखेरीस पोलिस दलातील आव्हानात्मक नोकरी स्वीकारली. 

हेही वाचा > दारूची नशा भोवली : अगोदरच मद्यधुंद असूनही आणखी दारूची हौस; नशेत केले कांड, चौघे थेट तुरुंगात!

सच बोल पट्टा... 

अमरावती ग्रामीणमध्ये २०१० मध्ये पहिली पोस्टिंग झाली. त्यानंतर सांगली, पुणे, सोलापूर अशी बदली होत गेली. २०११ ते १४ या कालावधीत सांगली जिल्ह्यातील जत तालुक्यात पोलिस उपअधीक्षक असताना गुन्हेगारांना जरब बसविण्यात मोठी भूमिका निभावली. या तालुक्यात महिलांच्या छेडछाडीच्या घटना मोठ्या प्रमाणात वाढल्या होत्या. मला महिलांची छेड अजिबात आवडत नाही. आज माझ्या अंगावर खाकी वर्दी असल्याने मला संरक्षण आहे; परंतु प्रत्येकाच्या अंगावर खाकी नसतेच. त्यामुळे त्यांची काय अवस्था होत असेल, याची जाणीव होती. त्यामुळे गुन्हेगारांना वठणीवर आणण्यासाठी पोलिसांचा ‘सच बोल पट्टा’ बाहेर काढण्याशिवाय पर्याय नव्हता. त्या पट्ट्याला शौर्याची साथ देत गुन्हेगारांना वठणीवर आणले. आजही जत तालुक्यात माझे नाव काढल्यावर अनेकांना धडकी भरते. दहशत निर्माण करताना महिलांचा आदर व्हायला पाहिजे, एवढी माफक अपेक्षा होती. गुन्हेगार सामाजिक परिस्थितीचा बळी असतो. त्या परिस्थितीतून बाहेर काढण्याचे कर्तव्य मी आजपर्यंत पार पाडले. चांगल्याशी चांगले व वाईटाशी वाईट, असा माझा स्वभाव आहे व त्याबद्दल मला अभिमानदेखील आहे. 

हेही वाचा > दुर्देवी! मुसळधार पावसात घेतला झाडाचा आसरा; मात्र नियतीने केला घात


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Read about todays Navdurga DCP Pournima Chowgule-Sringi nashik marathi news