हॉस्पिटलच्या अतिरिक्त बिलांतून अडीच कोटींहून अधिक रिकव्हरी; लेखापरीक्षकांकडून हजारो रुग्णांना दिलासा 

विक्रांत मते
Monday, 12 October 2020

कॉर्पोरेट हॉस्पिटलसह छोट्या हॉस्पिटलमध्ये रुग्ण वाढू लागल्यानंतर बिलासंदर्भात तक्रारी वाढल्या. याविरोधात शिवसेनेने आक्रमक भूमिका घेत आंदोलनाचा इशारा दिला. तक्रारींसाठी हेल्पलाइन क्रमांक उपलब्ध करून दिला. त्यानंतर महापालिकेने रुग्णालयांमध्ये लेखापरीक्षक नियुक्त करण्याचा निर्णय घेतला.

नाशिक : कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर खासगी हॉस्पिटलकडून रुग्णांवर उपचाराअंती आकारल्या जाणाऱ्या अव्वाच्यासव्वा बिलांच्या पार्श्‍वभूमीवर महापालिकेने नियुक्त केलेल्या लेखापरीक्षकांनी तब्बल दोन कोटी ६९ लाख २८ हजार रुपये रिकव्हरी करून नऊ हजार ९३ रुग्णांना आर्थिक दिलासा दिला आहे. 

मार्चमध्ये शहरात कोरोनाचा पहिला रुग्ण आढळला. एप्रिल व मेमध्ये कोरोनाची परिस्थिती नियंत्रणात होती. त्यानंतर सातत्याने रुग्ण वाढू लागले. जून ते सप्टेंबरमध्ये रुग्णांची संख्या वाढली. दररोज हजारांच्या पटीत रुग्ण आढळल्याने महापालिकेच्या रुग्णालयांमध्ये खाटा उपलब्ध होत नव्हत्या. नाईलाजाने खासगी रुग्णालयांची वाट धरावी लागली. कॉर्पोरेट हॉस्पिटलसह छोट्या हॉस्पिटलमध्ये रुग्ण वाढू लागल्यानंतर बिलासंदर्भात तक्रारी वाढल्या. याविरोधात शिवसेनेने आक्रमक भूमिका घेत आंदोलनाचा इशारा दिला. तक्रारींसाठी हेल्पलाइन क्रमांक उपलब्ध करून दिला. त्यानंतर महापालिकेने रुग्णालयांमध्ये लेखापरीक्षक नियुक्त करण्याचा निर्णय घेतला. १०७ हॉस्पिटलमध्ये १०७ लेखापरीक्षकांची नियुक्ती केल्यानंतर एकूण खाटांपैकी ८० टक्के रुग्णांची बिले तपासण्यास सुरवात झाली. गेल्या अडीच महिन्यात लेखापरीक्षकांना बिल कमी करण्यात यश आले. 

हेही वाचा > ह्रदयद्रावक! सुनेच्या विरहाने सासूला तीव्र धक्का; एकाच दिवशी निघाल्या दोघींच्या अंत्ययात्रा

सोळा हजार रुग्णांची तपासणी 

खासगी रुग्णालयांमधून आतापर्यंत सोळा हजार ६५१ रुग्ण तपासण्यात आले. त्यातील नऊ हजार ९३ रुग्णांची बिले तपासण्यात आली. यात दोन कोटी ६९ लाख २८ हजार ७९ बिलांची रिकव्हरी काढून तेवढी रक्कम रुग्णालयांना परत करण्याच्या सूचना देण्यात आल्या. अशी माहिती महापालिकेचे मुख्य लेखापरीक्षक बी. जी. सोनकांबळे यांनी दिली. डिस्चार्ज मिळालेल्या सात हजार ५५८ रुग्णांच्या मेडिक्लेम पॉलिसी होत्या.  

हेही वाचा > हाऊज द जोश! जीव धोक्यात घालून तरुणांचा चक्क महामार्गावर सराव; युवा वर्गासाठी ठरताएत प्रेरणादायी

संपादन - रोहित कणसे
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Recovery of over Rs 2.5 crore from additional hospital bills nashik marathi news