एक वास्तव.. मालेगावकरांच्या नरकयातना अन् हालअपेष्टां पाचवीलाच पुजलेल्या..

malegaon city 1.png
malegaon city 1.png

नाशिक / मालेगाव : महामारी, दंगली, बॉंबस्फोट अन्‌ आता कोरोना अशी अनेक संकटे झेलणाऱ्या मालेगावची घुसमट दूर करण्याचा प्रयत्न कधी झालाच नाही. किंबहुना सायकल, अत्तर, लुंगी, चहा, पान, विडी व सिनेमा या कमी खर्चाच्या गरजांप्रमाणेच आता "घुसमट'ही येथील नागरिकांच्या अंगवळणी पडली आहे. त्यामुळे सुरवातीपासूनच नरकयातना भोगणाऱ्या मालेगावमध्ये विकासासाठी ना कधी चळवळी उभ्या राहिल्या ना आंदोलने पेटली. 
पेशवे व इंग्रजांच्या काळात जेमतेम शंभर मातीची घरे असणारे हे गाव कालांतराने मुस्लिमबहुल शहर झाले. विविध अप्रिय घटनांनी देशभर चर्चेत आले. मात्र, मूलभूत गरजांप्रमाणे जोपासलेल्या कमी खर्चातील गरजा आणि त्यांच्या जोडीला घुसमटीची करून घेतलेली सवय, या चौकटीबाहेर येथील नागरिक कधी गेलेच नाहीत. 

मूळ माळी समाजाचे गाव 
गिरणा व मोसम नदीच्या कुशीत वसलेल्या मालेगावात सन 1000 मध्ये राष्ट्रकुल घराण्याची सत्ता होती. आताच्या संगमेश्‍वर भागात त्या काळी माळी समाजाची जेमतेम शंभर मातीची घरे होती. शेती, दूध, भाजीपाला एवढा मर्यादित व्यवसाय होता. होळकरांकडे सत्ता आल्यानंतर निंबायती परगणामध्ये मालेगावचा समावेश झाला. पेशव्यांनी 1760 मध्ये निंबायती परगणाची जहागिरी नारोशंकर राजेबहाद्दर यांच्याकडे सोपविली. नारोशंकरांनी ऐतिहासिक भुईकोट किल्ला बांधल्यापासून पेशव्यांची करडी नजर मालेगाववर होती. किल्ल्याच्या बांधकामानिमित अरबी व मुस्लिम कारागीर मालेगावात आले. यातील काही जण येथेच स्थायिक झाले. 13 जून 1818 ला इंग्रजांनी किल्ला जिंकला. अहिल्यादेवी होळकरांचे मालेगाववर विशेष प्रेम होते. मोसम नदीवर त्यांनी बांधलेला पहिला पादचारी पूल त्याची आजही साक्ष देतो. 

इंग्रजांकडून सतत छळ 
नाशिकहून खानदेशवर अंमल गाजविण्यासाठी इंग्रजांना मालेगाव सोयीचे ठिकाण होते. त्यांनी मोठे सैन्य व दारूगोळा कॅम्प छावणीत ठेवला होता. त्यामुळेच या भागाला कॅम्प असे नाव पडले. संगमेश्‍वरात अनेक वर्षे तोफा होत्या. इंग्रज सैन्याच्या दहशतीखालीच नागरिक वावरत असत. भुईकोट किल्ल्यातूनच इंग्रज खानदेशची सूत्रे हलवीत असत. 

विणकरही झाले स्थायिक 
किल्ल्याचे बांधकाम अन्‌ त्यापाठोपाठ अनेक कुशल विणकर येथे आले. त्या वेळी नुकतेच बाळसे धरत असलेल्या हातमागाला त्यामुळे बळकटी मिळाली. अरबी व उत्तर भारतातील विणकरांमुळे मालेगाव मोठे गाव झाले. तेव्हापासूनच हिंदू-मुस्लिम संख्येचे गणित 30 व 70 टक्के आजही कायम आहे. हातमागानंतर यंत्रमाग आल्यावर मुस्लिम मजूर व कारागिरांची दाटी झाली. हिंदूही या व्यवसायात पडले. साधारणत: मजूर, कारागीर, यंत्रमाग मालक मुस्लिम, तर कच्चे सूत व तयार कापड विकणारे हिंदू व्यापारी अशी सांगड या व्यवसायाने घातली. त्यामुळे दोन्ही समाज येथे नेहमीच एकमेकांवर अवलंबून होते व आहेत. यंत्रमाग व्यवसायामुळे कामगार वाढले. निवारा शोधताना शेकडो झोपडपट्ट्या जन्माला आल्या. परिणामी मुस्लिमबहुल शहर म्हणून मालेगाव नकाशावर आले. 

हेही वाचा > राजेंद्र सरदार खून प्रकरण..अखेर गुढ उलघडले ! प्रियकराच्या मदतीने काढला कायमचा काटा
 
माणसे वाढली, व्यवस्था शून्य 
यंत्रमागाच्या भरभराटीमुळे मालेगावात माणसांची गर्दी होत गेली. मात्र, सुविधांकडे दुर्लक्ष झाले. त्याच वेळेस योग्य सोयी-सुविधा झाल्या असत्या, तर आरोग्याचा प्रश्‍न निर्माण झाला नसता. जुजबी सुविधांवरच समाधान मानत गेल्याने आज झोपडपट्टीतील दाटीवाटी कोरोनाच्या रूपाने मालेगावच्या जिवावर उठली आहे. त्यातच, 1920 ते 2001 या ऐंशी वर्षांच्या काळात येथे 25 जातीय दंगली झाल्या. त्यात, राजकारण्यांनी स्वत:ची पोळी भाजून घेतली; पण विकास मात्र मागे पडला. सामान्य माणूस भरडला गेला. 

हेही वाचा > ह्रदय पिळवटून टाकणारी घटना..अखेर सुटलाच 'त्या' मजुरांचा धीर.. रोजच्या मरणातून सोडवला जीव एकदाचा

* कमी खर्चात भागणाऱ्या सात गरजांवरच नागरिक समाधानी 
* सामाजिक व राजकीय व्यवस्थेनेही कष्टकऱ्यांना गुरफटून ठेवले 
* शहराच्या माथ्यावर दोन बॉंबस्फोटांचा शिक्का 
* सायने औद्योगिक वसाहत डी प्लस झोन असूनही बाहेरचा एकही उद्योग आला नाही 
* 2001 पासून जातीय दंगलींना दूर ठेवल्याने भाईचारा वाढला 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com